पाणीच पाणी - बा. भ. बोरकर
पाणी, जल, नीर, जीवन. पाण्याला विविध नावानी संबोधले
जाते. मनुष्य जीवन पाण्यामुळे अस्तित्वात आले, फुलले, बहरले आणि जोपासले. पाणी म्हंटले
की बहुतांशी आपल्या मनात चांगल्या आठवणी जाग्या होतात. पाणी निर्मळ, शुद्ध, अस्वच्छता
घालवणारे आणि तहान भागवणारे. भारतात चालू असलेल्या पावसाळ्याचे निमित्त साधून मी बा.
भ. बोरकरांची ही कविता निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.
पाणीच
पाणी - बा. भ. बोरकर
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी
कसे आहे हे पाणी? ते तृप्त आहे, तुष्ट आहे, रुष्ट
आहे, पुष्ट आहे. प्रवाह हा पाण्याचा स्थायीभाव. त्याला अडवलेले, कोंडलेले आवडत नाही.
त्याला नदीरूपाने वेगाचे वेड आहे. या वेगवान पाण्याला निर्बंध घातला (धारण) आणि मग
त्याला नियंत्रित पद्धतीने प्रवाही केले तर त्यात दडलेली ताकत (वीज) ते आपल्याला देते.
पण हेच पाणी जर विहिरीत असेल तर ते शांत असते, पारदर्शी
असते आणि जेंव्हा त्याला विहिरी बाहेर काढतात तेंव्हा ते उच्शुंखल असते कारण ते थोडे
असते, कमी असते. ते मानवता जोपासते, वाढवते.
हेच पाणी जेंव्हा सागरात जाते तेंव्हा अक्राळ विक्राळ
आणि अनिर्बंध होते आणि पुन्हा पुन्हा ते खडकावर धडक मारत राहते. न थकता, न थांबता.
परिणामांची पर्वा न करता. अविरत.
हेच पाणी जेंव्हा पाऊस बनून पडते, तेंव्हा त्याचे
वेगवान थेम्ब साळींदराच्या काट्या प्रमाणे टोचतात, पण जेंव्हा ते जमिनीवर पडते तेंव्हा
मात्र ते एखाद्या लाडक्या प्राण्याप्रमाणे पायाशी घोटाळते. जमिनीची तहान भागवते. पिकांना
पाणी देते. थकल्या भागल्या वसुंधरेला ताजे तवाने करते.
अश्या या पाण्याच्या उत्सवी, पाणी उफाळून आले आहे
आणि पाण्याच्या या मोठेपणाच्या प्रत्ययाने मी देखील पाणीच झालो आहे. मी देखील स्वतःला
विसरून गेलो आहे. मी देखील तद्रूप झालो आहे. तन्मय झालो आहे.
पाण्याचा सर्वात मोठा गुणधर्म आहे देणे, देत राहणे.
त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता. जिथे जाईल तिथले होणे. ज्यात जाईल त्याचा रंग
धारण करणे. अशा या निर्मळ, शुद्ध आणि दातृत्वयुक्त पाण्याची माहिती सांगावी तेवढी थोडीच.
ही कविता दोन कारणांसाठी मला विशेष भावली. एक म्हणजे
या कवितेत पाण्याची अनेक रूपे चितारली आहेत आणि दुसरे म्हणजे ही कविता हा अनुप्रास
अलंकाराचा अत्योत्तम नमुना आहे.
No comments:
Post a Comment