Wednesday, July 12, 2017

कोण पापी ? कोण पुण्यवान

एक छोटसं खेडेगाव होतं. अशाच गावांमधे असतं, तसंच ह्या गावाच्या बाहेर एक खूप जुनं असंः देवीचं शिवकालीन मंदीर होतं. ते तसं छोटसं परंतु सुबक, सुंदर आणि टुमदार होत. लांबूनच देवळाचा उंच कळस दिसत असे. देवीचा गाभारा तसा लहानच होता पण सभामंडप चांगला मोठा होता.

असंच एकदा ते पावासाळ्याचे दिवस होते. गावाच्या ह्या देवळात देवीचा उत्सव होता. साहजीकच गावात सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसत होतं. देवीच्या दर्शनासाठी - विशेषतः सकाळी संध्याकाळी - गावातल्या लोकांची लगबग, धावपळ चाललेली दिसत असे ती पूजेची सजावट आरतीची धामधूम देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने पदरात पाडून घेण्यासाठी !

अशाच एका संध्याकाळच्या वेळी मंदिराकडे लोकांची गर्दी लगबगीने चाललेली दिसत होती.  त्या गर्दीत गावातले सर्व प्रकारचे लोक दिसत होते, त्यात लहान मोठे, तरणे ताठे, बाया बापड्या असे सर्व प्रकारचे लोक दिसत होते. साहजीकच त्या गर्दीत काही म्हातारी मंडळीही दिसत होती. हे म्हातारे लोक बिचारे काळजीपूर्वक आणि ऐकमेकांच्या आधाराने, एकमेकांना मदत करत हळू हळू, सावकाश चालतांना  दिसत होते. त्या गर्दीतच आपल्या हातातली काठी टेकत टेकत एक जख्ख म्हातारी, कमरेत वाकलेली आजीबाई - तिची मान डुगू डुगू हलत, अगदी हळूहळू चालत होती. ती मधूनमधून थांबून देऊळ अजून किती लांब राहिले आहे ह्याचा अंदाज घेत होती. साहजीकच ती म्हातारी बाई एकतर एकटी होती आणि मागे पडत होती. ते बघून काही उत्साही पोरं त्या म्हातार्या आजीबाईच्या मदतीला धावून येत आणि तिला ओढत ओढतच पुढे आणण्याचा प्रयत्न करीत. म्हातारीला बिचारीला ही ओढाताणी, धसमुसळ सहन होत नसे. ती हात जोडून म्हणायची - "पोरांनो, जरा हळूरे. मला तुमच्यासारखं भराभर नाहीरे चालता येत. येईन मी बापडी जमेल तसं हळूळू !"

हे बघून रस्त्यातल्या काही बाया तिला म्हणाल्या "कशाला आलीस म्हातारे ? चालायला येवढा त्रास होतोय तर घरीच नाहीका बसायच देवाचं नाव घेत?" यावर म्हातारी बिचारी काही बोलली नाही. तसं तिच्या बिचारीशी कोणीच धड तर बोलतच नव्हतेच. कुणाशी काही बोलता, म्हातारी आपली काठी टेकत टेकत, पाय ओढत ओढत, हळूहळू पण नेटाने चालतच होती. आता देऊळ दिसायला लागलं होतं, जवळ आलंसं वाटू लागलं होतं.

पण येवढ्यात काय झालं की वारं सुटलं,बघता बघता आकाशात ढग दाटून यायला सुरुवात झाली, अंधारून आलं आणि तशीच पावसाला सुरुवातही झाली. त्यातच आकाशात विजा चमकू लागल्या, कडाकड कडकडकड आवाज येऊ लागले, विजा पडू लागल्या. झालं. लोकांची धावपळ सुरू झाली, लोक एकमेकांना आवाज देऊ लागले, सर्वजण एका चिंचेच्या मोठ्या झाडाखाली आसर्याला येऊन थांबले.

खूप वेळ पाऊस कोसळतच होता. मोठमोठ्या विजांचा जीवघेणा कडकडाट चालूच होता. जरा वेळाने हळूहळू पावसाचा जोर थोडा कमी होवू लागला. तसतसे लोक आता हाकेच्या अंतरावर असलेल्या, पाच मिनिटांवर आलेल्या देवळाकडे धावत धावत जावू लागले. पोरं अर्थातच सर्वात पुढे धावत गेली यात नवल नाही. पुरुष मंडळी झपझप देवळात पोचली. मागोमाग बायामाणसंही निघाल्या.


ती म्हातारी काकुळतीने विनवणी करत होती - "अग अक्का मलापण घेऊन चल , अग मावशे माझा हात धर, मी पण येते तुझ्या बरोबर........." पण कोणीच तिच्याकडे लक्श्य दिलं नाही. उलट एक ठमाकाकू म्हणाली "तू खूप पापं केलेली दिसताहेत, म्हणूना तुला ऐकटीला पावसात ह्या झाडाखाली थांबाव लागतय, तुला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. मात्र आम्ही सगळ्यांनी काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून आम्ही तरी देवळाचा आसरा घेऊ शकतोय !" इकडे म्हातारी एकटीच झाडाखाली राहिली. बाकी सर्व मंडळी देवळात पोहोचलीसुध्दा. म्हातारी बिचारी एकटीच, थंडीत कुडकुडत, पावसात भिजत, थरथरत, झाडाखाली बसून राहिली.

देवळात पोहोचलेल्या लोकांपैकी एक वयस्कसा भला माणूस मात्र विचार करत होता. त्याच्या मनात विचार आला "आपण इथे देवळात सुरक्शित आहोत पण ती बिचारी म्हातारी मात्र एकटीच भिजत झाडाखाली बसलीय. कोणीही तिचा विचार करायला तयार नाही. हे काही बरोबर नाही. आपणच जाऊन त्या म्हातारीला इथे देवळात आणूया." असे म्हणून तो भला माणूस देवळाबाहेर पडला आणि म्हातारी बसली होती त्या झाडाकडे चालू लागला.

तो चार आठ पावलं चालला असेल नसेल तोच वीज पडल्याचा मोठ्ठा आवाज आला. मागे वळून बघतो तो त्याला भयानाक द्रश्य दिसले - त्या देवळावरच वीज पडली होती, देऊळ पडले होते आणि देवळाला मोठी आग लागल्याचे दिसत होते.

सद् विचार करून जो माणूस म्हातारीला मदत करण्याच्या हेतूने देवळाबाहेर पडला होता, तो मोठ्या जीवघेण्या संकटातून आश्चर्यकारकरित्या वाचला होता. जिला लोकांनी पापी ठरवले होते ती विकलांग म्हातारीदेखील वाचली होती.

ती म्हातारी तिला वाचविण्यासाठी निघालेला तो दयाळू माणूस हेच फक्त दोघे पुण्यवान ठरले म्हणायचे !


सौ. निर्मला महाजन

No comments:

Post a Comment