"लॉक डाउन"
कामवाली:- हॅलो ताई, मी
बोलतेय कोमल.
ताई:- कोमल? काय
ग काय म्हणतेस? तुला किती वेळा फोन करायचा. निदान
माझे कॉल बघून मिस कॉल तरी देत जा. मग मी करीन परत कॉल.
को:- ताई, मी
पण तुम्हाला चार मिस कॉल दिले की पन तुम्ही येकदा बी नाही रिप्लाय केला.
ताई:- अगं मी ऑफिस चे काम घरी आणलंय ना,
work from home. म्हणून कदाचित ऐकायला आला नसेल फोन. बरं मला एक
सांग, तू कधी येणार आहेस कामाला
आमच्याकडे?
को:- ताई, माझंही
तुमच्यासारखेच वर्क फ्रॉम होम सूरू आहे.
ताई:- म्हणजे?
को:- माज्या घरातच राहून माज्याच घरातली कामं करायची
येळ आली हाय माज्यावर! सवय नाही ना सोताच्या घरात काम करायची.
ताई:- मग फोन करून येणार नाही तसे कळवायचे तरी
ना आम्हाला. तुम्हा लोकांना ना काही मॅनर्सच नाहीत.
को:- ताई, मगाशी
सांगितलं ना तुम्हाला, चार मिस कॉल दिले पण
तुमचे उत्तरच नाही. माझा बॅलन्स पण संपला होता. रिचार्ज करायला पण पैसे नाहीत.
ताई:- मग सांगायचे ना तसे. मला कसे कळणार तुझा
बॅलन्स संपला ते? मग?
को:- मग काय? मी
सरळ साहेबांना मिस कॉल दिला. त्याचा लगेच रिप्लाय आला. लय आपुलकीने चवकशी केली. आणि
दोन मिनिटात फोन रिचार्ज पण करून दिला.
ताई:- काय? साहेबांनी
दोन मिनिटात रिचार्ज करून दिला तुला फोन? मला
दहा वेळा आठवण करून द्यावी लागते त्याला रिचार्ज करण्यासाठी. येऊन दे घरी. आज
बघतेच मी त्याला.
को:- साहेब लई चांगले आहेत सोभवाने. व्हाटस अप
वर रोज चांगल्या पोस्ट पाठवत असतात.
ताई:- काय? म्हणजे
व्हाटस अप वर तुम्ही मेसेज पाठवता एकमेकांना? अन
मला म्हणतो तू खूप ग्रुप वर आहेस माझ्या. सारखं लक्ष असतं तुझं माझ्या पोस्टवर.
को:- माझ्या एफबी वर परवाच फ्रेंड रिक्वेस्ट
पाठवली ना त्यांनी. त्यांनी तर उघडून दिलंय FB वर
अकाउंट मला.
ताई:- काय? माझ्या
नवऱ्याने फेस बुक वर तुला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली? गेले
वर्षभर माझी रिक्वेस्ट पेंडिंग ठेवलीय त्यानं. घरात एकत्र राहात असताना आणखीन FB
वर
कशाला म्हणे? आणि तुला मात्र लगेच..... अगं
तुला हे बघायला वेळ तरी कधी मिळतो? या
लोकडाऊन मुळे आम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाही.
को:- अवो ताई, या
लॉकडाउन मुळे तर आमाला येळ मिळायला लागला आहे की सोतासाठी. एवढे दिवस तर दिवसभर
नुसती धावपळ चालायची या सोसायटीतून त्यात सोसायटीत आणि या घरातून त्या घरात. आता
कुठे सोतासाठी येळ मिळतोय. त्यात मी हे शिकून घेतेय.
ताई:- अगं पण घरात तुझी सर्व कामे आम्हाला करावी
लागतात त्याचं काय? धुणे,
भांडी,
लादीपोचा,
डस्टिंग.
शिवाय रोजचा स्वयंपाक आहेच तीन वेळचा. त्यात आता ऑफिस चे काम पण घरूनच करावे
लागते. माझा जीव मेटाकुटीला आलाय गं. ये बाई लवकर कामाला.
