Sunday, March 31, 2019

माझी आई - माझी शक्ती



एक बाईच दुसऱ्या बाईला समजू शकते असं म्हणतात. पण जो वर आपण तिच्या जागेवर उभं राहून जग पाहत नाही तो वर तिला कुणीच समजू शकत नाही असं माझं ठाम मत. एक बाई जी सगळ्यांच्याच आयुष्यात आपला ठसा ठेवते ती म्हणजे, आपली आई. आपण तिचं प्रेम बघतो पण तिचे त्याग , तिच्या रागा मागच्या भावना, आणि तिचा आरडा ओरडा आपल्याला कधीच समजत नाही. आज विचार केला तर मलाही तसंच वाटतं,  लहान असताना मम्मीला कधीच समजून घ्यायचा मी प्रयत्न नाही केला. मम्मी कामावरनं थकून यायची पण आम्हाला तिची चिडचिड समजायची नाही. घरची कामं करायला मदतीला बोलवायची तेव्हा वाटायचं की, 'मीच का?' 'शिकलेलं कधीच फुकट जात नाही' तिच्या ह्या शब्दांचा अर्थ आज समजतो जेव्हा शिकलेल्या सगळ्याचा फायदा समजायला लागला. आज जेव्हा माझ्या मुली माझ्या समोर तोच प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन उभ्या राहतात, 'मीच का?' हा प्रश्न परत परत विचारतात, माझ्या चिडचिडच्या मागे लपलेला थकवा जेव्हा त्यांना दिसत नाही, तेव्हा आठवतं मला माझं बालपण माझी तेव्हाची मनाची अस्वस्ताथा आणि डोळ्या समोर येतो एकच चेहरा, माझ्या मम्मीचा.

ही कविता खास तिच्यासाठी


माझी शक्ती

चेहर्‍या वरील भाव तिच्या
कधीच समजू शकले नाही
त्या ओरडण्या मागे लपलेलं प्रेम
तेव्हां ओळखु शकले नाही

ओरडण्यात लपलेले ते भाव
आज मला समजतात
जेव्हां उत्तर मागणारे चेहरे
माझ्या समोर उभे असतात

दाटून आलेले डोळे मी
तेव्हा बघू शकले नाही
भरुन आलेलं ह्रदय आज
डोळ्यांना माझ्या चुकलं नाही

त्या जागेवर उभी राहिले तेव्हांच
प्रेम ते समजु शकले
आई म्हणजे नक्की काय
तेव्हांच मला कळुन चुकले

प्रेमांत मउ ह्रदय तिचं
आज लगेच वितळतं
माझ्या मनांत चाल्लेलं मात्र
आवाजा वरुनच तिला समजतं

आजही सगळ्यात आधी माझं
जड मन तिलाच शोधते
'मम्मी' ह्या एकाच हाकेत 
मला वेगळीच एक शक्ती मिळते
....वेगळीच एक शक्ती मिळते













- रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment