Monday, June 25, 2018

संपादकीय - बहर - जून महिना प्रकाशन

 
नमस्कार मंडळी ,
 
महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या जिव्हाळयाचे असलेल्या "बहर" ह्या मासिकाच्या जून महिन्याच्या अंकात खालील साहित्य आम्ही प्रकाशित करत आहोत.
  •    रम्य ते बालपणसौ. मृणाल सागर कुमठेकर
  •    आमची सुट्टी सौ. नम्रता नितीन देव
  •      वेडावलेला पाऊससौ. रुपाली मावजो किर्तनी
  •      संक्रमणसौ. विद्या श्रीकांत भट
  •     भेट श्रावणधारांची -  डॉ सौ. पल्लवी बारटके
  •      बालपण देगा देवा-  सौ. निहारिका सावरकर 
  •        शाळा - श्री. मनोज करंदीकर
  •        बाळपणीचा काळ सुखाचा श्री. अजय पडवळ
  •        आठवणीतील पहिला पाऊसश्री. शैलेश मालुसर
  •     दुर्गभ्रमंती - श्री सारंग अपाट
  •     प्रलय - पुस्तक परीक्षण - श्री मंदार आपटे
  
मंडळी, आपल्या सूचना तसेच प्रकाशित केलेल्या साहित्याबाबतीत असलेले मत अथवा अभिप्राय आम्हापर्यंत नक्की पोहचवा
सर्व लेखक आणि वाचक मंडळींचे धन्यवाद.

आपले विनम्र,

महाराष्ट्र मंडळ अबूधाबी
कार्यकारी समिती २०१८-२०१९.

संपादक मंडळ -  सौ. रचना महेंद्र गाडगे आणि
                               श्री  संतोष दगडू राक्षे.



संक्रमण.....

 
      बहरच्या संपादकांचा बहरसाठी साहित्य पाठविण्याचा संवादसंदेश वाचला. खूप छान शब्दात मांडलेला हा संवाद मनाला भिडला आणि मधे नकळत खूप दिवस रुसलेली लेखणी सर सर बरसू लागली अगदी ऋतुबदलाच्या पावसासारखी. 

     खरंच मे ते जून हा प्रवास संक्रमणाचा, बदलाचा... तप्त धरतीने तृप्त हिरवाईची शाल पांघरायचा. मनमर्जी सुट्टी ते शिस्तबद्ध नियमित शाळेचा, आईच्या पदराखालून कधी बालवाडीच्या टप्प्यावर शाळेच्या ‘ होम अवे फ्रॉम होम’ च्या प्रांगणात पाऊल टाकण्याचा तर 12 वीच्या टप्प्यावर शाळेच्या सुरक्षित विश्वातून, अज्ञान कुमार अवस्थेतून बाहेरच्या जगाच्या अफाट विश्वात, सज्ञान यौवनावस्थेत पाऊल टाकण्याचा.

      हे दोन्हीही टप्पे खरंतर आई आणि बाळ दोघांसाठीही तितकेच महत्त्वाचे आणि हळवे करणारे ... एका टप्प्यावर आपल्या बाळाच्या पंखात शिक्षणाचे, ज्ञानाचे बळ यावे म्हणून बाळाच्या बोटाला धरून, कडेवर घेऊन बाळाला शाळेच्या प्रांगणात सोडते. बाळ परत परत आईला मिठी मारतं, रडतं. तरी ती मोठ्या कष्टाने त्याचे चिमुकले हात बाजूला करते आणि मोठ्या धैर्याने शाळेत त्याला सोडून पाठ फिरवून घरी येते. रडणाऱ्या बाळाला धीर देते. डोळ्यातले पाणी त्याला दिसू न देता प्रयत्नपूर्वक बाजूला सरते.... तर दुसऱ्या टप्प्यावर हेच बाळ रडणाऱ्या आईला जवळ घेतं. अग मी होस्टेलमध्ये घेईन काळजी स्वतःची , तू नको काळजी करू. मी आता मोठा/ मोठी झालो/ झाली आहे म्हणत maturity च्या एका अनोख्या जाणीवेने आईला धीर देते. डोळ्यातले पाणी तिला दिसू न देता आपल्या ध्येयाच्या दिशेने पावलं टाकतं. आईकडे मोठ्या निकराने पाठ फिरवतं. त्यातून हे बाळ आईचं एकुलतं एक किंवा पहिलं बाळ असेल तर आईसाठी हे टप्पे तसे खडतरचं. याचा अर्थ दुसऱ्या बाळासाठी वाईट अथवा काळजी वाटतं नाही असं नाही फक्त मनाची तयारी झालेली असते इतकचं. बाळ किलकिल्या डोळ्यांनी आईकडे बघून ओळखीचं हसायला लागतं, तिचा स्पर्श ओळखायला लागतं, दुसऱ्या अनोळखी व्यक्तीकडे बघून पटकन मुरकी मारतं, रांगणे, उभे राहणे, चालणे, बोलणे हे सगळे टप्पे ओलांडतं चार पाच वर्षे कशी झपाट्याने सरतात ते कळतंच नाही आणि मग उभा राहतो पहिला टप्पा संक्रमणाचा....

      आईचे बोट सोडून, घरातला मनमानी कारभार सोडून शाळेच्या थोड्याश्या शिस्तबद्ध विश्वात पाऊल टाकण्याचा. शाळेच्या प्रवेशद्वारावरून पळून येऊन, आईच्या मागे दडून, रडून गोंधळ घालून, ‘ मला नाही शाळेत जायचं, मला काही नको, नवीन डबा , दप्तर नको, आवडीचा खाऊ नको, काही काही नको, फक्त तू हवीस ‘ म्हणत आईच्या कमरेला घट्ट मिठी मारण्याचा . आई ही चिमुकली मिठी सोडवते आणि बाळाला ज्ञानाची, शिक्षणाची कवाडं उघडी करून देते.

      बाळ हळूहळू या विश्वात रमायला लागतं, मित्रमैत्रिणी मिळतात, शिक्षकांशी गट्टी जमते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ब्रह्मवाक्य वाटायला लागते. आमच्या मॅडमनी/ सरांनी असेच सांगितले आहे आणि तेच बरोबर आहे. असं म्हणतं म्हणतं दहा बारा वर्षे कशी सरतात तेच कळत नाही आणि मग काहींच्या विश्वात उभा राहतो संक्रमणाचा दुसरा टप्पा... शाळा/ ज्युनिअर कॉलेजच्या शिस्तबद्ध आखीव रेखीव आयुष्यातून आपल्या ध्येयाच्या दिशेने स्वयंशिस्तीच्या आयुष्यात पाऊल टाकण्याचा.....

