Wednesday, November 18, 2020

जशी मला भावली-------------श्री मंदार आपटे

 

कविता: जशी मला भावली


आवाहन - दत्ता हलसगीकर

२०१७ हे साल संयुक्त अरब अमिरातीने "इअर ऑफ गिविंग" म्हणून साजरे केले. समाजाच्या ऋणाची परतफेड करण्याच्या संस्कृतीचा प्रसार करणे हे या मागचे उद्दिष्ट होते. आज मी निवडलेली दत्ता हसलगीकरांची कविता देखील याच संकल्पनेवर आहे. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.

आवाहन - दत्ता हलसगीकर

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे

या कवितेमध्ये कवी म्हणतो की ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी ते, ज्यांच्याकडे नाही त्यांना, द्यावे. ज्यांच्याकडे बाग आहे त्यांनी फुले द्यावीत. ज्यांच्याकडे सूर आहेत त्यांनी गाणी द्यावीत. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी द्यावे. ज्यांच्याकडे श्रीमंत हृदय आहे त्यांनी ते रिते केल्यानेच भरते. जे मोठे आहेत त्यांनी लहानांमध्ये मिसळावे आणि जे जे पीडित आहेत त्यांना आधार द्यावा. इतरांना आपल्यामुळे जर आनंद मिळत असेल तर तो जरूर द्यावा.

समाजवादी दृष्टिकोनातून केलेली ही कविता मनाला स्पर्श करून जाते कारण यात केलेली मागणी रास्त आहे आणि कवी अतिशय सध्या भाषेत खूप काही सांगून जातो. आपल्या शेतात जर चांगले पीक यावे म्हणून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे वाटणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट आपल्याला जे सांगते तेच ही कविता सांगते. कवीने मानवातल्या मानवतेला केलेलं हे आवाहन आहे.

देण्याने तुमचे कमी होत नाही तर इतरांचे वाढते. जर सर्वांची उन्नती झाली तरच समाजाची उन्नती शक्य आहे. आणि ज्यांची परिस्थिती चांगली आहे (आर्थिक, सामाजिक, वैचारिक) त्यांनी इतरांच्या उन्नतीला हातभार लावणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

शेवटच्या चार ओळी तर या कवितेचा उच्चबिंदू आहेत. जे आभाळाएवढे झाले आहेत त्यांनी थोडे खाली यावे आणि सामान्यजनांच्या मिसळावे, स्वतःच्या परिस्थितीचा गर्व असू नये. जे मातीत मळले आहेत त्यांना उभारी घेण्यास थोडा आधार द्यावा. थोडा हे महत्वाचे. आयते देऊ नये पण त्यांना थोडा आधार देऊन स्वावलंबी करावे.

तुकाराम महाराजांनी भक्तीयोगात म्हंटले आहे "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा". कवी या कवितेत हाच विचार कर्मयोगात मांडतो आहे.

No comments:

Post a Comment