Sunday, July 7, 2019

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे


पोरसवदा होतीस - बा.सी.मर्ढेकर

भारतीय परंपरेमध्ये स्त्रीची अनेक रूपे आहेत. कधी मुलगी, कधी भगिनी, कधी अर्धांगिनी, कधी माता, कधी आजी, कधी रणरागिणी, कधी साध्वी...

१६ जूनला भारतामध्ये पिता दिवस (फादर्स डे) असतो. आज मी मर्ढेकरांची ही कविता याच कारणाने निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.

पोरसवदा होतीस - बा.सी.मर्ढेकर

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.

ही कविता एका बापाची कविता आहे. कवितेची सुरुवात पित्याला आपल्या लेकी बद्दल वाटणारी ममता दर्शविते. पण तो हे जे म्हणतो ती भूतकाळातील गोष्ट आहे. आज तीच लेक लग्न होऊन आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. तिचे पोट आतील बाळामुळे टपोरे झाले आहे आणि याच बाळासाठी तिच्या पायी एका छोट्या जीवाची साखळी, एक हवेहवेसे वाटणारे गोड बंधन, पडले आहे. तिच्या हालचालींवर निर्बंध आलेले आहेत. जरी ती कालची पोर असली तरी पण आता ती उद्याची माउली आहे. आणि माउली ही सर्वाना वंद्य आहे, म्हणून तो पिता तिच्या पायाचे तीर्थ घेऊ इच्छितो.

कवी अगदी कमी शब्दात आपल्याला खूप काही सांगून जातो. पहिल्या कडव्यात बापाचे लहान लेकीसाठीचे प्रेम दिसते, दुसऱ्या कडव्यात ती बाळंतपणाला आल्याबद्दल समाधान आणि तिच्यात होत असलेल्या स्वागतार्ह बदला बद्दल कौतुक आहे तर तिसऱ्या कडव्यात उद्याच्या माउलीला वंदन आहे. आज ती लेक बापापेक्षा मोठी झाली आहे.

या कवितेत जितक्या बापाच्या भावना आहेत तितकीच स्त्री बद्दल आणि विशेष करून माते बद्दल असलेला भक्तिभाव आहे. माता, मग ती कोणाचीही असो, सर्वथा वंद्य आहे. ती आपल्या पिलाला मोठे करण्यासाठी जो त्याग करते त्या त्यागाला केलेले हे वंदन आहे आणि लेकीच्या पायाचे तीर्थ घेण्याची तयारी दर्शवणाऱ्या बापाच्या मनाचा मोठेपणा सुद्धा आहे.

No comments:

Post a Comment