      या टप्प्यावर बाळाला सोडताना मात्र आई थोडीशी धास्तावते. बाळाच्या पंखात बळ तर आले आहे पण अजूनही नेमकी दिशा त्याला सापडायची आहे. त्या दिशेकडे झेपावत असताना ते कुठे भलत्याच दिशेला भरकटणारं तर नाही ना ही अनामिक भीती तिला अस्वस्थ करत असते. आतापर्यंत पिल्लू नजरेसमोर होतं, घरट्याच्या दारापासून घरटं असलेल्या झाडाच्या फांदीपर्यंतच त्याची भरारी होती. त्याचे सवंगडी पण माहितीचे , नजरेखालचे होते. आता पिल्लाचे विश्व विस्तारणार आहे. सारं आकाश त्याला भरारी मारण्यासाठी साद घालत असणारं आहे. त्या आकाशाला गवसणी घालत असताना येणाऱ्या वाऱ्यापावसाने ते कोलमडून तर पडणार नाही ना? या प्रवासात भेटणाऱ्या एखादं दुसऱ्या सहप्रवाशाच्या नादाने ते दुसऱ्याच वाटेवर वाट तर चुकणार नाही ना? भरारी मारताना ते त्याच्या घरट्याला विसरणार तर नाही ना ? त्याला आवडता खाऊ पोटभर मिळेल का ? त्याच्याशी ते कसं जुळवून घेईल ? या अश्या अनेक शंकाकुशंकांनी तिचं मनं काहूरलेलं असतं. डोळे नकळत भरून येत असतात. बाळाची कमरेला पडलेली चिमुकली मिठी मोठ्या निकराने सोडवणारी ती माऊली या टप्प्यावर मात्र मोठ्या झालेल्या बाळाला मिठीत बद्ध करण्याचा असफल प्रयत्न करत असते. मग बाळच तिला मिठीत घेतं, ‘ नीट राहीन ग मी, कशाला काळजी करतेस माझी, तू तुझी आणि बाबाची काळजी घे’ असं म्हणत तिला दिलासा द्यायचा प्रयत्न करतं. बाळाच्या या अनोख्या mature रूपाने ती सुखावते, त्याच्या कौतुकाने, अभिमानाने तिचे डोळे भरून येत असतात. आणि बाळ तिच्या डोळ्यातले अश्रू पुसताना तिला अजून वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवतं ...

        खरंतर आईइतकाचं बाळासाठीही हा टप्पा मनात उत्सुकता आणि जबाबदारी या उनपावसाचा खेळ मांडणाराच असतो. वेळेत घरी परतलो नाही म्हणून पडणाऱ्या आईबाबांच्या ओरड्याच टेन्शन नसणार हा आनंद जितका सुखावणारा तितकीच घरी परतल्यावर वाट बघणारं, पावसात भिजून आल्यावर गरम गरम चहाचा कप समोर करणारं, आपलं सगळं न कंटाळता शांतपणे ऐकून घेणारं कुणी नसणारं ही जाणीव ही हुरहूर लावणारी. वाढदिवसाला मित्रमैत्रिणींबरोबर मनमुराद धुमधमाल करत असताना वाढदिवसासाठी खास आपल्या आवडीचा पदार्थ करणाऱ्या, औक्षण करून आपल्या उदंड यशाची आणि आयुष्याची प्रार्थना करणाऱ्या आईशी मात्र virtual संवाद साधत समाधान मानावं लागणार, कधीकधी मेसमधली बेचव, न आवडीचे जेवण आईच्या हातच्या चविष्ठ जेवणाच्या आठवणींवर गोड मानुन घ्यावं लागणारं ही सारी सारी विचारांची वादळं डोक्यात घोंगावत असतात....

        २६ मे ला १२ विचा result लागला आणि आज मी आणि माझा मुलगा ज्यावेळी या टप्प्यावर उभे आहोत त्या वेळी या गोष्टी, ही संक्रमणे मला प्रकर्षाने जाणवतं आहेत.... ही संक्रमणे त्याच्या कल्याणासाठीच आहेत हे ही कळतंय आणि तो ही हे सगळं यशस्वीपणे निभावून नेईल ही खात्री पण आहे तरीही मन उगाचच कातर होते आहे... त्याच्या इतकेच सगळे घरदारच या संक्रमणाच्या चाहुलीने भरून आलंय... जूनच्या पावसाळी संक्रमणाच्या वेळी आकाश जसे गच्च दाटून येते तसेच काहीसे... हे दाटून आलेलं आकाश ज्यावेळी बरसून जाईल त्यावेळी हे संक्रमण सारे विश्व नव्या हिरवाईने समृद्ध आणि आल्हाददायक, मनाला मोहवणारं, बाप्पाच्या आशीर्वादाने नव्या टप्प्याचं सीमोल्लंघन ठरेल यात शंकाच नाही....



विद्या श्रीकांत भट

आमची सुट्टी


मे महिन्याची सुट्टी म्हणजे 
नुसती धमाल असायची 
खेळा-बागडा मज्जा करा 
अभ्यासाची काळजी नसायची 

सकाळी पोहायला शेतातल्या विहिरी 
चिमणीच्या दाताने खायच्या चिंचा आणि कैरी 
गोष्टींची पुस्तके खूप सारी वाचायची 
त्यातली जादू आणि परी अगदी खरी वाटायची 
सर्कस आणि बालनाट्ये सार्यांनी मिळून बघायची 
वेळ कसा घालवायचा ही चिंताच मुळी नसायची 

खरी  गम्मत असायची सुट्टीत आजोळी जाण्याची 
आगगाडीच्या खिडकीतून पळती झाडे पहाण्याची 
साऱ्या भावंडांनी मिळुन धमाल मस्ती करण्याची 
मामा मामीचे लाड आणि आजी आबांच्या प्रेमाची 

बघता बघता सुट्टी संपुन शाळा सुरु व्हायची 
नवीन पुस्तके गणवेष खरेदीची एकच धांदल उडायची 
नवा वर्ग नवे शिक्षक एक वेगळीच हुरहुर वाटायची 
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजायची 

आजही जून महिन्यात या आठवणी दाटून येतात 
येताना सोबत  माझे बालपण घेऊन येतात 
अलगदपणे मला पुन्हा भूतकाळात घेऊन जातात 
त्या गोड आठवांनी वर्तमान माझे प्रसन्न करून टाकतात 

                    ..............................सौ.नम्रता नितीन देव  

बालपणीचा काळ सुखाचा

                         बालपणीचा काळ सुखाचा असं लहानपणी इतरांनी लिहिलेलं वाचता वाचता स्वतः लिहायचा काळ कधी आला ते कळलेच नाही... आमच्या लहानपणी मे महिन्याची सुट्टी आणि कोकणातले गावचे घर हे एक अतूट समीकरण होतं. हे समीकरण कधी तुटेल असे त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते.... निदान नोकरीला लागेपर्यंत तरी. पुढे आयुष्यातील बरीच समीकरणे बदलतात आणि बदलली हा भाग वेगळा. पण गावाशी असलेली नाळ अजूनही तुटली नाही
असो... तर एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीची आम्हा भावंडांची एस्टीची तिकिटे काढलेली असत. वडील शिक्षक असल्याने त्यांना वेगळी सुट्टी काढावी लागत नसे. फार फार तर ते आणि आई आमच्या नंतर काही दिवसांनी शाळेचे निकाल घोषित झाल्यावर गावी येत. पण तसे पाहिले तर सर्वजण एकत्र सुट्टी घालवत होतो. त्या दीड दोन महिन्यांच्या कालावधीत वर्षभर पुरेल इतकी धमाल, मस्ती, भटकंतीची शिदोरी बांधून घेत होतो. गावी जायचे म्हटलं की अंगात एक वेगळाच उत्साह संचारायचा. परेलहुन संध्याकाळी निघालेली एस्टी दुसऱ्या दिवशी पहाटे गावी पोहोचायची. पण रात्रभर झोप म्हणून लागायची नाही. कधी एकदा घरी पोहोचतोय असे व्हायचे. रात्रभर आपल्या गाडीने इतर किती गाडयांना मागे टाकले, किती वाजले म्हणजे नेमके कुठपर्यंत पोहचू याचे ठोकताळे बांधण्यात झोपेचा विचारही यायचा नाही. पहाटे स्टॉपवर कोणीतरी घेण्यासाठी आलेलं असायचे. गाडीतून उतरले की थंडगार वारा कानात शिरला की मन प्रसन्न व्हायचे.

