Sunday, February 28, 2021

मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग--------अश्विन घाडगे

 

मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग

 

काही गाणी आपल्या हृदयाला आणि आत्म्याला स्पर्श करतात.  त्यातलाच एक मला भावलेले  ‘मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग ‘.  या गाण्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या अंतऱ्यात जमीन आस्मानचा फरक आहे. जर या गाण्याचा फक्त पहिला अंतरा  ऐकलं तर हे एखादे प्रेम गीत वाटू शकते पण दुसरा अंतरा ऐकला कि एक अस्वस्थ करणारी  भावना मनात निर्माण होते. प्रसिद्ध उर्दू शायर फैझ अहमद फैझ यांनी लिहिलेली ही कविता आपल्या जादुई स्वरांनी अजरामर केली ती  मलिका-ए-तरन्नुम मॅडम नूरजहाँ यांनी. मी काही उर्दू चा तज्ञ नाही. पण जेवढे मला कळले ते प्रेम आणि इन्कलाब यांचे अनोखे मिश्रण असलेल्या गाण्याबद्दल थोडेसे.

मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग

मैं ने समझा था कि तू है तो दरख़्शाँ है हयात

तेरा ग़म है तो ग़म-ए-दहर का झगड़ा क्या है

तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात

दरख़्शाँ म्हणजे लखलखीत किंवा तेजस्वी. मला वाटायचे कि तू आहेस तर हे जग झगमगणारे, लखलखीत आहे. जर तुझे दुःख माझ्याकडे आहे तर या जगाच्या दुःखाचे मला काय करायचे आहे. तुझ्या सौंदर्याच्या जादूने जणू काही ऋतू थांबले आहेत.

तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है

तू जो मिल जाए तो तक़दीर निगूँ हो जाए

यूँ न था, मैं ने फ़क़त चाहा था यूँ हो जाए

चिराग या हिंदी चित्रपटातील ''तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या हैं " या गाण्याची प्रेरणा गीतकाराला याच कवितेतून मिळाली.

निगूँ म्हणजे विनम्र किंवा झुकलेले. पुढे कवी म्हणतो कि असे काहीही नव्हते, मला वाटत होते कि असे व्हावे. 

                                        अन-गिनत सदियों के तारीक बहीमाना तिलिस्म

रेशम ओ अतलस ओ कमख़ाब में बुनवाए हुए

कवी ला बहुदा असे म्हणायचे आहे कि जी वर्षानुवर्षे चाललेली राजेशाही होती त्यात बरेच शोषण झाले. सर्व दुःख आणि यातना यांचा काळोख आपल्यासमोर मात्र नेहमी किमती वस्त्रात विणून पेश केला गेला.

जा-ब-जा बिकते हुए कूचा-ओ-बाज़ार में जिस्म

ख़ाक में लुथड़े हुए ख़ून में नहलाए हुए

याच तणाव, शोषण या मुळे जागो जागी त्यांची (कामगार वर्ग) हालत खूप वाईट झाली.  धुळीने आणि रक्ताने माकलेले असे खूप भयंकर चित्र कवी आपल्या डोळ्या समोर उभे करतो.

जा-ब-जा म्हणजे जागोजागी, कूचा-ओ-बाज़ार म्हणजे गली, कूचा आणि बाजार.

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे

अब भी दिलकश है तिरा हुस्न मगर क्या कीजे

प्रियकर म्हणतो "तुझे रूप मनमोहक आहे, पण मी काय करू माझे लक्ष यातना पीडितांकडेच जाते."

और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा

राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग

वस्ल म्हणजे मिलन. प्रियकर म्हणतो कि आपल्या मिलनाच्या सुखापेक्षा इतर जगात अनेक सुख आहेत. इतरांचे दुःख दूर करण्यात जे सुख आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे.

मॅडम नूरजहां यांनी हे गीत इतक लोकप्रिय केला कि एकदा फैझ अहमद  यांनी आपल्या नझमबद्दल "वो गीत अब मेरा कहां, नूरजहां का हो गया है" असे  सांगितले. "ते फक्त मी लिहिले होते. तिने तिच्या आत्म्याद्वारे त्याचा अर्थ लावला ते म्हणाले.

प्रीत----धनाग्रज

 

काय असते प्रीत

नक्की काय असते प्रीत?

प्रेमी जीवांमधील युगलगीत

पिढ्यान् पिढ्या चाललेली रीत

ती असते त्याचं संगीत

तो असतो तिचा मीत

प्रेमात असतं दोघांचं हित ||

बटाटा वडा--------सौ. शीतल अमित झळकीकर

 

बटाटा वडा

बटाटा वडा साहित्य

बटाटा वडा कृती

बटाटे सहा उकडलेले  5-6

·      सर्वप्रथम डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद मीठ हिंग आणि मोहन घालून थोडेसे पाणी घालून पीठ तयार करावे.

·      उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे व त्यात फोडणी घालावी.

·      फोडणीसाठी तेलात मोहरी हिंग कढीपत्ता घालून, बटाट्यात घालावे.

·      आता या मिश्रणात लिंबू पिळावे आणि कोथिंबीर चिरुन घालावी घालावी.

·      मीठ घालावे आणि सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून घ्यावे.

·      या मिश्रणाचे आपल्याला आवडतील त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.

·      आता तळणीसाठी तेल घ्यावे.

·      एक गोळा घ्यावा तो बेस्ट डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडावा.

·      वडे थोडेसे लाल रंगाचे होतील तोवर तळावे.

आलं असून मिरची ठेचा 2 मोठे चमचे

डाळीचे पीठ 1-2 कप

हळद

मीठ

हिंग

कोथिंबीर

लिंबू

कढीपत्ता

तेल तळण्यासाठी आणि फोडणी साठी.

धने जीरे पूड

लिंबाचा रस

साखर

मीठ

 

लसणीची चटणी साहित्य

लसणीची चटणी कृती

सुकं खोबरं किसलेलं दोन वाट्या

·      सर्वप्रथम किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे

·      लाल तिखट थोडेसे भाजून घ्यावे

·      आता सर्व साहित्य म्हणजेच किसलेलं खोबरं लाल तिखट लसणीच्या पाकळ्या आणि मीठ मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे.

·      लसणीची चटणी तयार.

लाल तिखट

लसणीच्या पाकळ्या 12 ते 15

एक मोठा चमचा मीठ.

 


 

चित्रकला-----सौम्या घाडगे

 


चित्रकला-----अक्षता अमित झळकीकर

 


चित्रकला----सौ.. दीपा उरणकर

 



चित्रकला----- रुपाली किर्तनी

 



चित्रकला-----आदित बलदावा

 






गाजराचे भरीत----सौ नम्रता नितीन देव

 

गाजराचे भरीत

आपण गाजराची कोशिंबीर नेहेमीच करतो पण हे थोडंसं वेगळं, गाजराचे भरीत.

 

साहित्य -

२-३ मध्यम आकाराची गाजरं तुकडे करून कुकर मधून वाफवून घेतलेली,

पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,

२हिरव्या मिरच्या,

बारीक चिरलेली कोथिंबीर २टे स्पून,

एक वाटी गोडसर दही,

चवी पुरेसे मीठ -साखर,२सुक्या लाल मिरच्या,

४-५कढीपत्त्याची पाने,

फोडणीचे साहित्य,२-३टी स्पून तेल फोडणी साठी

 

कृती -

वाफवलेले गाजराचे तुकडे कुस्करून घेणे व त्यात चवीपुरेसे मीठ,साखर,दाण्याचे कूट,फेटलेले दही हे सर्व साहित्य मिसळुन घेणे.दोन हिरव्या मिरच्या व पाव टी स्पून मोहरी मिक्सर मधे फिरवून घेणे व भरीता मध्ये मिसळणे.छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,३-४मेथी दाणे,लाल सुक्क्या मिरच्यांचे तुकडे,कढीपत्ता,हिंग,व हळद घालुन खमंग फोडणी करून ती भरीतावर ओतणे.बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून चवदार भरीत पोळी-भाकरी बरोबर सर्व्ह  करावे.

 





सौ नम्रता नितीन देव

प्रेम हे ....सौ. श्रेया पटवर्धन

 

प्रेम हे ....



तुझे माझे प्रेम म्हणजे सागर

अथांग सागरासारखे माझे प्रेम आहे अमर.....

 

तुझे माझे प्रेम म्हणजे बकुळीचा सुगंध

वाळून गेले तरी दरवळत राहील प्रीतीचा गंध.....

 

तुझे माझे प्रेम म्हणजे चांदणे चंद्राचे

शितल तेच उधळत राहो कायम आपल्या प्रेमाचे...

 

तुझे माझे प्रेम म्हणजे हृदयात तेवत असलेली ज्योत नसू आपण कधी जरी अनंत असेल या भावनांचा स्त्रोत....

 

 

सौ. श्रेया पटवर्धन

जुळून येती रेशीमगाठी----सौ. श्रेया पटवर्धन

 

जुळून येती रेशीमगाठी



स्वर्गात जुळून आल्या आपुल्या रेशीमगाठी
मी जन्म घेतला फक्त तुला भेटण्यासाठी .....

