Friday, February 16, 2018

व्हाट्स ऍप

दिवाळी निम्मित आलेल्या पोस्ट चाळत असताना एका व्यंगचित्रा ने लक्ष वेधून घेतलं.एका घरी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला एक मध्यम वयीन जोडपं आलेलं आहे आणि त्यांना दरवाजातच यजमान विचारत आहेत की शुभेच्छा द्यायला चक्क घरी?तुमच्या कडे मोबाईल वर व्हाट्स ऍप नाही आहे का ? तसे बघितले तर आजच्या काळाशी हा प्रश्न सुसंगतच होता. आजकाल कुठलाही सण,वाढदिवस,anniversary की कुठलाही आनंदाचा प्रसंग असो,प्रत्यक्ष घरी जाऊन,फोन करून शुभेच्छा देण्या पेक्षा WA वर मेसेज पाठवणे सोपे झाले आहे
इतर वेळेस ठीक आहे.लांब दूरवर,परदेशात असलेले मित्र,नातेवाईक सारखं फोन नाही करू शकत.अशावेळी WA हे संवाद साधण्याचे योग्य माध्यम आहे .पण एकाच शहरात,एकाच सोसायटी मध्ये,एकाच ऑफिस मध्ये राहणारे जेव्हा प्रत्यक्ष भेटायच्या ऐवजी WA चा आधार घेतात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही .गेल्या 2-4 वर्षातच आपले जीवन पूर्ण WAमय झाले आहे. सहज मनात विचार आला की WA च्या आगमनापूर्वी आपण एकमेकांना शुभेच्छा कसे द्यायचो?इंटरनेट चा जमाना सुरू होऊन  बराचसा काळ लोटला होता. त्यामुळे मेल द्वारे शुभेच्छा पाठवणं हे नित्याचे झाले होते. रोज आठवणीने इनबॉक्स मध्ये येणाऱ्या मेल आवर्जून उघडल्या जायच्या.त्याला रिप्लाय दिला जायचा.तरीही सर्वांकडे इंटरनेट असायचंच असे नाही .पण मोबाइल च्या उदयानंतर इंटरनेट नसले तरी फोन मात्र घरोघरी पोहोचला होता .त्यामुळे नेट नसलेल्या कडे फोन तरी आवर्जून  जायचा.विशेषतः वडीलधाऱ्या  लोकांशी तरी फोन वरून बोलणे व्हायचे.त्यांचा आवाज कानी पडायचा,त्यांनी प्रेमाने केलेली विचारपूस मनात आस्थेचा ओलावा निर्माण करायची.प्रत्यक्ष भेटीचा आनंद वाटायचा. आणखी मागे जाता इंटरनेट च्या मायाजालात गुंतण्या पूर्वीचा जमाना हा त्याही पेक्ष्या वेगळा होता.दिवाळी ,संक्रांत,वाढदिवसया सारख्या निवडक प्रसंगी शुभेच्छा कार्ड पाठवली जायची.प्रत्येक कार्डावर घरातल्या सदस्यांची नावे न विसरता लिहिली जायची. घरातल्या एखाद्या लहानग्याच्या वाढदिवसाला स्पेशल musical कार्ड पाठवले जायचे. ते कार्ड उघडल्यावर music सुरू झाल्यावर ते ऐकतानाचा आनंद अवर्णनीय असायचा .तेव्हा वर्षातून दिवाळी, नवीन वर्ष  आणि वाढदिवस अशा निवडकच प्रसंगी अशी कार्डाची देवाण घेवाण व्हायची.संकष्टी चतुर्थी ,एकादशी च्या शुभेच्छा किंवा अमका डे तमका डे याचे पीक अजून जन्माला यायचे होते .पण एवढे जरी असले तरी विकतच्या कार्डातील उसनवारी करून घेतलेल्या शब्दातून कितीही काव्यमय भावना व्यक्त केल्या तरी शेवटी त्या परक्याच.आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायचा काळ हा त्या आधीचा.मोबाईल,इंटरनेट,
WA नसलेला होता.पाच पैशाच्या पोस्ट कार्डावर  स्वहस्ते लिहिलेला 5-10 ओळींचा मजकूर देखील आपुलकी,भावना दर्शवून जायचा. सविस्तर पत्र लिहायचे तर निळ्या रंगाचे अंतरदेशीय पत्र मिळायचं.मग त्यात इकडच्या तिकडच्या भरपूर बातम्यांना स्थान असायचे .खूप दिवसांनी पत्र पाठवायचे झाले की याचा वापर व्हायचा.नाहीतर थोडक्यात पण महत्वाचे असेल तर संपर्क साधण्यासाठी  पोस्टकार्ड सारखे स्वस्त  माध्यम नव्हते. संक्रांतीच्या वेळी मात्र पाकिटातून तीळ किंवा हलवा याची देवाण घेवाण व्हायची.त्या 2-4 तिळाच्या दाण्यात  भावनेचा गोडवा भरून आलेला असायचा.रक्षा बंधनाला तशाच पाकिटातून बहिणीने प्रेमाने  पाठवलेली राखी बघून तिच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा ओल्या  झाल्याशिवाय राहायच्या नाही .रोज दारी येणाऱ्या पोस्टमन ची चातकासारखी वाट बघितली जायची.पण हाच पोस्टमन जेव्हा एखादी तार घेऊन यायचा तेव्हा तार उघडण्यापूर्वी मन शंके कुशंकेने ग्रासून जायचे.अशी अभद्र बातमी घेऊन येणार पोस्टमन तेव्हा नकोसा वाटायचा.
गेले ते दिन गेले.नवीन तंत्रज्ञान आले.जग जवळ आले .माणसे जवळ आली पण मनं किती जवळ आली हा प्रश्नच आहे .WA   मुळे माणूस एका क्षणात जवळ येतो आणि दुरावा निर्माण करायलाही एक क्षण पुरतो.बोलण्यातून व्यक्त होणाऱ्या तुमच्या भावना आणी WA वरील भावना यात कितीही ईमोजी टाका फरक पडतोच.त्याचा जपून वापर नाही झाला तर गैरसमज अटळच .

