Tuesday, September 10, 2019

सण भरला श्रावण: सौ. नम्रता नितीन देव



ऊन-पाऊस नि रिमझिम सरींचा
श्रावण आला श्रावण आला ।
समृद्धीचा सणासुदींचा श्रावण आला श्रावण आला ।
नागपंचमीचा सण पहिला नागोबाला पुजण्याचा
मुलीबाळींनी फेर धरुनी, झोपाळ्यांवर झुलण्याचा ।
श्रावणी सोमवार शंकरपूजन व्रत आणि उपवासाचा
शाळेच्या अर्ध्या सुट्टीचा आणि गोडधोड नैवेद्याचा ।
नाना परिच्या फुलापत्रीनी मंगळागौर अशी सजली
झिम्मा, फुगड्या गोफ विणूनी रात्र सारी मग जागवली ।
शुक्रवारी जिवतीचे पूजन लेकरांच्या दिर्घायुष्यासाठी
पुरण पोळीचे भोजन देऊनी सुवासिनीची भरली ओटी ।
नारळी पौर्णिमेचा सण आला कोळीबांधव आनंदले
वाजतगाजत कृतज्ञतेने सागरास नारळ अर्पियले ।
बहीण भावाच्या नात्याचा सण रक्षाबंधनाचा
रक्षणकर्त्या भावाला प्रेमाचे बंध बांधण्याचा ।
आनंदसोहळा कृष्णजन्माचा सण गोकुळाष्टमीचा
गोविंदांनी थर रचले थरार असा दहीहंडीचा ।
बघता बघता सरला श्रावण आली अमावस पिठोरीची
मातृदिन हा साऱ्यांसाठी बैलपोळा कृतज्ञ शेतकऱ्यांसाठी ।
सणभरला असा हा श्रावण आनंदसरी बरसून सरतो
सरता सरता श्री गजाननाच्या आगमनाची चाहूल देतो ।


                                          सौ. नम्रता नितिन देव



No comments:

Post a Comment