Saturday, November 16, 2019

आमची दिवाळी - श्री. संतोष राक्षे


आमची दिवाळी खरं तर थोडी वेगळी होती,  छोट्या छोट्या आनंदाने ती भरभरून होती

मामाच्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या कौरव-पांडवांच्या भांडणांइतकी कठीण होती
कधी शेंडेफळ म्हणून आईच्या सोबतीने पदर पकडून जाण्याइतकी लडिवाळ होती
घरी बनविलेल्या पारंपरिक कंदीलाच्या प्रकाशाने चांदण्यांचेही डोळे दिपवणारी  होती
कधी फुलबाजे, पाऊस कधी फुसक्या फटाक्यांच्या दणदणीत आतिषबाजीची होती……. 
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

चाहूल येताच घर गोठा आणि तुळशी वृन्दावन सारखी सारवून स्वच्छ होती
कधी कानाकोपऱ्यातील नैराश्यपूर्ण जळमटे झटकून देत नवचैतन्याची होती 
फराळातील करंजीमधील सारणासारखी तर कधी लाडवासारखी माधुर्याची होती 
कधी खुशखुशीत चकली, आंबूस अनारशे कि झणझणीत चिवडा यांतील पेचाची होती ……….
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सर्व भावंडाना मिळणाऱ्या एकाच ताग्यातील शर्टइतकी चौकटीत होती 
कधी पिस्तूल आणि टिकल्यासाठीच्या आजी आजोंबांच्या लाडागत वारेमाप होती
बाबांसोबत येणाऱ्या लवंगी-लक्ष्मीबारच्या आवाजासारखी धुमधडाक्याची होती
कधी एका पंगतीत गुण्यागोविन्दाने खाल्लेल्या फराळाइतकीच  साग्रसंगीत होती …………
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सकाळी चिरांत फोडल्यानंतर उटण्याचा ओवाळणीने सुंगंधी होती
कधी लक्ष्मीस्वरूप केरसुणीच्या मानाची तर गोमातेच्या ब्रम्हपूजनाची होती
बहिण भावाच्या त्या नात्यातील छोट्या भेटवस्तूही वाट पाहणारी होती
कधी शेतखळ् आणि घरात धनधान्याने भरलेल्या रांजनाएवढी समृद्ध होती ……..
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती………….

भाऊबीजेच्या स्टीलच्या डब्यावर आपले नाव नाही म्हणून रुसण्याची होती 
कधी आईला पाडव्याला मिळालेल्या त्या लुगड्याच्या काठपदराइतकी भरजरी होती
आजोबांच्या कोऱ्या तलम रेशमी फेट्याइतकी रुबाबात मिरवणारी होती 
कधी वजरटीक पुतळ्यांच्या सुवर्ण अलंकारांनी आजीइतकीच सुरेख नटलेली होती  ………

तशी आज देखील साजरी केलेली हि दिवाळी देखील दिवाळीच आहे

आज देखील घरी  दिवाळीच्या  आठवणीत रमणारी आजोबा-आजी आहे 
सुखदुःखाच्या साथ देणाऱ्या आप्तांची मित्रांची निर्धास्त साथ आहे
आई बाबा आणि  वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाचा आम्हांला मान आहे   
काळाच्या ओघाने बदललेल्या संस्कृतीची आम्हांला आजही जाण आहे ……

ती दिवाळी वेगळी मान्य…. तरीही आजची दिवाळी देखील आगळी वेगळी आहे

श्री. संतोष राक्षे  


No comments:

Post a Comment