      WA आल्यापासून रोज सकाळी एवढ्या सुविचारांचा भडिमार होतो की आपण कसे वागायचे हेच समजत नाही.बरे हे सुविचार पाठवणारे  महाभाग  सुविचार हे केवळ दुसऱ्यांसाठी असतात असं गोड समज करून घेतात. त्यांच्या मते ते बरोबर वागत असतात पण दुसर्याने असे वागले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटत असते . लहानपणी शाळेत असताना रोज फळ्यावर नियमीत पणे  लिहिलेले हे सुविचार  आयुष्यात पाठलाग करत इथपर्यंत येतील असे वाटले नव्हते. 
 पण याच WA मुळे आपल्या अनेक दूरच्या मित्रांना,नातेवाईकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे हेही विसरता कामा नये.जुने शाळकरी,कॉलेज चे मित्र मैत्रिणी शोधून काढता आले .त्यांचे ग्रुप तयार झाले .त्यांच्या बरोबर स्नेहसंमेलन झाली. उतार वयातील लोकांना तर वेळ जाण्यासाठी ,जुन्या आठवणीत रमण्यासाठी एक उत्तम साधन निर्माण झाले .साहित्य, संगीत,सिनेमा,राजकारण,पाककला असे ज्याला ज्याची आवड असेल तसे हजारो ग्रुप तयार झाले.ते ग्रुप तयार करणारे 'एडमीन 'या नावाने मानाने समाजात वावरायला लागले.एखाद्या ग्रुप वर तात्विक चर्चा ही तशीच तावातावाने व्हायला लागली.शेवटी काय नवीन तंत्रज्ञान  कितीही  चांगले असले तरी त्याचा कसा वापर करायचा हे तुमच्यावर आहे.त्याच्या अधीनही होऊ नका पण त्याच्या पासून पळूही नका. आवडले तर फॉरवर्ड करा नाही आवडले तर डिलिट करायचे ऑपशन आहे ना तुमच्याकडे .मग आता तुमचा काय विचार आहे ?ही पोस्ट तुम्ही डिलिट करणार का फॉरवर्ड ?
प्रशांत कुलकर्णी
अबुधाबी




No comments:

Post a Comment