Wednesday, November 18, 2020

खाजाचे कानवले! एक हृदयस्पर्शी ओली आठवण !!-----------सौ. अनुजा नेवगी

 

खाजाचे कानवले! एक हृदयस्पर्शी ओली आठवण !!

 

अलवार पदर सुटलेले,ठासून पिठी भरलेले,घासागणिक तोंडात विरघळणारे सीकेपी खासियत असणारे कानवले म्हणजे आमच्या आईची स्पेशालिटी.तसेही आपल्या आईने केलेल्या पदार्थांची सर कशालाही येत नाही.

 

कानवला म्हणजे प्रत्येक सीकेपी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय.दिवाळीचा फराळ हा त्याच्या शिवाय अपुर्णच!अत्यंत निगुतीने करावा लागणारा कानवला हा सीकेपी फराळाचा राजाच म्हणाना!!

 

मला आठवतंय, लहानपणी दिवाळी जवळ आली की आईची गडबड सुरू व्हायची.सुके खोबरे काळ्या पाठी काढून किसून ठेवायचे,सारणाचे तांदूळ धुऊन चांगले खडखडीत वाळवून दळून आणायचे ,ही इतर तयारी बरोबरची खास कानवले साठीची तयारी.गोडापासून सुरूवात करायची म्हणून मग सगळ्यात आधी होणारा पदार्थ म्हणजे पिठी.मंद आचेवर तुपात खमंग भाजलेली तांबूस कणिक आणि त्यात भाजून बारीक केलेले खसखस-खोबरे,पिठीसाखर,वेलची हे सगळं छान मिसळून डबाभर पिठी तयार झाली की सुरूवातीला वाट्या भरभरून आम्ही तेच खायचो.कानवले करायला घ्यायच्या दिवशी सकाळीच रवा भिजवून ठेवून जेवणं लवकर आटपून आई कानवले करायला बसायची.थोडे पांढरे कानवले आणि थोडे पिवळे कानवले!फूड प्रोसेसर घरात येण्याआधी,आईला पाट्यावर रवा कुटुन द्यायचं काम आमचं असायचं.साजूक तूप घालून घालून रवा कुटुन मऊ करेपर्यंत आई सारण मथून ठेवायची.तूप हाताने फेसून त्यात सारणाचे खास तांदूळ पीठ घालून गोळे तयार करून ठेवणे म्हणजे सारण मथणे.रवा कुटून चांगला पांढरा झालाय याची दहांदा खातरजमा करुन मग आई पापडया लाटून त्याला मथलेले सारण लावून वळकटया करून त्याचे लहान लहान तुकडे करायची.एकेका तुकड्यांना दोन्ही हातांनी अलगद पीळ देऊन पगडया करायला आम्ही पण बसायचो.ते सगळे ओल्या फडक्याने झाकून घेऊन मग खरे काम सुरू.छोट्या छोट्या पातळ  पाऱ्या  लाटून त्यात पिठी भरायचे कौशल्याचे काम मात्र आईचेच!तयार झालेले कानवले परत ओल्या फडक्याने झाकून घेऊन मंद गॅसवर तळायचे काम पण तिचेच!एखादा कानवला जर तळताना फुटला तर ते तूप फडक्याने गाळून घेऊन परत पुढचे काम सुरू.संध्याकाळ पर्यंत परातीत कानवले तयार!देवाला ठेवून, एकदा का कानवला खायला मिळाला की आमचा जीव शांत व्हायचा.खरेतर पांढरे आणी पिवळे दोन्ही कानवले सारख्याच चवीचे ,तरीही पिवळे कानवले आधी संपायचे आणी मग आता शेवटचेच म्हणून मग नाईलाजाने पांढरे खायचे.थोड्याफार फरकाने जवळ जवळ सगळ्याच सीकेपी घरांमधे हा असा कानवले सोहळा असायचाच.हल्ली नसेल दिसत हे  दृश्य , कारण ‘बाहेरून मागवणे’ हा सोप्पा पर्याय आता आहे.आणि तसेही आपल्या आयांसारखे चांगले कानवले करणे,’ये हर किसीके बस की बात नही है !’...निदान माझी तरी नाहीच नाही.... 😀

 

तर असे हे दर दिवाळीत आईची आठवण करुन देणारे कानवले पुराण !आणि सोबत माझा दरवर्षी होणारा,आईसारखे कानवले करण्याचा खटाटोप!! ☺️

 

आता तिची शारीरिक स्थिती हे सगळे करण्या पलीकडची आहे.  तरी मला खात्री आहे की शरीराने साथ दिली असती तर आज  वयाच्या ७७ व्या वर्षी देखील थरथरत्या हातांनी का होईना,तिने त्याच उत्साहाने पहिल्या इतकेच सुंदर कानवले आमच्यासाठी नक्कीच केले असते. आजही मी त्या दिवाळीची वाट पहातेय,जेव्हा ती फोन करुन मला सांगेल,” बय,कानवले झालेत!तुझा डबा भरुन ठेवलाय.कधी येशील न्यायला ” ??

 


लेखिका :सौ. अनुजा नेवगी

No comments:

Post a Comment