को:- आता लोकडाऊन उठल्याशिवाय तर येता येणार
नाही ना ताई? शिवाय तुमच्या सोसायटीत पण
आम्हाला यायला बंदी आहे. आणखीन काही दिवस तुम्हालाच करावे लागेल हे सर्व असे
दिसतंय. पगार घ्यायला येऊ का उद्या?
ताई:- पगार? अगं
गेली तीन महिने आम्हीच तुझी सर्व कामं करतोय. तूच द्यायला पाहिजे आम्हाला पगार. दर महिन्याचा पगार मात्र तू न चुकता घेणार,
कशाबद्दल?
को:- असं काय करताय ताई? आम्ही
आपणहून घरी बसलोय का? सरकारच्या आदेशाचे
पालनच करतोय ना? त्यांनीच तर सांगितलं आहे की
पगार कापू नका म्हणून. मला बी लै कंटाळा आलाय हे वर्क फ्रॉम होम करून. काही
गॉस्सीपिंग पण करायला मिळत नाही. मी यायला तयार आहे पण तुम्हीच नको म्हणालात मागे.
परवाच आमच्या वाडीत एक केस सापडली कोरोना ची. समदा एरिया सील केलाय दोन
आठवड्यासाठी. तो संपला की येते.
ताई:- अगं, एवढी
घाई नाही आहे. तीन महिने काढलेच ना कसेबसे. आणखी काढू. पण तू नको येऊ. मी सांगते
साहेबांना तुझा पगार तुझ्या अकाउंट ला ट्रान्सफर करायला. तुझा अकाउंट नंबर पाठव
मला.
को:- तो आहे की साहेबांकडे. मागे माजे इजेचे बिल
त्याच अकाउंट मधून भरून दिले साहेबांनी.
ताई:- काय साहेबांनी तुझे इलेक्ट्रिसिटी बिल पण
भरले! केव्हा?
को:- तो प्रॉपर्टी टॅक्स भरायचा होता ना ऑनलाइन
त्यावेळी. म्हणाले ,"कशाला
उगाच लायनीत उभी राहते?" लई
दयाळू आहेत साहेब.
ताई:- तुझा प्रॉपर्टी टॅक्स तू ऑनलाइन भरते?
आणि
साहेबांनी तो भरून दिला? मी
परवा त्याला ऑनलाइन भरायला सांगितला तर एरर येतोय म्हणाला. शेवटी मी तीन तास
इनलाईन मध्ये उभी राहून टॅक्स भरून आले आणि तुझा ऑनलाइन भरला?
येऊ
दे त्याला घरी चांगलंच लायनिवर आणते. तुझे आणखीन काही टॅक्स-बिलं भरायची असली तर
विनासंकोच सांग हा बाई.
को:- त्याची गरज नाही बाईसाहेब आता. या तीन
महिन्यात मीच सर्व शिकून घेतलंय मुलीकडून. ठेवू का फोन. माझ्या ऑनलाइन क्लास ची
वेळ झालीय.
ताई:- आता कसला कोर्स करते तू ऑनलाईन?
को:- गाणं शिकतेय.पंडित भास्करबुवा यांच्याकडून.
रोज एक तास शिकवतात ते ऑनलाइन. गळ्यात गोडवा आहे असे म्हणत होते.
ताई:- कोण?पं
डित भास्करबुवा असे म्हणत होते?
को:- नाही, आपलेच
साहेब म्हणाले होते मागे. मी एकदा काम करताना गाणे म्हणत होते ना तेव्हा. ते
गळ्यात गंधार की काय असे म्हणाले होते. तेव्हा मी पण म्हंटले, लॉक डाउन मध्ये आता
चांगला चान्स आहे गाणं शिकायचा. नंतर आहेच आपलं रडगाणं. बरं ताई,
फोन
ठेवते आता. सर आलेत ऑनलाइन. ताई, तुम्ही
काय शिकलात नवीन लॉक डाउन मध्ये?
ताई:- मी? मी
ना नवऱ्यावर लक्ष ठेवायला शिकले लॉक डाउन मध्ये. चल ठेव फोन. काम ना धाम उगीच
गावच्या चौकश्या. (फोन आपटते)
😊
समाप्त😊
लेखक:-प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी
No comments:
Post a Comment