मौज मजेचे दिवस सुरु झालेलेच असत. दिवसभरात जितक्या activities होत त्यांच्यासाठी वेळ कमी पडत असे. आम्हा मुलांचा दिवस जरी सूर्यनारायण उगवल्यावर होत असला तरी घरात पहाटे .३० - पासूनच हालचाल सुरु झालेली असे. कोंबड्याच्या आरवण्याने सर्वात आधी आजोबा उठत. गाई-म्हशीचे दूध काढत. बाकीची गुरे जरी वाड्यात बांधलेली असत (हो... कोकणात आम्ही गुरे बांधण्याच्या गोठ्याला वाडाच म्हणतो), तरी दूध देणारी गाय किंवा म्हैस घराच्याच एखाद्या पडवीत किंवा खळ्यात (मांडव घातलेले अंगण) बांधलेली असे. दुभते वासरू घरातच. त्याची धडपड सुरु होई. दूध काढताना त्याची भांड्यात धार पडतानाचा होणारा सुरुवातीचा चर्र्रर्र्र्र....चर्र्रर्र्र्र....आवाज हळू हळू भांडे भरत आले की त्यात मिसळून जाई. त्यावरून किती काढले याचा अंदाज येई. आमचे डोळे मिटलेले असले तरी कान उघडेच असत. त्या कानात वासराच्या हंबरण्याचा, कोंबडा आरवण्याचा, बाहेर पक्षांच्या किलबिलाटाचा सर्व आवाज घुमत राहत. दूध काढून चरवी आजीच्या सुपूर्द केली जायची, आजी ते भांड्यात ओतून चुलीवर ठेवत असे आणि त्याच सोबत चहाचे आधणही.  





आजोबांचा चहा झाला की ते सर्व गुरांना घेऊन पाण्यावर घेऊन जात तिथून त्यांना रानात चरायला सोडत. आजीने वाड्यातले शेण, गवत साफ करून वाडा लोटून ठेवलेला असे. तोपर्यंत आमची अंथरुणे उठलेली असत. मुखमार्जन, चहा नास्ता झाला की आजोबांची न्याहारी घेऊन जायची, तिकडेच मग कलमांच्या बागेत जाऊन आंबा, नारळ यांना पाणी घालायचे. अशी काही ठराविक कामे झाली की मग गाव उंडारायला मोकळे. दुपार होईपर्यंत रानात सोडलेली गुरे परत वाड्यात येत. जी स्वतःहून येत नसत त्यांना शोधून आणायचे काम आमचे असायचे, त्या निमित्ताने आम्हालाही गाव भटकायला मिळे. पण ही आमच्यासारखीच उंडगी जनावरे त्यांच्या ठरलेल्या जागी सापडत. आणि त्या जागा आम्हाला पण सवयीने कळून येत.   

दुपारच्या जेवणानंतर सीमेवरच्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली कधी पत्ते, कधी विटीदांडू तर कधी लगोरी असे खेळ रंगायचे. आंब्याच्या झाडांनाही आकारानुसार, चवीनुसार विशिष्ट नावे असायची. धोदया, साखरी, खोबरी आणि अशी बरीच... खेळता खेळता अर्धे लक्ष वाऱ्याबरोबर पडणाऱ्या पिकलेल्या आंब्यांवर असायचे. अचानक पडलेला आंबा उचलण्यासाठी सर्वांची झटापट चालायची. पण मला मात्र झाडावर उंच असलेला आंबा दगड मारून पाडण्यात जास्त आनंद वाटे. हिरव्या पानांच्या, फांद्यांच्या आणि कैऱ्यांच्या घडामधून एखादा पिवळा धम्मक पिकलेला आंबा डोकावत असे. त्याला दगडाने टिपून पाडण्यात असुरी आनंद मिळत असे. आंब्यावर भिरकावलेला एखादा दगड लक्षाचा मार्ग चुकवून जवळच्या घराच्या कौलांवर जाऊन आदळायचा. की मग घरातून अप्पांचा, अण्णांचा, दाजींचा "कोण रं तो ...." असा दरडावणारा आवाज आला की धूम ठोकायची. घरची स्वतःची हापूस आंब्यांची बाग असून टोपल्या भरून घरी आंबे असूनही रायवळ आंब्यासाठीची ही धडपड एका वेगळ्या आनंदाची अनुभूती देत असे. असा कष्टाने मिळवलेला आंबा खाताना हाताच्या कोपरापर्यंत ओघळलेला रस ओरपताना भान हरपून जात असे. बाकीचे आंबे घरी नेऊन त्याचा रस काढून साट (आंबा पोळी) घालत. आणि मांडवावर सुकायला ठेवत

दुपारनंतर पुन्हा एकदा गुरांना पाण्यावर घेऊन जाण्याचे काम आम्हा मुलांचे असायचे. परत येताना सरळ घरी येऊ तर मुलं कसली..! जवळच्याच रानात झांकी मारून काजू, करवंद जे मिळेल ते गोळा करून आणायचे. अशातच संध्याकाळ व्हायची.

मामाचं गाव आणि माझं गाव एकच. त्यामुळे इतर मुलांसारखे खास मामाच्या गावी जाऊन धमाल मस्ती करायचे भाग्य आम्हाला लाभलं नाही. पण तरीही दिवसातून किमान एकतारी फेरी मामाच्या घरी व्हायचीच. एखाद्या दिवशी तिकडे जाणे जमले नाही तर दुसऱ्या दिवशी मामाची आई (हो... आईची आई.. आज्जी असली तरी आम्ही मामाची आईच म्हणायचो).. आम्ही मुले जिथे खेळत असायचो तिथे बांधावर येऊन माझी चौकशी करायची. माझ्यासाठी किमान अर्धी भाकरी तिने ठेवलेली असायचीच. तिने मातीच्या भांड्यात चुलीवर केलेल्या कोणत्याही भाजी किंवा वरणाची कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलच्या डिशला येणे शक्यच नाही.

रात्रंदिवस आम्ही अनेक खेळ खेळायचो. पण माझ्या आवडीचे दोन. एक विटीदांडू आणि दुसरा म्हणजे "भेकऱ्या खटोट्या". हा कसा खेळायचा तर ...जितके खेळाडू असतील त्यांच्या समसमान टीम करायच्या. ज्या टीमवर राज्य असेल त्यांनी दूरवरचे एक ठिकाण ठरवून तिथपर्यंत जाऊन यायचे. ते तिथे जाऊन परत येईपर्यंत पहिल्या टीमने माती, राख गोळा करायची.. (बऱ्याचदा वेळ वाचवण्यासाठी ती आधीच गोळा केलेली असे).. त्याच्या साहाय्याने कोणालाही सहज दिसणार नाही अशा जितक्या जमतील तितक्या छोट्या छोट्या पुंजक्या घालायच्या. राज्य असणारी टीम ठराविक जागी पोहोचून धावत धावत "भेकऱ्या खटोट्या..... भेकऱ्या खटोट्या..... " असे ओरडत यायची. त्यांना सापडतील तितक्या पुंजक्या त्यांनी पुसून टाकायच्या. ठरलेल्या वेळात अजून शोधाशोध करायची आणि उध्वस्त करायच्या. वेळ संपली की पहिल्या टीमने त्यांना सापडलेल्या पुसलेल्या पुंजक्या दाखवायच्या.. आणि मोजायच्या.. आत्ता हेच पुह्ना दोन्ही टीम आपापले रोल बदलून करायचे. शेवटी ज्यांच्या पुंजक्या जास्त भरतील ती टीम जिकंली. यात पुंजक्या कुठे काढायच्या आणि कुठे नाहीत (घरात.. माळ्यावर नाहीत) याचे नियम ठरलेले असत. जिंकण्यासाठी आम्ही कुठे कुठे पुंजक्या काढायचो... घराच्या कौलांवर, झाडाच्या फांद्यांवर, गवताच्या माचीखाली, सागाच्या भल्यामोठ्या पानांवर... आणि त्या झाकून लपवून ठेवायच्या.
रात्री जेवणं झाली की मांडवात अंथरुणं पडायची. सर्व चुलत भावंडे वगैरे एकत्र आलो की नाना (वडिलांचे चुलते) त्यांच्या काळातल्या शिकारीच्या गोष्टी सांगायचे. वाघ, हरणं, सांबर, डुक्कर, ससे कितीतरी प्राणी, जंगलातली ठिकाणे आमच्या परिचयाची वाटत. नाना अशा प्रकारे सांगायचे जणू आम्हीच त्यांच्यासोबत शिकार करत होतो.
एप्रिल-मे म्हणजे लग्नसराईचे दिवस. हळद, लग्न, वरातींची रेलचेल. आम्हा मुलांचा आवडीचा प्रकार म्हणजे तोरण धरणे. गावातून जाणारी असो की गावात येणारी वरात असो, गावात येणारा मुख्य रस्ता (तो आत्ता रस्ता झाला, आधी एक पाणंद होती) आमच्याच घरासमोरून जात असल्याने सर्व वराती तिथूनच जात. वरात येत असताना आम्ही मुलं एखादा टॉवेल किंवा चादर त्यात काही आंब्याची पाने ठेऊन, दोन बाजूंना धरून पाणंदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधावर उभे राहायचे. नवऱ्याने त्यात एक नारळ आणि विडा ठेवायचा आणि मगच नवरा नवरी आणि सर्व वरातीने  त्याखालून जायचे. ते सर्वजण निघून गेल्यावर तो नारळ फोडून खोबरं खायचं. विडा मात्र आजीला द्यायचा. हेच उद्योग.

