Sunday, September 30, 2018

नियति

आज बऱ्याच दिवसांनी थोडी निवांत झाली होते , सहज मनात विचार येत होते ते आयुष्यातल्या वाटचालीचे, स्वतःचीच स्वतःला ओळख पटवून द्यायची व्यर्थ खटाटोप चालली होती . मनात विचारांचा काहूर माजला होता नि त्यातूनच जाणवत होते की किती कठीण आहे जगणे. अचानक मनाने ताबा घेतला तो भूतकाळाचा , त्या भूतकाळातल्या आठवणीतले एक व्यक्तिमत्व होते आमचे "दादाजी".   
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका अन त्या तालुक्यातील एक खेडेगाव शिरगाव. आज प्रतिशिर्डी म्हणून ते प्रसिद्ध आहे हे गाव . तळेगाव ( दाभोडे) कडे जाताना लागतो तो सोमावो फाटा , फाट्यावरून आत काही अंतरावं वसलेले हे एक गाव. माझ्या आठवणीतल्या आत्याचे गाव , अर्थात आता खूप काही बदलले आहे , पण माझ्या आठवणीत अजूनही जिवंत आहे ते सुमारे ३५ वर्षापूर्वीचे खेडे गाव , मातीचे रस्ते त्या रस्त्या वरून ये - जा करणाऱ्या बैल गाड्या , एखाद दुसरी दुचाकी गावात वीज नसल्यामुळे संध्याकाळ झाली की घरा घरात टिमटिम प्रकाश देणारे कंदील. सगळीच घरे कौलारू , जमिनी शेणाने सारवलेल्या.
पवणा नदीचा प्रवाह गावातूनच वाहत असे , नदीच्या काठापासून अगदी पन्नास पावलावर आत्याचं घर . चार गुंठ्यात बांधलेलं मातीच्या विटांचा ते कौलारू  घर , घरा समोर भली मोठी ओसरी , घराला लाकडी दरवाजे , त्यांना लोखंडी सळ्यांच्या कडया, आत भले मोठे दालन त्यातच दोन्ही बाजूला समोरासमोर मातीच्या पचण्या बनवून तयार केलेली माडी ; माडीत सामान ठेवलेले असायचे ते म्हणजे गुरांचा कडबा (चारा ) , शिवाय चूलीसाठी लागणारे सरपण ( झाडांच्या सुख्या फांद्या ) , शेणाने बनवलेल्या गवऱ्या .
दुसऱ्या दालनात प्रवेश केला की दिसायचे पितळेची चकाकणारी भांडी , मोठे मोठे हंडे , कळश्या . विशेष करून ह्या दालनाच्या एका भिंतीला लावलेली असायचे मातीच्या घागरीची चवडी , एकावर एक घागरिंचा थर अश्या सात ते आठ रांगा भिंती लगत असायच्या. एका बाजूला भला मोठा मातीचा पिंप , जे कणगी या नावाने प्रचलित आहे त्यात वर्षभराचे धान्य साठवले जाते.
दुसरे दालन ओलांडले कि तिसरे माजघर , तिथे एका कोपऱ्यात मांडलेली असायची मातीची चूल आणि चुलीच्या बाजूला काही अंतरावर न्हाणीघर (बाथरूम ) बाजूला लाकडी दरवाजा आणि त्या बाहेर भली मोठी पडवी , गुरांचा गोठा ( गाय , बैल , म्हैस इ. जनावरांची राहण्याची सोय )

एकत्र कुटुंब पध्दतीत साकारलेले हे घर लहानांन पासून ते थोरांपर्यंत २५ माणसांचे वास्तव्य आणि या सर्वांवर देखरेख करणारी एकच व्यक्ती आणि ती म्हणजे माझ्या आत्याचे यजमान "दादाजी ". साधारण पासष्टी ओलांडलेले , पोषाख पांढरी बंडी , पांढरे धोतर तसेच डोक्यावर पंधरा फेटा खांद्यावर उपरणे सतत ओसरीवर घोंगडी अंथरून मांडी घालून बसलेले असल्याचे आमचे दादाजी. घोंगडीच्या बाजूला नेहमी एक काठी असे , असो दादाजींचं वर्णन करता करता पूर्ण देखावाच डोळ्या समोर उभा राहिला आणि मनाला न आवारात त्या देखाव्याचे वर्णन केले .

