Tuesday, September 12, 2017

पुस्तक परिक्षण : श्री. मंदार आपटे- उत्तररंग

उत्तररंग  
लेखक : नारायण धारप
प्रकाशक : समन्वय प्रकाशन
पाने  : २३२  
प्रकाशन  : आवृत्ती सन २०१२
भाषा  : मराठी
विमल अत्रे ही सुंदर, आकर्षक पन्नाशीतली विधवा असते. तारुण्यात वैधव्य आल्यावर तिने आपल्या मुलांना मोठे केले आणि मार्गी लावले. जाण्यापूर्वी अत्रे साहेबांनी पैशाची तरतूद करून ठेवलेली असल्याने पुनर्विवाह करून आपले स्वातंत्र्य घालवायची तिची तयारी नव्हती. ती कधी त्या फंदात पडलीच नाही. मुले आपापल्या संसारात रममाण आहेत, विमलचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. आपल्या घरात विमल एकटी राहते. कर्मधर्मसंयोगाने एक दिवशी नाट्यगृहात तिची गाठ संजय उपाध्येंशी (नाना) पडते.
त्यांची भेट नाटकाबरोबर संपेल का? ती सुखी आहे का? त्यांच्या घराचे लोक त्यांच्या मैत्रीकडे कसे पहातील? त्यांना मान्यता मिळेल का? 
विमल एकटी राहते. तिच्या दोन्ही मुलांची लागणे झाली आहेत आणि दोघे त्याच शहरात राहतात. ते वेळोवेळी आईची मदत घेतात किंबहुना ती गृहीतच धरतात. पण वरचेवर आईला फोन करावा, आईला भेटावे, तिला आराम करायला म्हणून बोलवावे असे काही त्यांना वाटत नाही. नानांनी काही वर्षांपूर्वी, त्यांच्या सुनेच्या वागण्यामुळे, आपल्या मोठ्या मुलाला वेगळे बिऱ्हाड थाटायला सांगितले होते. मधून अधून नाना त्यांना भेटायला जातात, पण ते येत नाहीत. त्याचा धाकटा मुलगा उत्तरभारतात नोकरीला असतो.
दोघे एकटे आहेत, दोघांची आर्थिक स्थिती चांगली आहे. दोघे सुस्वरूप आहेत. दोघांनी स्वतःला कसल्यातरी व्यापात गुंतवले आहे. पण तरीही त्यांच्या आयुष्यात एकटेपण आहे, एक पोकळी आहे. सहचार्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली आहे. पाहता पाहता ठिणगी प्रज्वलित व्हायला वेळ लागत नाही आणि ते एका निर्णयाप्रत येऊन पोहोचतात, मुलांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगण्याच्या क्रांतिकारी निर्णयाप्रत.
ही सुखवस्तू कुटुंबातील लोकांची गोष्ट आहे, त्यांना पैशाची चणचण नाही. ही कथा उतारवयातील एकटेपणा हा विषय हाताळते. एकटेपणात जेव्हा पर्याय निर्माण होतो तेव्हा तो मार्ग चोखाळला जातो. यातून पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो परंतु संघर्ष हा या कथेचा विषय नाही तो परिणाम आहे. लेखकाने कथा अतिशय सुबकतेने मांडली आहे. कथा प्रशंसा, आवड, मागणी, प्रेम, मुलांचा विरोध, लग्न, विरोध मावळणे आणि शेवटी विनाशर्त मान्यता हे सर्व टप्पे पार करत पैलतीरास पोहोचते. एखाद्याला ब्रूस टकमनच्या मॉडेलची आठवण झाली तर आश्चर्य वाटायला नको. सगळे काही छान छान वाटू नये म्हणून लेखक एक खलनायिका आणतो. पण तिला थोडासाच वाव मिळतो आणि तिचा कथेतील कार्यभाग संपतो. तिला अजून ठेवले असते तर आणखी नाट्य निर्माण झाले असते.
ती एक व्यक्तिरेखा सोडली तर या कथेतील सर्वजण मूलतः चांगले आहेत. काहीजण म्हाताऱ्यांच्या लग्नाच्या धास्तीने वाईट वागतात पण अंततः परत आपल्या चांगुलपणाकडे वळतात. हे एक कुटुंबनाट्य आहे. यात फार तणाव नाही, अति भावनाक्षोभ नाही, फार थरार नाही, अति रोमांच नाही व मारामारी किंवा लढाई देखील नाही पण तरीही हे पुस्तक आल्हाददायी आहे.
ही कथा आपल्याला विमल आणि नाना भेटतात त्या दिवसापासून ते त्यांची कुटुंबे खऱ्या अर्थाने एक होतात त्या दिवसापर्यंतच्या प्रवासाला घेऊन जाते. कथा जरी वेगवान नसली तरी ती कुठेही ढिली पडत नाही आणि त्यामुळे वाचकाचे लक्ष विचलीत तर होत नाहीच उलट त्यांना गोडीच लागते.
विमलचे विचार, भावना आणि तिच्यातली स्थित्यंतरे लेखकाने आपल्या शब्द कुंचल्यात चपखल पकडली आहेत. विमल आपल्यासमोर एक संवेदनाशील, सक्षम आणि बुद्धिमान पण आधाराची आणि सहचर्याची गरज असलेली स्त्री म्हणून येते. नाना हे पटापट निर्णय घेणारे, आपल्याला काय पाहिजे त्याची जाण असणारे यशस्वी उद्योजक असतात. काही वेळा ते विमल आणि स्वतः असे दोघांचे निर्णय घेतात, विमलला ते आवडते. जर मला या पुस्तकाचा उत्तरार्ध किंवा दुसरा भाग लिहायचा असेल तर मी या गोष्टीचा कथाबीज म्हणून वापर करेन.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका पुरुषाचा हात मेंदी काढलेल्या स्त्रीच्या हाताच्या बोटात अंगठी घालताना दाखवला आहे. कथेचा भावार्थ एका चित्रात! परंतु हे हात तरुण माणसाचे वाटतात, म्हाताऱ्यांचे नाही.
नारायण धारप हे भयकथा, गूढ कथा, थरार व विज्ञान काल्पनिका यांचे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या शैली बाहेरील जी एका हाताच्या बोटावर मोजता येणारी पुस्तके आहेत त्यातील हे एक आहे. आपण आपल्या खास शैली पलीकडे जाऊनही तितकेच चांगले लिहू शकतो याचा धारप आपल्याला प्रत्यय देतात.
मी हे पुस्तक का वाचले?   कल्पनारम्यते पलीकडचे धारप आहेत तरी कसे
काय आवडले नाही?        अति चांगुलपणा
काय आवडले?               कथा व लेखन
शिफारस           वाचनीय. जरूर वाचा.

मंदार आपटे



हर दिल धडक ने दो.... सचिन सबनीस

आपण सगळ्यांनीच "दिल धडकने दो" हा हिंदी चित्रपट बघितला असेल त्यामधील cruise शिप व तेथील हॉस्पिटॅलिटी आणि त्याभोवताली फिरणारे कथानक हा फ्रेश व नवा थिम हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर लक्षात आला असेलच.

आमच्या मागील वर्षी अनुभवलेल्या cruise हॉलिडे अनुभवाबद्दल आमच्या निकटवर्तीय मित्रमंडळीत औत्सुख्यमिश्रित चर्चा नेहेमीच घडत असतात. म्हणून मला वाटले कि आपण या बाबत जर काही लीहिले तर ते याबाबतीत मार्गदर्शक ठरेल कारण आपण बहुतेक वेळी अनुभवांच्या बाबतीत नेहेमीच साहाय्य घेत असतो. आज बहरच्या माध्यमातून या सफरीचा अनोखा अनुभव खास MMAD साठी share करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आनंदाचे मुख्य कारण असे कि माझी बहरसाठी हि पहिलीच लेखनसेवा आहे व तिही कौटुंबिक पुरस्काराने पूर्णत्वाला येतेय. तेंव्हा आपल्या सगळ्यांसाठी हा अनुभव रंजक व नाविन्यपूर्ण असेल अशी खात्री आहे.


जेंव्हा मला याबद्दल पहिल्यांदा समजले तेंव्हा काही मूलभूत गैरसमज इथे मुद्दामून करत आहे. उदारणार्थ

 v बोट बुडली तर काय होईल ,
 v बोटीवर sea सिकनेस फार जाणवतो,
 v हे खूप महागडे असते ते आपल्याला परवडणारे नाही,
 v जेवण म्हणजे फक्त sea फूड मिळणार ई ई. ..
तर आपल्या समाधानकारक माहितीसाठी मी खासकरून सांगतो ते म्हणजे
 v यात अपघाताच्या शक्यता फारच नगण्य असल्याने काळजी करण्याची गरज नाही. तसाही आपण विमानप्रवासाचा फार बाऊ (issue) करत नाहीच. Cruise चा प्रवास या आधीच्या शतकापासून कसा सुधारत गेला व त्याच्या मागे किती R&D व मेहेनत घेतली गेलीय याबद्दल YouTube वर भरपूर विडिओ उपलब्ध आहेत, (उत्सुकांसाठी पुढील लिंक देतआहे https://youtu.be/N3qh0SBH9EU  तरी हा विडिओ अवश्य बघणे).

