Friday, April 2, 2021

चित्रकला---स्वानंद विकास नाईक

 



चित्रकला-----वंशिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला---आद्या आठवले

 


चित्रकला-----आदित बलदावा

 



चित्रकला------रुपाली मावजो किर्तनी

 


छोटू समोसे--------सौ. शीतल अमित झळकीकर

 

छोटू समोसे

 

साहित्य

दोन उकडलेले बटाटे

लाल तिखट २ छोटे चमचे

चिमुटभर बडीशेप

कोथिंबीर चिरलेली

मीठ चवीनुसार

पारीसाठी साहित्य

मैदा एक वाटी

चिमुटभर ओवा

मोहन एक चमचा

मीठ

तळण्यासाठी तेल

कृती

बटाटे कुस्करून घ्यावे.

त्यात लाल तिखट, कोथिंबीर थोडेसे, बडीशेप आणि मीठ घालून एकत्र करावे.

आता पारी साठी -

 मैदा, त्यात थोडेसे पाणी, थोडा ओवा, मीठ घालून कणिक मळून घ्यावी. मध्यम आकाराची गोळी घ्यावी. लाटावी, त्याचे दोन भाग करावे आणि कोनाच्या आकारात करून घेऊन त्यात सारण भरावे. तळणीसाठी तेल ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. दोन किंवा चार समोसे एकावेळी तळावे. मंद आचेवर सामोसे गुलबट रंगाचे होईपर्यंत तळावे.

सामोसे जर खुसखुशीत हवे असतील तर ते मंद आचेवरच तळावे, मोठ्या आचेवर सामोसे खुसखुशीत तळले जाणार नाहीत आणि मग माऊ पडतात.



पुरणपोळी (गव्हाच्या पिठाची)-------सौ. शीतल अमित झळकीकर

 

पुरणपोळी (गव्हाच्या पिठाची)

पूरणासाठी साहित्य

तीन वाटी चणाडाळ

गुळ अडीच वाटी

चिमूटभर जायफळ पूड

चिमुटभर वेलची पुड

आवरणासाठी

गव्हाचे पीठ

पाणी

तेल

पूरणाची कृती

चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. कुकरला लावून चार ते पाच शिट्ट्या कराव्यात.

चणाडाळ मधलं पाणी निथळून घ्यावे.

शिजवलेली चणा डाळ थोडीशी परतून घ्यावी. त्यात गूळ घालावे. हे मिश्रण सतत ढवळत राहावे. थोड्या वेळात पुरण घट्ट होईल. कालथा पुर्णत उभा घालून बघावा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण बरोबर झाले आहे. गार झाल्यावरती हे पुरण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.

कणकेत थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी जेव्हा आपण ही कणीक मळतो त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी एकदम न घालता थोडे थोडे पाणी त्याच्यात वरून घालत राहावे. आपल्याला हवी तशी काढणी मळणी गेली की मग थोडे तेल घालून कणीक परत नीट मळून घ्यावी आणि मग ती एका भांड्यात थोडेसे तळाला तेल घालून झाकून ठेवावी.

आता कणकेची एक छोटी गोळी घ्यावी ती अंगठा वापरून गोल गोल थोडी मोठी वाढवून घ्यावी, मग पुरणाचा एक गोळा घेऊन तो त्या कणकेमध्ये घालून छान गोळा करून घ्यावा. मग हाताने थोडासा दाब देऊन पोळी लाटावी. लाटणं वापरून ती पोळी लाटण्यावर घ्यावी आणि मग ती तव्यावर टाकावी. एका बाजूने पोळी छान खरपूस झाली कि ती तव्यावरून काढावी आणि मग दुसऱ्या बाजूवर शेकायला टाकावी.