ही सर्व धमाल मस्ती चालू असतानाच अचानक रात्रीचे काजवे दिसू लागत. आम्ही ते पकडून काचेच्या बाटलीत बंद करायचो. रात्रीच्या अंधारात चम-चम करणारे काजवे पाहिले की एका वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास व्हायचा.

एके दिवशी संध्याकाळचे मळभ दाटून यायचे. आणि सुट्टी संपत आल्याचे संकेत मिळायचे. वळवाच्या पावसाची चाहूल लागली की सर्वांची खास करून मोठ्या माणसांची धावपळ सुरु व्हायची. बाहेर सुकायला ठेवलेल्या गोवऱ्या, लाकडे खोपीत भरायची, गवताचे भारे वाड्यात किंवा उटी रचून ठेवायचे, मांडव कोसळायचे, पावसाच्या आधी भात पेरणीसाठी तरवे भाजणे अशा कामांना ऊत येई. आणि एकदाचा तो कोसळायचा. कधी कधी गारा बरसायच्या. आम्ही त्या वेचुन ठेवायला धडपड करायचो. पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने वैशाखाच्या वणव्यात तापून लालेलाल झालेली धरित्री थंडगार व्हायची. त्या मातीचा सुगंध आसमंतात दरवळायचा, श्वासात भरून उरायचा.

आणि अशातच सुट्टी संपून मुंबईला परत जाण्याचा दिवस उगवायचा. संध्याकाळची एसटी असायची. आमची सकाळपासूनच सामानाची बांधाबांध सुरु व्हायची. तांदूळ, आंबे, फणस, काजू... पोत्यात भरले जायचे. सर्वांचा निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणावायचे. पाय आणि मन मात्र हलायचे नाही. मला जितक्या वेळा आठवते त्या प्रत्येक वेळी आम्ही निघताना पाऊस असायचाच. तो सुद्धा धो धो. आम्हा सर्वांच्या डोळ्यातले पाणी दिसू नये म्हणून तो साथ द्यायला यायचा बहुतेक. एसटीत बसल्यावर गावी आल्यापासूनचा प्रत्येक दिवस आठवत राही. अशातच डोळे पेंगुळले होऊन कधीच झोपेच्या अधीन होत.


अजय पडवळ
(मु.वाळवड, ता. राजापूर, जि. रत्नागिरी)