उन्हाळ्याची अर्थात मे महिन्याची सुट्टी सुरु झाली की मी वडिलांकडे हट्ट करायचे की मला गावी पोहचवा , माझा हट्ट देखील पुरा केला जात असे , लहानपणापासूनच मला गावची ओढ इतर भावंडान पेक्षा जास्तच होती . साधारणपणे नववी पर्यंत माझी दरवर्षी गावाला भेट असायची महिना महिना वास्तव्य असायचे नि आदेशाचा डोस मिळायचे ते  दादाजीं कडून , ते त्यांचे अनुभव आम्हाला सांगायचे त्यातूनच आम्हाला उपदेश करायचे ,त्यावेळेस अल्लड होतो पण त्यांच्या धाकापोटी का होईना त्यांच्या समोर जाऊन बसायचो.
"ममईची (मुंबईची) पोर आली का ? मग काय लागली का सुट्टी ? साला (शाळा ) काय म्हणती ? अभ्यास करती का खाती धपाट ? काय हो दादाजी मी काय ढ वाटले तुम्हाला ? एकतर वर्षभर अभ्यास करायचा हीच तर सुट्टी मिळते मज्जा करायला ....... माझे आपले उगाच रागावणे .....
तस नाय इथे तुझं आई बाप नाय , इसवासान धाडत्यात आमच्याकड उगाच कालवा नको , चार गोष्टी आमीबी तुला शिकवायला हवं , पोरीची जात तू जपावं लागतंय ......... सखे (बायकोला हाक मारायचे ) पोर आलीय सुट्टीला चांगलंचुंगलं खायला घाल तिला . जरा आपल्या शेतातल काम शिकिव , दाव तिला नदीवरून पाणी कस वाहत्यात , डोक्यावर हंडे कास धरत्यात ,इतालच पोरगा बघू नि देऊ लावून तीच लगीन , कुणी बोलायला नको पोरगी शिकली  पण हुकली  ......... एवढे बोलून जोरजोरात हसत , माझं मात्र हे सगळं ऐकून तिळपापड होत असे . . मनात मी म्हणे , बोला काय बोलायच ते बोला एकदा का आम्ही सगळी मुले जमा झालो कि कोण ऐकतय तुमचं आम्ही करू मज्जा .
...

गावात घर रस्त्यावरच असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला  दादाजी हाक मारीत. राम राम , या ता वाईस  बसा मंग पुढ जा.. सखे ..च्या (चहा) टाका  पावण्यांना, मग काय दिवसभर ते चहाचं पातेलं चुलीवरून  ढळत नसायचे. कोणी न कोणी राम राम करीत यायचा  नि चहाचा  स्वाद घेवून पुढे जायचा. अख्या गावात त्यांचा दबदबा होता,  गावकरी त्यांना खूप मान देत. घरात सुमारे ५०-६० म्हशी, ५ जरशी गाई, चार बैल, दुधाचा व्यवसाय शिवाय  भरघोस जमीन . पण येवढं असून  ते मात्र फारसे शिकलेले नव्हते. थोडं फार लिहिता वाचता येत होतं त्यांना. असाच एका रात्री  त्यांनी आम्हां पोरांनाएकत्र केलं आणि म्हणाले " दिसभर गावं धुनाडलाय, या आता वाईच  बसा  इकडं, पोरांनो तुम्हाला गोस्ट आईकायाची  का नियतीची". त्यांच्या भाषेची लकब काही वेगळीच होती , मला खूप आवडायची, त्यात ते गावरान शब्द, कधी कधी मला अर्थ  समजून घ्यावा लागायचा मला. तसच  त्यांच्या " नियती" हा शब्द देखील नवखा होता मला त्या वयात समजायला...

पण त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आम्हांला.