दुधाबरोबर अथवा तूप घालून छान खमंग पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा

टीप- (चणाडाळ मधले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरता येते)


रंग होळीचा---------संतोष दगडू राक्षे

 

रंग होळीचा

 

रंग लावा आकाशाच्या भव्यतेचा,

रंग लावा सागराच्या अथांगतेचा

रंग लावा चातकाचा आतुरतेचा,

रंग लावा निसर्गाच्या देण्याचा

रंग लावा श्रीरामाच्या धैर्याचा,

रंग लावा कृष्ण सुदामाच्या मैत्रीचा

रंग लावा विठ्ठलाच्या करुणेचा,

रंग लावा ज्ञानोबांच्या विश्वशांतीचा

रंग लावा तुकोबाच्या अभंगांचा,

रंग लावा पुंडलिकाच्या भक्तीचा

रंग लावा शिवबाच्या पराक्रमाचा,

रंग लावा बळीराजाच्या घामाचा

रंग लावा आईच्या वत्सलतेचा,

रंग लावा वडिलांच्या धीराचा

रंग लावा प्रियेचा प्रीतीचा,

रंग लावा सखेच्या सौख्याचा

रंग लावा बंधूंच्या प्रेमाचा,

रंग लावा बहिणीच्या मायेचा

रंग लावा मुलांच्या निरागसतेचा,

रंग लावा स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा

रंग लावा स्त्रीच्या सन्मानाचा,

रंग लावा पुरुषी मर्दुमिकेचा

रंग लावा समाजातीतील एकात्मतेचा

रंग लावा माणसाला माणुसकीचा

रंग लावा भूमातेच्या धुळीचा,

रंग लावा होळीच्या पावित्र्याचा

 

 

संतोष दगडू राक्षे

तुझा रंग----------रुपाली मावजो किर्तनी

 

तुझा रंग

 

तुझ्या रंगात रंगायचं होतं ह्या राधेला

पण तुला ही सखी कधी दिसलीच नाही 

संगळ्यांना रंगवण्यात तू गुंग होतास?

का तुझा रंग माझ्या पर्यंत पोचलाच नाही

 

केसांपासून पाया पर्यंत चिंब मी न्ह्याले 

आजू बाजूच्या रंगात रंगत मी गेले

नव्हतं मला रंगायचं पण संगळ्यांनी रंगवलं

तुलाच शोधत होते कृष्णा, मीच हरवले 

 

धुउन गेला रंग सारा पण आतून मी रंगलेले

तुझाच तो रंग ज्यात पूर्ण मी बुडलेले

वरवरचा रंग गेला, आतला काही जाइना

पुसून तो काढायची ईच्छाही मला होईना 

 

तुझ्या रंगात रंगायचं होतं ह्या राधेला

पण तू रंगवलेलं तिला समजलंच नाही

तुझ्याच रंगात रंगलेली असुनही

ह्या राधेला ते कळलंच नाही

 

---रुपाली मावजो किर्तनी

 

आयुष्याचा रिमोट कंट्रोल----नम्रता चिटणीस

 

 

आयुष्याचा रिमोट कंट्रोल.

 

कधी वाटतं आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असावा...

मनात येईल तेव्हा आयुष्य पुन्हा "रिवांईंड" करून जगावं!

 

कटू आठवणींसाठी "डिलिट" बटण वापरावं....

गोड आठवणींना मात्र "पॉज" करून करून पहावं!

 

चुकीच्या निर्णायासाठी "एडीट" बटन चं ऑप्शन असावं...

"एडीट केलेलं आयुष्य मग पुन्हा जोमाने जगावं!

 

आठवणीतला एखादा चेहरा "कॉपी पेस्ट" करून घ्यावा...

हळव्या कातरवेळी तो मग भरभरून पहावा!

 

"फास्ट फॉरवर्ड" करून भविष्यात डोकवावं??

दुःखाची सावट दिसताच,‌ चॅनेलच बदलून टाकावं!

 

भुतकाळची व्यथा....भविष्याची चिंता का करत बसावं??

हातातला वर्तमान आपला....भरभरून जगावा.

