Tuesday, September 29, 2020

बक्षिसाच्या निमित्ताने----- मंजुषा जोशी

 

बक्षिसाच्या निमित्ताने

 

व्हॉट्सऍप वरच्या शिक्षक दिनाच्या पोस्ट्स आणि महाराष्ट्र मंडळाच्या हस्ताक्षर स्पर्धेची घोषणा योगायोगाने एकत्रच समोर आल्या. स्पर्धेसाठी नाव द्यायला क्षणभरही विचार करावा लागला नाही. असं वाटलं की माझे शिक्षक- ज्यांनी कायम चांगलंच अक्षर काढायला शिकवलं, आई- जिने मुळाक्षरे घोटून घेतली ज्यांच्या आठवणीत मी अनेकदा 

रमतेत्या सगळ्यांना उजाळा द्यायची ही छान संधी आहे.

 

चांगलं नीटनेटकं हस्ताक्षर, शुद्ध लेखन, शुद्ध उच्चार आणि वाचन ही आयुष्यभराची पुंजी आमच्या पहिली पासूनच्या सर्व शिक्षकांनी भरभरून दिली. वर्गात साठ-पासष्ट मुलं असायची. पण शिकवण अशी की सगळ्यांची अक्षरं चांगलीच होती. म्हणजे अगदी कोरीव घोटीव नसली तरीही सुवाच्य होती, उच्चार स्पष्ट व शुद्ध होते. मुळातच ‘फक्त गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करा आणि बाकी विषयात फक्त पास व्हा’ असे सांगणारे पालक आणि शिक्षक सुदैवाने आम्हाला नव्हते. मराठी मीडियम मध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या आमच्या बाईंनी ‘रेन ऍन्ड मार्टिन’ हे ग्रामर चं पुस्तक आमच्याकडून दोन वर्षात करवून घेतलं होतं. वास्तविक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काही शिकवायला त्या बांधील नव्हत्या. पण मुलांना विषय समजला पाहिजे, मार्कच नाही तर ज्ञान मिळाले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या शिकवण्यातूनच दाखवून दिले. गृहपाठात खाडाखोड, अव्यवस्थितपणा असेल तर तो परत करायला लागायचा. आणि यात आई-वडिलांना आपल्या नाजूक पाल्याचा छळ वगैरे झालाय असं काही वाटायचं नाही. आई माझ्याकडून नीटनेटक्या अक्षरात परत गृहपाठ करून घ्यायची. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचं अक्षर खूप छान आहे-ती डॉक्टर असूनसुद्धा. ती खूप हुशारही आहे- अर्थातच. तिचं उदाहरण मला नेहमी दिलं जायचं. पण ‘तुलना केली तुलना केली' म्हणून माझ्या आई बाबांना कुणी लेक्चर दिलं नाही आणि मीही कधी गळा काढला नाही. खरंतर मी तिच्या बरोबरीने जास्त सुधारत गेले. अरे हो, माझं अक्षर चांगलं असण्यात माझ्या मैत्रिणीचाही वाटा आहेच. आमच्या वर्गांमध्ये स्पर्धा ही अटीतटीची होती. प्रत्येक वर्गात किमान आठ-दहा जणांची तरी अक्षरं  अगदी कोरीव,छापील वाटावीत अशी. आणि लिहिण्याचा वेगही उत्तम. त्यांची हुशारी ही तशीच. शिक्षकांनी निकषच असे उच्च ठेवले होते. तिथपर्यंत पोहोचता पोहोचता कधी-कधी धाप लागली, कधी धडपडलो पण ‘येत नाही, जमत नाही' असं म्हणायचा पर्याय त्यांनी दिलाच नव्हता. 

 

त्या नकळत्या वयात शिक्षक कडक, अगदी निर्दयी वाटले, शाळा कधीकधी तुरुंगही वाटली. पण नंतर कित्येक टप्प्यांवर याच गोष्टींचा आयुष्यभर उपयोग झाला. ‘इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा क्रमांक २असं लांबलचक नाव असलेल्या, मुंबईतील एका नावाजलेल्या शाळेच्या साध्या- सरळ शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांच्या ओल्या मातीला सुबक आकार दिला आणि जगातले टक्केटोणपे खाण्यासाठी आवश्यक असलेला कणखरपणाही.

 

 मला वाटतं, आपण मिळवलेल्या प्रत्येक बक्षिसाचे, सगळ्याच छोट्यामोठ्या यशाचे मानकरी हे कितीतरी वर्षापूर्वी आपले लहानगे हात हातात घेऊन आपल्याबरोबर अक्षरे गिरवणारे आपले आई-बाबा, ताई-दादा, आणि शिक्षक असतात. आज हस्ताक्षर स्पर्धेतील बक्षिसाच्या निमित्ताने त्यांचे हे ऋण मान्य केलेच पाहिजे.

 

- मंजुषा जोशी

No comments:

Post a Comment