Friday, June 7, 2019

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे

१३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी या सणाच्या दिवशी अमृतसरच्या जालियनवाला बागेमध्ये सत्यपाल आणि सैफुद्दीन या क्रांतिकारकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या निशस्त्र भारतीयांवर ब्रिगेडियर जनरल डायरच्या आज्ञेवरून गुरखा रायफल्सने अमानुष गोळीबार केला. अपरिमित जीवितहानी झाली. भारतीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. डायर इंग्रजांसाठी हिरो ठरला आणि भारतीयांसाठी निर्दयी सैतान. त्यात रुडयार्ड किपलिंगने "डायर त्याच्या दृष्टीने त्याचे काम करत होता" असे वादग्रस्त विधान केले. उद्विग्न रवींद्रनाथ टागोरांनी "सर" हा ब्रिटिशांनी देऊ केलेला किताब धुडकावून लावला. असे म्हणतात की जालियनवाला बाग हत्याकांड इंग्रजांच्या भारतातल्या राज्याच्या शेवटची सुरुवात होती.
या एप्रिल मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली. मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी कुसुमाग्रज यांनी या घटनेवर लिहिलेली कविता निवडण्याचे हेच प्रयोजन. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"
प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

कवितेची सुरुवात कुसुमाग्रज थेट येशू ख्रिस्तापासून करतात. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील बलिदानाची, त्याने सांडलेल्या रक्ताची आणि त्याने जगाला दिलेल्या प्रेम शांती आणि क्षमेच्या संदेशाची ते आपल्याला आठवण करून देतात. पण आज येशूच्या पताका (वारसा) ज्यांच्या हातात आहे ते, म्हणजे ब्रिटिश सरकार, मात्र निशस्त्रांच्या रक्त-मांसामध्ये बुडाले आहे. एकीकडे ते ब्रिटिशाना त्यांच्या उदात्त परंपरेची आणि शिकवणीची आठवण करून देत आहेत तर दुसरीकडे ते या शिकवणीपासून दूर गेल्याचे सांगत आहेत. या पंक्तीमध्ये ते खेद व्यक्त करत आहे.
एकीकडे कवी ब्रिटिशाना मर्द म्हणत आहे, पण हे मर्द मुला-बायकांवर गोळ्या चालवणारे मर्द आहेत असे उपहासात्मक विधान करत आहेत. निशस्त्रांवर गोळीबार करण्यात कसली मर्दुमकी? हा गोळीबार म्हणजे ब्रिटिशांचा पॅरानॉईया होता. या गोळीबारात त्यांना भारतीयांबद्दल (जरी निशस्त्र असले तरी) वाटत असलेली भिती प्रक्षिप्त झाली होती.
कवी देवाला देखील आवाहन करतो. पाला पाचोळ्या सारख्या पडलेल्या प्रेतांच्या राशी पाहून देवा तू देखील डोळे झाकुन घेतले असशील. हा अत्याचार, हे मरण तांडव, हा अन्याय देव देखील पाहू शकत नाही इतका भयानक होता. या देवाच्या आळवणीत आपल्याला कवीची कळकळ आणि तळमळ दिसते.
शेवटच्या पंक्तींमध्ये कवी विस्मय करतो आहे की ही घटना म्हणजे सैतानाची देवावर मात तर नसेल ना? इथे आपल्याला कवीचे नैराश्य दिसते. झाल्या घटनेबाबत आपण काही करू शकत नसल्याची उद्विग्नता दिसते, वैफल्य दिसते. आणि अगदी शेवटी कवी आपल्याला परत जेथून सुरुवात झाली त्या येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो आणि ही घटना ही येशूच्या काळजात आणखी एक जखम आहे असे म्हणतो.
या कवितेचे एक वैशिष्ट्य असे आहे की या कवितेत खेद आहे, राग आहे, असहाय्यता आहे, उपरोध आहे, उद्विग्नता आहे पण बदल्याची भावना किंवा प्रतिशोधाची मागणी नाही. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेशाची संपूर्ण अंमलबजावणी आहे. आजही भारतीय लोक ब्रिटिशांनी या घटनेची माफी मागावी अशी मागणी करत आहेत. आजही गांधीजींचा संदेश भारतीयांनी अंगिकारलेल्या आहे. पण आजही ब्रिटिश माफी मागायला तयार नाहीत. आजही ते येशूच्या वाटेवर चालायला तयार नाहीत. आजही त्यांनी येशूची शिकवण अंगिकारलेली नाही.



No comments:

Post a Comment