Thursday, April 1, 2021

रंगांचा सण ----डॉ. पल्लवी बारटके

 

रंगांचा सण 

 

पौर्णिमेला फाल्गुनी आनंदी आनंद झाला 

रंगांचा उत्सव नभी सजला, दिन हर्षोल्हासाचा आला 

 

सृष्टी नटली, मनी मोहरली 

जुने सारे पाश त्यागून, नव्या नवलाईचे रूप ल्याली.

 

तूही झुगारून दे बंधने, दहन कर त्या बेड्यांचे

क्रांतीचा मळवट भर, कशास जोखड त्या बुरसटलेल्या प्रथांचे 

 

जातपात-भेदभावाचा धुवून टाक काळिमा अन् बन स्वच्छंद 

तेव्हा तुला भासेल हे जग मुक्तांगण

मग माणुसकीच्या, बंधुभावाच्या, स्नेहाच्या रंगांनी कर त्यावर शिंपण,

तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने साजरा होईल हा रंगांचा सण 

 

डॉ. पल्लवी बारटके 

अबुधाबी

 

॥ स्त्री ची मागणी ॥--------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

॥ स्त्री ची मागणी ॥

 

महिलांची आहे एक विनवणी,

नको शुभेच्छा जागतिक महिला दिनी.

असेल इच्छा तुमच्या मनी,

तर सदैव करावा आदर हिच आहे मागणी  ॥१॥

 

सृष्टी करत्याने दिला सन्मान म्हणून अर्धांगीनी

मग तुम्ही पण द्या तिला आधार हाताला हात लावूनी.

नको आता भेदभाव स्त्री पुरुष जातीतूनी,

जग घडवू या एकमेकास साथ देऊनी ॥२॥

 

स्त्री ची आहे एक मागणी,

फिरू द्या स्वच्छंद आकाशातुनी.

खेळू द्या तिलाही खेळ मर्दानी

बंद करा तिला बघणे वाईट नजरेतुनी॥३॥

 

सोडा आता तिचा कामापुरता वापर,

करा एक माणूस म्हणून तरी तिचा आदर.

खुप झाली तडजोड तीची जीवनात,

मानसन्मानाने वावरू द्या या जगात ॥४॥

 

 

आधुनिक क्षेत्रातही केली आहे पर्वणी,

सगळे काम चोख करते घरात राहूनी.

थोर महात्मे घडले तिच्या उदरातूनी,

स्त्री ची सांगावी किती थोरवी तिच्या कृतीतूनी ॥५॥

 

स्त्रीनेच का द्यावी परिक्षा क्षणोक्षणी,

जबाबदारी पार पाडते प्रत्येक नात्यातूनी.

सदैव राबते बिनपगारी मोलकरीण होऊनी,

याच्या मोबदल्यात आदर मिळावा हिच करते मागणी ॥६॥

 

 

होळी----सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

होळी

फाल्गुनातली पोर्णिमा म्हणजे होळीचा सण,
मनातील गर्व, अहंकार, त्यागून साजरे करावे होलीका दहन.

मनाचा बाळगुण मोठेपणा, ओठी गोडवा शब्दांचा, साजरा करावा सगळ्यांसोबत सण हा रंग बीरंगी रंगांचा.                                                                                                                                                
राग, द्वेशाची टाकूनी आहूती, बुरसटलेल्या विचारांची पेटवावी होळी,
गाठी सारखी आयुष्यातही राहावी सदैव गोडी.

इंद्रधनुच्या सप्तरंगाची होऊ दे उधळण,
पंचमीला खेळू गुलाल एकत्रित येवून सर्वजण.

साचलेली नकारात्मकता मिटवायला, साजरी करावी दरवर्षी जल्लोषात होळी,
साजरी करावी दरवर्षी जल्लोषात  होळी.
  
                                         
सौ. अंजली निलेश उज्जैनकर 

"लॉक डाउन"--------प्रशांत कुलकर्णी

 

"लॉक डाउन"

 

कामवाली:- हॅलो ताई, मी बोलतेय कोमल.

