Saturday, September 29, 2018

अविस्मरणीय विस्मरण..


 
तसं बघायला गेलं तर विसराळूपणा म्हणजे मोठा त्रासच. पण ह्यातून ज्या गमतीजमती निर्माण होतात ना त्या आठवल्या की आपल्या वेंधळेपणावर हसूच येते… अणि मग त्यांच्या बनतात अविस्मरणीय आठवणी.
 
असं म्हणतात की कलाकार मंडळी विसराळू असतात कारण ती त्यांच्याच दुनियेत रममाण असतात.. पण माझ्या मते विसरभोळेपणा काही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही.
 
आता आमचंच घ्या ना.. नवीन लग्न झालेलं.. एकदा रात्री जेवणानंतर पिक्चर बघायला जायची हुक्की आली. मग काय काढली गाडी, अणि निघालो. ह्यांना एक मेल करायचा होता म्हणुन सायबर कॅफेमध्ये गेलो.. पटकन मेल करुन पिक्चरला गेलो.. मस्त होता पिक्चर.. हीरो हिरॉईनच्या गप्पा मारत घरी आलो… अणि दार उघडायला गेल्यावर लक्षात आले.. किल्ली?. . किल्ली कुठाय.. घाईत निघाल्याने पर्स न घेता हातातच किल्ली ठेवली होती अणि आता ती त्या सायबर कॅफेमध्ये विसरले होते.. झाले..म्हणजे बसा आता सकाळी तो सायबर कॅफे उघडण्याची वाट बघत. रात्रीच्या दीड वाजता डोक्याला हात लावायची वेळ आली होती.. पण असे हातावर हात धरून बसणारे आम्ही कुठले.. घर सुदैवाने टॉप फ्लोरला असल्याने सुदैवाने मोठी ओपन बाल्कनी होती.. अणि सुदैवाने तिथे बाहेरून कुलूप लावलेले नव्हते (विसराळू असलो तरी सुदैव बलवत्तर असते).. ह्यांनी टेरेसवरून बाल्कनीत उडी मारून काहीतरी खटपट करून बाल्कनी चे दार उघडले अणि रात्री 3 वाजता माझा गृहप्रवेश झाला. हुश्श..

 
आता भाजीत मीठ घालायला विसरणे, जाताना नेलेली छत्री परत आणायला विसरणे, बाजारहाटाला जाणे अणि पिशवी न्यायला विसरणे ह्या तर अगदी नेहमीच्याच गोष्टी.. इतकंच कशाला, शॉपिंगसाठी म्हणुन जावं अणि एकूण एक पिशव्या भरून सामान घेऊन घरी आल्यावर लक्षात यावं, अरे! ज्या वस्तूसाठी गेलेलो, ती तर विसरलोच की!

 
माझ्या मैत्रिणीचा किस्सा तर अजून भन्नाट आहे.ते चार पाच जण मिळून प्रथमच सहलीला निघालेले.. . मुक्काम चांगला आठवडाभर असल्यामुळे सगळे सामान बॅगांमध्ये खचाखच भरून घेतलेले.. हे घेतलंय ना, ते घेतलंय ना करत एकदाचे निघाले सगळे.. निघाल्यावरही, पंखा स्विचऑफ केलास ना, पाण्याचा नळ बंद केलाय ना, गॅस सिलेंडर बंद आहे ना असे सुरूच होते.. .

शेवटी धमाल मस्ती करत लॉजवर पोहोचले अणि बॅगा उघडून बघतात तर काय.. गड्याने चुकून दुसर्‍याच बॅगा गाडीत ठेवल्या होत्या.. मूळ सामानाच्या बॅगा घरीच राहिल्या होत्या.. गप्पांच्या नादात सगळे बॅगा चेक करायला विसरले होते.. कपाळावर हात मारून घेण्या शिवाय दुसरे तरी काय करणार..

 
मग काय मंडळी, आहेत की नाही ह्या विस्मरणाच्या अविस्मरणीय आठवणी ..

काही जणांकडे मात्र नसतात अशा आठवणी.. अशा लोकांचा हेवा करावा की कीव कळत नाही .. जाऊ दे ना.. जास्त विचार नको करायला नाहीतर माझेच मौल्यवान विचार मी विसरून जाईन. 😀

 
डॉ पल्लवी प्रसाद बारटके


 

No comments:

Post a Comment