 v Sea सिकनेस हा प्रकार आम्हाला अजिबात जाणवला नाही कारण cruise liner या उद्योगाचे classification अजूनही Luxury Voyage मध्ये असल्याने त्याचे science खूपच प्रगत झाले आहे, याबाबत अधिक Technicalities Youtube वरील विडिओमधून जाणून घेता येतीलच म्हणून त्या तपशिलात मी शिरत नाही.
तरी प्रामाणिकपणे सांगतो कि आम्हालातरी आमच्या सफरीत बोट हलणे हाच अनुभव तोहि एकदाच आला. तोसुद्धा जसे रात्री पाळण्यात नवजात बालकाला नाजूकपणे आई झोका देते तितकाच पण सुखद होता कारण त्यादिवशी रफ sea होता म्हणे.
तौलनिकदृष्ट्या आपण कधी Luxury बसने रात्रीचा प्रवास केला असेल तर झोप लागल्यावर ड्राइवरने अचानक lane कट केल्यावर जो असतो तो १००%.  त्याच्या तुलनेत विमानाचा रफ स्काय फील हा ५% जाणवतो. तात्पर्य जेवढे रफ स्काय आपण विमान प्रवासात अनुभवतो त्यापेक्षा शिपचा फील केवळ ५०%  mild असतो. म्हणजे सिकनेसचा प्रश्न निकालात निघतो.
 v आपण कुठल्या ना कुठल्या देशाटनाला जात असतोच त्यामध्ये देशोदेशीची प्रसिध्द्ध व प्रेक्षणीय स्थळे आपल्या सफरीच्या बजेट नुसार आपण बघायचे ठरवतो .
त्यात ती स्थळे बहुत करून युरोपमधील असतात ज्यात एकापेक्षा जास्त दिवस त्या सफरीसाठी दिलेले असतात. उदा. तुम्हाला पॅरिसमध्ये जर Eifel Tower  बघायचा असेल तर तुम्ही कमीत कमी पॅरिसचे ३ दिवसांचे package घेता व एक दिवस Eifel Tower  बघून उरलेल्या २ दिवसात बाकीची स्थळे बघून येऊ शकता.
या अशा सफरींना destinationtourism प्रकारात मोडतात. पण या प्रकारच्या destiantiontourism ला leisure Tourism शी compare करता येणार नाही. कारण दोघांची उद्देश्य भिन्न असतात.

      अर्थात जेंव्हा आपण डेस्टिनेशन Tourism करतो त्यावेळी आपल्याला leiusre नको असते असे नव्हे तर डेस्टिनेशन मध्ये leisure Tourism जोडले तर त्याचा खर्च भरमसाठ होतो. याचे मुख्य कारण डेस्टिनेशनला उपलब्ध असणाऱ्या leisure facility त्या डेस्टिनेशनचा प्रीमियम घेत असतात.
फार सोपे करून सांगायचे झाले तर जसे हॉटेलमध्ये गेल्या वर तुम्हाला पाणी सुद्धा जास्त किमतीला घ्यावे लागते तेच इथे होते.
म्हणूनच cruise शिप Voyage कधीच डेस्टिनेशन tourisim शी जोडलेले नसतात
अर्थात त्या तुलनेत किंमत तुम्ही कमीच देत असता.
याबाबत एक नमूद करावेसे वाटते ते असे कि भारतातून बुकिंग केलेल्या cruise voyage नेहेमीच स्वस्त पडतात, त्याचे कारण त्यांना भारतातून उत्सुकांचा व हौशी मंडळींचा जो एक मोठा वर्ग आहे त्यांना या प्रकारासाठी promote करायच आहे. म्हणून भारतातील बुकिंग भारताबाहेरून केलेल्या बुकिंगपेक्षा स्वस्त असतात.
 v राहिला प्रश्न जेवणाचा, तर त्यामध्ये फक्त Sea फूडच असते हा एक भोळा गैरसमज आहे.
हो आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींची थोडी पंचाईत होते पण त्यासाठी केंव्हाही आगाऊ लेखी सूचना दिलेली असल्यास तीसुद्धा अडचण राहत नाही.

इतर शंकाचे निरसन माझ्या यापुढील प्रकरणात विस्तृतपणे सांगितलेल्या स्वानुभवरून होईलच याची खात्री आहे.
तेंव्हा मंडळी जर तुम्हालाही cruise सफर करावी असे वाटायला लागले असेल तर तुमचे हि
   दिल धडकने दो….. 
   सचिन सबनीस