ताई:- कोमल? काय ग काय म्हणतेस? तुला किती वेळा फोन करायचा. निदान माझे कॉल बघून मिस कॉल तरी देत जा. मग मी करीन परत कॉल.

को:- ताई, मी पण तुम्हाला चार मिस कॉल दिले की पन तुम्ही येकदा बी नाही रिप्लाय केला.

ताई:- अगं मी ऑफिस चे काम घरी आणलंय ना, work from home. म्हणून कदाचित ऐकायला आला नसेल फोन. बरं मला एक सांग, तू कधी येणार आहेस कामाला आमच्याकडे?

को:- ताई, माझंही तुमच्यासारखेच वर्क फ्रॉम होम सूरू आहे.

ताई:- म्हणजे?

को:- माज्या घरातच राहून माज्याच घरातली कामं करायची येळ आली हाय माज्यावर! सवय नाही ना सोताच्या घरात काम करायची.

ताई:- मग फोन करून येणार नाही तसे कळवायचे तरी ना आम्हाला. तुम्हा लोकांना ना काही मॅनर्सच नाहीत.

को:- ताई, मगाशी सांगितलं ना तुम्हाला, चार मिस कॉल दिले पण तुमचे उत्तरच नाही. माझा बॅलन्स पण संपला होता. रिचार्ज करायला पण पैसे नाहीत.

ताई:- मग सांगायचे ना तसे. मला कसे कळणार तुझा बॅलन्स संपला ते? मग?

को:- मग काय? मी सरळ साहेबांना मिस कॉल दिला. त्याचा लगेच रिप्लाय आला. लय आपुलकीने चवकशी केली. आणि दोन मिनिटात फोन रिचार्ज पण करून दिला.

ताई:- काय? साहेबांनी दोन मिनिटात रिचार्ज करून दिला तुला फोन? मला दहा वेळा आठवण करून द्यावी लागते त्याला रिचार्ज करण्यासाठी. येऊन दे घरी. आज बघतेच मी त्याला.

को:- साहेब लई चांगले आहेत सोभवाने. व्हाटस अप वर रोज चांगल्या पोस्ट पाठवत असतात.

ताई:- काय? म्हणजे व्हाटस अप वर तुम्ही मेसेज पाठवता एकमेकांना? अन मला म्हणतो तू खूप ग्रुप वर आहेस माझ्या. सारखं लक्ष असतं तुझं माझ्या पोस्टवर.

को:- माझ्या एफबी वर परवाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ना त्यांनी. त्यांनी तर उघडून दिलंय FB वर अकाउंट मला.

ताई:- काय? माझ्या नवऱ्याने फेस बुक वर तुला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली? गेले वर्षभर माझी रिक्वेस्ट पेंडिंग ठेवलीय त्यानं. घरात एकत्र राहात असताना आणखीन FB वर कशाला म्हणे? आणि तुला मात्र लगेच..... अगं तुला हे बघायला वेळ तरी कधी मिळतो? या लोकडाऊन मुळे आम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाही.

को:- अवो ताई, या लॉकडाउन मुळे तर आमाला येळ मिळायला लागला आहे की सोतासाठी. एवढे दिवस तर दिवसभर नुसती धावपळ चालायची या सोसायटीतून त्यात सोसायटीत आणि या घरातून त्या घरात. आता कुठे सोतासाठी येळ मिळतोय. त्यात मी हे शिकून घेतेय.

ताई:- अगं पण घरात तुझी सर्व कामे आम्हाला करावी लागतात त्याचं काय? धुणे, भांडी, लादीपोचा, डस्टिंग. शिवाय रोजचा स्वयंपाक आहेच तीन वेळचा. त्यात आता ऑफिस चे काम पण घरूनच करावे लागते. माझा जीव मेटाकुटीला आलाय गं. ये बाई लवकर कामाला.

को:- आता लोकडाऊन उठल्याशिवाय तर येता येणार नाही ना ताई? शिवाय तुमच्या सोसायटीत पण आम्हाला यायला बंदी आहे. आणखीन काही दिवस तुम्हालाच करावे लागेल हे सर्व असे दिसतंय. पगार घ्यायला येऊ का उद्या?