त्याच  गावाचा सरपंच , त्याचं घर बीआमच्यावाणीच खटल्याच, दुध दुभत्यांन भरलेलं, मॉप जमीन लोकांची लुबाडलेली, पैका अडका भारी, त्याला चार पोरं, कारभारीण तर दागिन्यांनी मढलेली

जमीन जुमला पैका समद असून बि जपायची अक्कल नव्हती, कधी लक्षच दिलं न्हाय  घराकडं
 पर शिरमंतीची लई घमंड त्यांना, येता जाता गडी माणसांचा पाणउतारा करायचा, अडला नडला दिसला कि त्याचा फायदा घ्यायचा नि थोडं पैकं दिऊन त्याची जमीन घ्यायची ताब्यात, त्या येळाची लोकं भाबडी , त्यांना वाटायचं ह्यो आपल्याला गरजला मदत करत्योय . पर ह्यो पठ्या लय सोकावलेला . ह्याची कारभारीण गावाच्या बाय बापड्यांना आपल्या शेतात राबू राबू घ्यायची नि पिक आली कि चार दाणं टाकायची त्यांच्या पदरात.  त्यांना वाटायचं आप्ल्यावानी  कुणी न्हाय . मॉप हाय आपल्याकडं, चार चार पोरं हायत आपल्याला . काय बी कमी न्हाय.कशाचंच भ्यां नव्हतं त्यांना. . पर पोरांनो नियतीचा घाला भल्या भल्यांनाचुकला न्हाय. लई लोकांना लुबाडलं, कमी ल्याखलं, लई माज क्येला सिरमंतीचा, पर दिस त्येचं राह्यलं न्हाय.त्ये बी बदललं, पोरं कळती झाली
तशी  लागली वाईट चालीला , याक धड न्हाय निघालं , बापानं जेवढं कमावलं ते लागली गमवाया. आय बापाचं काय बी ऐकायचि न्हाइत...येका पोरांन तर बाप ऐकत न्हाय म्हणून घातली काठी त्याच्या कंबरडयात  नि मोडलं बापाचं कंबरडं , झालं लुळ ब्यानं.. नि पडलं येका जागेवर .. पार माज उतरला सिरमंतीचा, म्हातारी लागली जायला लोकांच्या श्यातात बिगारीवर , चार पोरंचारी दिसेला गेली.  आजच्या वगताला दोघं नवरा बायको गावकऱ्यांच्या  तुकड्यावर  जगत्यात, देवाकडं मरान  मागत्यात.........

एवढे बोलून दादाजी  गप्पा झाले. आम्ही देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे  बदलते रंग पाहून स्तब्ध झालो. अचानक ते मोठ्या मोठ्याने हसू लागले. " तर पोरांनो काय? समजलं का? देवांन दिलाय ते जपून खा , उतमात करू नगा.आज हाय त्येच उद्या राहील ह्याची काय बी ग्यारंटी न्हाय. मानसाचा जनम एकदाच मिळतोय. सोताच्या स्वर्थापाई कुणाचं नुसकान करू नगा.गरिबी आली तर लाजू नगा नि शिरमंती आली तर माजू नगा.ज्ये पेरलं त्येंच उगवत असतंय येखाद्याला दुख दिलंततर समजा तेच पुढ त्येच तुमच्या नशिबाला आल्यावाचून राहायचं न्हाय.नियतीचा फेरा कुणाला बी चुकला न्हाय.आपल्या कर्माचं आपल्या पोरांना भोगावं लागतय...येवढ लक्षात ठिवा देवाला बी भोग चुकलं न्हाय मग आपण तर माणसच.

तर पोरांनो आज तुम्ही समदी जाणती हात..
एक लक्षात राहूद्या . कुणावर अन्याय करू नका.नाय्याने वागा नि कुणाचा अन्याय बी सहन करू नका.अन्याय करणारा नि त्यो अन्याय सहन करणारा दोघं तेवढंच पापी.नियतीन वागा म्हंजी देव बी तुम्हाला मदत करील.
दादाजींचे ते शब्द आजही माझ्या मनावर बिंबले गेलेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दादाजींनी केलेल्या उपदेशांची प्रचीती आलीय खरी...नियत सोडून वागणाऱ्यांचे, भल्या भल्यांचे हाल ह्या डोळ्यांनी पाहिलेत. खरे आहे "नियती"  कोणाला सोडत नाही आणि चांगल्या नियतीने वागणाऱ्यांना परमेश्वर मदत केल्याशिवाय राहत नाही... "दादाजी" कळत नकळत चांगले संस्कार मात्र करून गेले....

No comments:

Post a Comment