Thursday, April 1, 2021

अंताक्षरी आणि मी-------प्रशांत कुलकर्णी

 

अंताक्षरी आणि मी

      

      'भेंडी' नावाच्या चिकट आणि अनेकांच्या नावडत्या भाजीचे नाव गाण्याची आवड आणि ज्ञान असलेल्या स्पर्धात्मक खेळाला कुठल्या महाभागाला द्यावेसे वाटले हे माहिती नाही. पण मराठीत घरोघरी भेंड्यांचा खेळ हा वेळ जाण्याचे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून अस्तित्वात आला याला शतकाची नसली तरी दशकांची परंपरा निश्चित आहे. एखाद्या सण-समारंभासाठी जमलेले नातेवाईक यांच्यात जेवणावळी नंतर रात्रीच्या प्रहरी घराच्या गच्चीवर, वऱ्हांड्यात, समोरच्या अंगणात, शुभ्र टिपूर चांदण्यात, गुलाबी थंडी अंगावर घेत, अंगावर शाल, मफलर  ओढत खेळलेल्या भेंड्यांच्या आठवणी अनेकांच्या स्मरणात असतील. मुंबई-पुणे सारख्या शहरी भागात वाढलेल्या अनेकांच्या सहली या भेंड्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. मुंबईतील लोकल मधून पिकनिकला जाताना लोकलच्या डब्याचा वापर तबला म्हणून न केलेला माणूस विरळा. मजा म्हणजे पिकनिकला जाताना जेवढा उत्साह, ऊर्जा, भेंडी खेळणाऱ्यांची असते त्याच्या उलट परत येताना त्यांची दमछाक झालेली असते. दिवसभर ओरडून आवाज बसलेला असतो. विविध खेळ खेळून थकवा आलेला असतो पण भेंड्या खेळायचे म्हंटले की डोळे पेंगत असले तरी कान टवकारून कोणावर कुठला शब्द येतो आणि कोण कुठून सुरुवात करतो याकडे लक्ष ठेवले जाते. भेंड्या खेळतानाचा फायदा म्हणजे इथे तुमचा सूर, ताल, आवाज बघायला वा ऐकायला कोणी येत नाही. फक्त गाण्याची माहिती आणि भरपूर स्टॉक असलेला, योग्य वेळी गाणं आठवणारा तुमच्या ग्रुप मधला एखादा भसाड्या आवाजाचा तो किंवा ती देखील त्या प्रसंगी भाव खाऊन जाते/जातो.

नव्वदच्या दशकात खासगी  वाहिन्यानी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि मनोरंजनाचे नवे दालन घरबसल्या प्रेक्षकांसाठी खुले झाले. यात झी टीव्हीचा मोठा पुढाकार होता. त्यांनी भेंडीच्या या खेळाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले आणि हा हा म्हणता हा खेळ घरोघरी रंगला. त्यावेळी मराठी रसिकांना उमजले की आपण वर्षानुवर्षे ज्याला 'भेंड्यांचा खेळ" म्हणत होतो त्याला हिंदीत अंताक्षरी असे म्हणतात. त्यावेळी अंताक्षरी चे टायटल सॉंग अजून आठवते. हम एक गीत गा चुके है, अब तेरी है बारी, जो तू ना गा सका तो तेरी टीम है हारी, ये है अंताक्षरी.....

भेंड्याना नवा लुक, सतत सुचत जाणाऱ्या विविध प्रकारच्या नवनवीन राऊंड, नवीन तंत्रज्ञानाने त्यात भर घालत वेळोवेळी ऑडिओ-व्हिडिओ च्या साहाय्याने त्यात भर घालत आलेली रंजकता आणि आबाल वृद्धापासून ते लहान थोरांपर्यंत यात भाग घेण्यास वयाचे नसलेले बंधन हे देखील अंताक्षरी लोकप्रिय होण्याचे एक कारण आहे. या अंताक्षरी ची कीर्ती भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि घराघरात खेळला जाणारा हा खेळ सोसायटी, शाळा, कॉलेज, ऑफिसच्या विविध सभा, संमेलनातून रंगायला लागला. परदेशातही त्याचे लोण पसरले आणि देशोदेशीच्या मंडळातून वार्षिक इव्हेंट होऊन बसला.

               अबुधाबी मंडळाच्या अंताक्षरी ला साधारण 90 मध्ये सुरुवात झाली. त्याआधी आम्ही एकदा न्यू मेडिकल सेंटर च्या 19 व्या मजल्यावर एकदा AGM ला 15-20 हिंदी गाण्यांची लिस्ट करून Musical Housiee चा प्रयोग केला होता आणि तो चांगलाच यशस्वी झाला होता.

त्यानंतर दरवर्षी अंताक्षरी घेण्याची कल्पना निघाली. एक तर हिंदी चित्रपट आणि गाणी हा सर्वांचा आवडीचा विषय . दुसरे त्यावेळेला मंडळाच्या सभासदांची संख्या मर्यादित असल्याने कमिटीला त्यासाठी कुठेही हॉल वगैरे घेण्याची आवश्यकता नसायची. बऱ्यापैकी मोठा हॉल असलेल्या कुठल्याही सभासदाच्या घरी हा कार्यक्रम होऊ शकत असे. तेव्हा कॉम्प्युटर युग सुरू व्हायचे होते, त्यामुळे इंटरनेट वगैरेचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडील ऑडीओ व्हिडीओ कॅसेट वरील गाणी टेपरेकॉर्डर वर व व्हिडीओ प्लेअर वर प्ले करत असू. शिवाय चिठ्ठ्या राऊंड हा सोपा राऊंड होताच. त्यातल्या त्यात हिंदी मराठी सिनेमाचे बऱ्यापैकी नॉलेज असलेला 'ज्ञानी' समजला जात असे. पण जाणकार मात्र बरेच होते. त्यामुळे उत्साहाने लोकं यात भाग घेत घेत.

बझर चे आगमन अजून झाले नव्हते त्यामुळे जो पहिल्यांदा हात वर करेल त्याला उत्तर द्यायचा पहिला चान्स मिळत असे. मग कोणी हात आधी वर केला होता यावर लक्ष ठेवण्यासाठी विश्वस्तांची नेमणूक केली जायची पण त्यातही भाग घेणारे आणि विश्वस्तांचे तू तू मै मै व्हायचेच. पण शेवटी पंचांचा निर्णय अंतिम असे सांगून मामला मिटवला जायचा आणि  सुज्ञपणे पुढे गेम सुरू व्हायचा. ओव्हर एक्ससायटेड सभासद तेव्हाही असायचेच. पण ती कार्यक्रमाची एक्ससायटमेंट असायची, पण यामुळे कार्यक्रमाची रंगत मात्र वाढायची. २-३ गुरुवार शुक्रवारी प्राथमिक फेरी झाल्या की अंतिम फेरी बघण्यासाठी देखील खूप गर्दी व्हायची. प्रायझेस देखील साधे असायचे. कधी पेन-डायरी तर कधी ब्लॅक ऑडिओ किंवा विडिओ कॅसेटचा संच पण मंडळाच्या अंताक्षरीचा विजेता होणे हे सर्वात मोठे प्राइझ असायचे.

१९९५ तर काँप्युटर, इंटरनेट चे आगमन झाले (त्याआधी ऑडिओ व्हिडीओ सीडी चे आगमन झालेच होते). मंडळात IT प्रोफेशनल यायला लागले. त्यांनी मग लॅपटॉप वर अंताक्षरी घ्यायला सुरुवात केली. सर्व राउंड घेणे सोपे झाले. चिठ्ठयांच्या ऐवजी पेपरलेस अंताक्षरी पर्यंत मजल गेली. दरवर्षी कोणी ना कोणी तरी कल्पकतेने वेगवेगळ्या राऊंड घ्यायचे त्यामुळे प्रत्येक वर्षी अंताक्षरी ही रंगायचीच. या कल्पकतेची नोंद ठेवली असती तर आज २५-३० आयडिया च्या कल्पना सहज मिळाल्या असत्या.

या बरोबरच ह्या अंताक्षरी कंडक्ट करण्यासाठी कमिटी मेंबर्स पैकी कोणीतरी हिरीरीने पुढे यायचे. त्यांच्यातील उत्साह वाखाणण्यासारखा असायचा. काही अतिउत्साही मेम्बर्स ओव्हर एक्सायटमेंट मध्ये चुका करीत धमाल करायचे आणि उपस्थितांची चांगलीच करमणूक व्हायची. अरमान किंवा आसमान सारखे शब्द शेवटी आल्यावर तो अरमाँ किंवा आसमाँ म्हणून म द्यायचा की न द्यायचा यावर वाद व्हायचा आणि पंचांची पंचाइत व्हायची.

पुढे ह्याच पंचांना टीव्ही वरील इतर कार्यक्रम पाहून 'महागुरू' म्हणून संबोधले जाऊ लागले आणि त्यांची जबाबदारी आणखीन वाढली.

आज मंडळाच्या सभासदांची संख्या वाढल्याने ISC मिनी हॉल किंवा तत्सम ठिकाणी अंताक्षरी घेण्याशिवाय पर्याय नसतो. तंत्रज्ञान देखील खूप पुढे गेले आहे. त्यामुळे लॅपटॉप बरोबरच वेगळा स्क्रीन, प्रत्येकाच्या हातात माईक, मिक्सर, अम्प्लिफायर या शिवाय अंताक्षरी पूर्ण होत नाही. आजही अंताक्षरीची घोषणा झाली की त्याच उत्साहाने लोकं भाग घेतात. पूर्वी जोडीदारा सकट नावं दयायचे, मग स्ट्रॉंग जोडीदार घेऊन तेच विजेते होऊ लागल्यावर जोडीदाराचा ड्रॉ पाडायला लागले आता तर लिंक वर नाव रजिस्टर करतात. कमिटी मेंबर पैकी कोणीतरी त्याच उत्साहाने लीड करतो. आणि मग अंताक्षरीचा खेळ रंगतो. राग, रुसवे, वाद, अर्ग्युमेंट्स आजही होतात पण ते तेवढ्यापुरतेच राहतात. एकदा अंताक्षरी चा खेळ सुरू झाला की त्यात सर्व रंगतात आणि विजेता होण्याची स्वप्ने पाहतात. शेवटी कोणीतरी एखादी जोडी विजेती होते. त्यांच्या आनंदाला पारावार राहात नाही. अभिनंदाच्या वर्षावात ते भिजून निघतात. WA, FB वर फोटो, बातमी share केली जाते.

भारत आणि त्याच्या आसपासच्या देशात जिथे हिंदी आणि स्थानिक भाषांत संगीताचे धुमारे फुटतात, जिथल्या मातीला संगीताचा गंध येतो. जिथल्या लोकांच्या नसानसात संगीत आणि गाणे सळसळते आहे अशा ठिकाणी हा अंताक्षरीचा खेळ अनंत काळापर्यंत रंगणार आहे. पाश्चात्य देशात संगीताची परंपरा असली तरी अंताक्षरी सारखा खेळ खेळला जात असेल का? हा प्रश्न जिज्ञासा निर्माण करतो. पण नसेलच तर अंताक्षरी ही भारताने जगाला दिलेली निर्भेळ करमणूक आहे. निदान त्याचे पेटंट तरी आपल्याकडे असायला हवे.

प्रशांत कुलकर्णी

No comments:

Post a Comment