Tuesday, September 29, 2020

"आठवणीतील भक्ती"------प्रशांत कुलकर्णी

 "आठवणीतील भक्ती"

 

आज १० सप्टेंबर २०२० भक्ती बर्वे आज असत्या तर त्या त्र्याहत्तर वर्षाच्या झाल्या असत्या. त्यांना अवचित जाऊन १०-१५ वर्ष लोटली पण आजही त्यांची जागा मराठी रंगभूमीवर रिकामी आहे. त्यांच्या समकालीन वा नंतरच्या पिढीतील अनेक अभिनेत्री नी मराठी रंगभूमी वर अभिनयाचे नाणे खणखणीत पणे वाजवून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्या बाबतीत आपण खरंच नशीबवान आहोत. सशक्त अभिनय पाहायला मराठी रंगभूमी कडेच आपले पाय वळतात. पण भक्तीचे स्थान मात्र तसेच अबाधित राहिले आणि ते तसेच राहणार आहे.

७० च्या दशकात  आमच्या सारख्या तरुण प्रेक्षकांवर या फुलराणी ने मोहिनी घातली होती. तत्पूर्वी ती रोज दूरदर्शन च्या मराठी  बातम्या मध्ये दिसायची. तेव्हा आज साडे सात च्या बातम्या द्यायला कोण येणार? याची उत्सुकता असायची. स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, स्मिता पाटील या पैकी कोणीही आले तरी त्यांचा एक चाहता वर्ग ठरलेला असायचा. मग भक्ती च्या उच्चारां मध्ये आजच्या बातम्या ऐवजी आसच्या बातम्या असे ऐकायला येते यावर चर्चा रंगायची. बातम्या देताना समोरून येणारी माशी ही देखील TV स्टार व्हायची.

अशावेळी भक्ती ची नाटके रंगभूमी वर जोरात सुरू असायची. पप्पा सांगा कुणाचे मध्ये श्रीराम लागू च्या मुलीचा रोल हा तिच्यासाठी वयानुरूप होता. पण नंतर या अल्लड बालिकेचा 'ती फुलराणी' ने कायापालट घडविला. केवळ भक्ती ला पाहण्यासाठी, तिच्या अभिनयासाठी रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या वाऱ्या करायला लागले. तुला शिकविन चांगलाच धडा हे ऐकताना तिच्या मस्तीत समरस व्हायला लागले. तिच्या तोंडून सतीश दुभाषि या तोलामोलाच्या अभिनेत्या बरोबर शुद्ध मराठी चे धडे गिरवताना मजा घ्यायला लागले. 'एक व्हता राजा' अशी सुरुवात होताच त्या थिएटर च्या गर्द काळोखात खुर्चीवर सावरून बसू लागले. कारण पुढच्या प्रसंगात बालकवींच्या साहित्य, काव्य प्रतिभेचा नजराणाच हे दोन्ही कलावंत आपल्या प्रतिभे द्वारे मुक्त हस्ते उधळीत असत. किती ऐकावे आणि कित्ती बघावे असे रसिकांची अवस्था होत असे.अत्यंत तृप्त मनाने,आनंदाने न्हाऊन  रसिक प्रेक्षक फुलराणी संपल्यावर बाहेर पडत असत. हा अनुभव ज्यांनी घेतलाय ते आजही उतारवयात त्या आठवणीत रमताना देखील असेच म्हणत असतील की 'आम्ही भक्ती चे फुलराणी पाहिलंय'. आणि हे म्हणताना त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे एक तेज दिसत असेल.

अशी ही फुलराणी एक दिवस अचानक परदेशात दुबई सारख्या ठिकाणी भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण शफी इनामदार यांच्या 'अदा' या हिंदी नाटकाचा प्रयोग दुबई च्या 'दुबई इंटर कॉंटिनेंटल’ या हॉटेल मध्ये ठरला आणि मग प्रयोगापूर्वी त्यांना फोन केला. नुकतेच शफी इनामदार यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी रामदास फुटाणे यांची चारोळी भलतीच गाजत होती.

"ज्या फुलराणी ची आम्ही आयुष्यभर केली भक्ती

तिने मात्र लग्न करून

पळी पंचांगास दिली मुक्ती "

 

प्रयोगानंतर भेटलेली भक्ती मात्र खूप खुशीत होती. नेहमी प्रमाणे शफी आणि भक्ती यांच्याबरोबर फोटो काढले गेले. पुढचे दोन दिवस दुबई दर्शन दाखवून भक्ती परत गेली. मग दरवेळेस प्रत्येक प्रयोगा निमित्त कधी दीनानाथ ला तर कधी पृथ्वी थिएटर मध्ये भेटत राहिली. ओळख वाढत राहिली.

मध्ये बराच काळ गेला. ९२ ९३ च्या सुमारास अबुधाबीत त्यांचा ‘पु ल फुलराणी आणि मी’ हा कार्यक्रम ठेवला गेला. माझा मित्र प्रल्हाद कुलकर्णी च्या घरीच त्यांची राहायची व्यवस्था केली गेली होती. मी भेटायला गेलो. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मधल्या काळात भेटी गाठी न झाल्याने आठवणी पुसट झाल्या होत्या. त्यांचा आयुष्याचा जोडीदार अर्धवट साथ सोडून निघून गेला होता. कार्यक्रमाला गाडीतून घेऊन जाताना त्या मागच्या सीट वर बसल्या होत्या, मी पुढे.

मी हळूच खिशातून ७ ८ वर्षांपूर्वी त्यांचे आणि शफी इनामदारांचे दुबई ला काढलेले फोटो मागे त्यांच्या हातात सरकवले. एकामागून एक फोटो पाहताना त्याच्या डोळ्यात आठवणींचा एक चित्रपटच तरळल्याचा भास मला झाला.

"मी हे फोटो माझ्याकडे ठेवू का?"

ओल्या पापण्यांनी मला विचारले. आमच्या हृदयातल्या फुलराणी ला नाही म्हणणे शक्यच नव्हते .

त्या नंतर मात्र त्या फुलराणीची भेट नाही झाली. अरे चोरा, हँडस अप, रातराणी, आई रिटायर होतेय, बहिणाबाई, जाने भी दो यारो या सारख्या नाट्य-सिनेमा आणि दूरदर्शन मालिकेतील तिच्या भूमिका मनात साठवत राहिलो.

पण तिच्याअशा दुर्दैवी अंताची कल्पना तिने पण केली नसणार. वाई ला कोणा एकाचा एकपात्री कार्यक्रम रद्द होतो काय आणि भक्ती ते आमंत्रण स्वीकारून तिथे जाते काय ! सर्वच अनाकलनीय.

पण आमची भक्ती मात्र अजूनही एकाच फुलराणी वर "तुमसे बढकर दुनियामें न होगा कोई और..........😢🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रशांत कुलकर्णी

अबुधाबी



No comments:

Post a Comment