अस्वस्थ भावनांचा हा आवेग कशासाठी ?
हृदयातील प्रेम हे आहे तुझ्याच साठी .....

हुरहूर ही मनाची आहे कुणासाठी ?
मज नयनातील माधुर्य आहे तुझ्याच साठी .....

आयुष्य हे सुखाचे विणलेले आपुल्यासाठी
तू श्वास आहेस माझा जगते तुझ्याच साठी .....



सौ. श्रेया पटवर्धन

वेडावलेलं मन----- रुपाली मावजो किर्तनी

 

वेडावलेलं मन


वेडावलेलं मन माझं

चार चौघात शोधतंय तुला

सभोवताली सगळे तरी

समोर तूच दिसतोस मला

 

प्रतिबिंब तुझं पडलंय असं

वेड्या वेड्या मनात माझ्या

प्रत्येक श्वास हृदयाचा

आठवणींनी भरून येतो तुझ्या

 

प्रेम बसलंय काळजात

वय वाढतंय वर्षांनी

मन माझं वेडं आजही

शोधतंय चारही दिशांनी

 

विचार येतोय कधी असाच

तुलाही असंच वाटतंय का

जवळ तुझ्या नसते तेव्हां

उणीव तुलाही भासते का

 

सोडून गेले हे जग मी

तर दिसणार का रे मी तुला?

चार चौघात तेव्हां असाच

शोधशील का रे तू मला?

 

    - रुपाली मावजो किर्तनी

प्रेमाचा वलेंटायन्स डे----------रुपाली मावजो किर्तनी

 

प्रेमाचा वलेंटायन्स डे


तुझ्या सारखा साथीदार

मिळायला खरंच नशीब हवं

आयुष्यात तू आल्या पासून

सगळंच वाटतं नवं नवं

 

जीवनात माझ्या तुझं असणं

माझ्यासाठी जणू भेट खास

विचारात तुझ्या दिवस रात्र

हरवून जाते मी तासन तास

 

न वेळेचं न काळाचं

न कसलंच बंधन आम्हा दोघांस

हवा हवा सा वाटत असतो

सदैव तुझा सहवास

 

तुझ्या माझ्या नात्याला

हवाय का हा वलेंटायन्स डे?

रोजच करतो प्रेम व्यक्त

चिढतो भांडतो ही प्रेमाने

 

मनाला समजावत असते मी

वी हेव टू गो अ लॉंग वे

रोजच करू सेलिब्रेट आपण

प्रेमाचा हा वलेंटायन्स डे

 

-रुपाली मावजो किर्तनी

अर्थ प्रेमाचा------रुपाली मावजो किर्तनी

 

अर्थ प्रेमाचा


मना पासून प्रेम केलं फक्त तुझ्यावर

तरी शोधत बसते अर्थ प्रेमाचा... काय असतं हे प्रेम?

 

मना पासून प्रेम केलं फक्त तुझ्यावर

कायम तुला समजून घ्यायचा प्रयत्न केला मी

तरी शोधत बसते अर्थ प्रेमाचा... काय असतं हे प्रेम? आणि का होतं?

 

सतत तुझी आठवण येणं

हे प्रेम ?

का दिवसरात्र तुझा विचार करणं

हे प्रेम ?

येणार नाही माहीत असुनही तुझी वाट पाहणं

हे प्रेम ?

का तु जवळ नसताना गर्दीतही एकटं वाटणं

हे प्रेम ?

मी बोलणारच नाही तुझ्याशी ठरवूनही

बोलण्यासाठी आतूरतेनं वाट बघणं

हे प्रेम ?

का त्याला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ

अस म्हणुनही तुझ्या एका हाकेनं क्षणात विरघळून जाणं

हे प्रेम ?

तुझ्या एका नजरेसाठी मन व्याकुळ होणं

हे प्रेम ?

का तुझ्या मीठीसाठी आतुर होणं

हे प्रेम ?

तुझ्या साठी वाटणारी काळजी

हे प्रेम ?

का आपल्या त्या ख़ास मैत्रीत लपलेली खास माया

हे प्रेम ?

तुझ्या जगात माझं स्थान काय हे माहित असुनही

तुझ्या सोबत स्वप्न रंगवणं

हे प्रेम ?

का स्वतःच्याही नकळत तुझ्यात पूर्ण गुंतून जाणं

हे प्रेम ?

तु समजून घेशील म्हणून तुला वाटेल तसं बोलणं

हे प्रेम ?

का तुझ्या सर्व चूका विसरून तुला जवळ करणं

हे प्रेम?

तुझ्यात जगणं हे प्रेम?

का जगायला अर्थ सापडणं हे प्रेम?

 

काय असतं हे प्रेम?

-रुपाली मावजो किर्तनी