ताई:- पगार? अगं गेली तीन महिने आम्हीच तुझी सर्व कामं करतोय. तूच द्यायला पाहिजे आम्हाला पगार. दर  महिन्याचा पगार मात्र तू न चुकता घेणार, कशाबद्दल?

को:- असं काय करताय ताई? आम्ही आपणहून घरी बसलोय का? सरकारच्या आदेशाचे पालनच करतोय ना? त्यांनीच तर सांगितलं आहे की पगार कापू नका म्हणून. मला बी लै कंटाळा आलाय हे वर्क फ्रॉम होम करून. काही गॉस्सीपिंग पण करायला मिळत नाही. मी यायला तयार आहे पण तुम्हीच नको म्हणालात मागे. परवाच आमच्या वाडीत एक केस सापडली कोरोना ची. समदा एरिया सील केलाय दोन आठवड्यासाठी. तो संपला की येते.

ताई:- अगं, एवढी घाई नाही आहे. तीन महिने काढलेच ना कसेबसे. आणखी काढू. पण तू नको येऊ. मी सांगते साहेबांना तुझा पगार तुझ्या अकाउंट ला ट्रान्सफर करायला. तुझा अकाउंट नंबर पाठव मला.

को:- तो आहे की साहेबांकडे. मागे माजे इजेचे बिल त्याच अकाउंट मधून भरून दिले साहेबांनी.

ताई:- काय साहेबांनी तुझे इलेक्ट्रिसिटी बिल पण भरले! केव्हा?

को:- तो प्रॉपर्टी टॅक्स भरायचा होता ना ऑनलाइन त्यावेळी. म्हणाले ,"कशाला उगाच लायनीत उभी राहते?" लई दयाळू आहेत साहेब.

ताई:- तुझा प्रॉपर्टी टॅक्स तू ऑनलाइन भरते? आणि साहेबांनी तो भरून दिला? मी परवा त्याला ऑनलाइन भरायला सांगितला तर एरर येतोय म्हणाला. शेवटी मी तीन तास इनलाईन मध्ये उभी राहून टॅक्स भरून आले आणि तुझा ऑनलाइन भरला? येऊ दे त्याला घरी चांगलंच लायनिवर आणते. तुझे आणखीन काही टॅक्स-बिलं भरायची असली तर विनासंकोच  सांग हा बाई.

को:- त्याची गरज नाही बाईसाहेब आता. या तीन महिन्यात मीच सर्व शिकून घेतलंय मुलीकडून. ठेवू का फोन. माझ्या ऑनलाइन क्लास ची वेळ झालीय.

ताई:- आता कसला कोर्स करते तू ऑनलाईन?

को:- गाणं शिकतेय.पंडित भास्करबुवा यांच्याकडून. रोज एक तास शिकवतात ते ऑनलाइन. गळ्यात गोडवा आहे असे म्हणत होते.

ताई:- कोण?पं डित भास्करबुवा असे म्हणत होते?

को:- नाही, आपलेच साहेब म्हणाले होते मागे. मी एकदा काम करताना गाणे म्हणत होते ना तेव्हा. ते गळ्यात गंधार की काय असे म्हणाले होते. तेव्हा मी पण म्हंटले, लॉक डाउन मध्ये आता चांगला चान्स आहे गाणं शिकायचा. नंतर आहेच आपलं रडगाणं. बरं ताई, फोन ठेवते आता. सर आलेत ऑनलाइन. ताई, तुम्ही काय शिकलात नवीन लॉक डाउन मध्ये?

ताई:- मी? मी ना नवऱ्यावर लक्ष ठेवायला शिकले लॉक डाउन मध्ये. चल ठेव फोन. काम ना धाम उगीच गावच्या चौकश्या. (फोन आपटते)

             😊 समाप्त😊

लेखक:-प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी