Wednesday, November 18, 2020

Friendship Bench----------- अश्विन गाडगे

 

Friendship Bench

"यारो दोस्ती बडी ही हसीन हैं ..ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं.. "

K K चे हे गाणे मैत्रीचे सुंदर वर्णन करते.  खरं तर मैत्री मधला सर्वात सुंदर अनुभव म्हणजे; आपण जसे आहोत तसे मित्र आपल्याला स्विकारतात. त्याच बरोबर आपले अनुभव, भावना आणि विचार मित्रांबरोबर शेअर  करतो.  मित्रा बरोबर आपल्या समस्या शेअर केल्या की आपल्याला बरे वाटते.

आता तुम्ही विचाराल यात काय नवीन ? तर याच आधारावर मला एक विलक्षण कल्पना - Grandma Friendship Benches याची माहिती द्यायची आहे.

तर जाऊया झिम्बाब्वे ला. या आफ्रिकन देशात १४ दशलक्षाहून अधिक लोक आहेत परंतु २० पेक्षा कमी मानसशास्त्रज्ञ आहेत. अनेक वर्षांच्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारी नंतर मानसिक आरोग्य हे एक मोठे आव्हान आहे आणि झिम्बाब्वेच्या चारपैकी एकाला नैराश्य (anxiety) किंवा चिंताग्रस्तपणाचा (depression) त्रास असल्याचे डॉक्टरांचा अंदाज आहे. दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढू लागली. रुग्णालयांमध्ये मोकळी जागा शोधणे अशक्य सिद्ध झाल्यावर, मानसशास्त्रज्ञ डॉ. डिक्सन चिबांडा यांनी पब्लिक पार्क बेंचला थेरपीच्या जागांमध्ये बदलण्याची कल्पना दिली.

थेरपिस्ट कमी आहेत तर नवीन थेरपिस्ट तयार करावे लागतील. या साठी मोकळा वेळ आणि भरपूर अनुभव असलेले आजी आजोबा यांची नेमणूक करण्यात आली.

स्थानिक समुदायातून अनेक आजींना सीबीटी (Cognitive Behavioural Therapy) नावाच्या टॉकिंग थेरपीमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण तर पूर्ण झाले पण हे सुरु करायला डॉक्टरांना थोडी भिती होती आणि याला कसा प्रतिसाद मिळेल या बाबत साशंक होते.

आजी म्हटली की  प्रेम आणि जिव्हाळा आला आणि त्यात झिम्बाब्वेच्या समाजात आजींचा खूप आदर केला जातो. तर अश्या प्रकारे अनेक आजींनी पार्क च्या बेंचेस वर बसून लोकांच्या समस्या ऐकण्यास सुरूवात केली.

अश्या प्रकारे 'Grandma Park Benches' खूप लोकप्रिय झाले आणि यांनी ५०,००० पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य दिले.

झिम्बाबवे ला ‘Grandma bench’  च्या रूपात त्यांना एक 'friendship bench'  मिळाला.

तुमच्या कडे आहे का असा मित्र कट्टा जिकडे तुम्ही तुमच्या मानसिक समस्या बिनधास्त पणे शेअर करू शकता ?

आणि हो, जर आपण चिंता किंवा नैराश्यासारख्या मानसिक आजारातून जात असाल तर कृपया एखाद्या मित्रा बरोबर नक्की शेअर करा.

आणि तुम्हाला जर कोणी त्यांचे प्रॉब्लेम शेअर करत असेल तर नक्की ऐकून घ्या आणि हो, काही जाणवल्यास मानसशास्त्रज्ञाकडे रेफर करा.

मानसिक आरोग्य हे आरोग्याचा एक अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. डब्ल्यूएचओच्या अनुसार : "आरोग्य ही पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणकारी अवस्था आहे आणि केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही.

मानसिक आरोग्य ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला स्वतःची क्षमता समजते, जीवनातील सामान्य ताणतणावांचा सामना करता येतो, उत्पादनक्षमपणे कार्य करू शकतो आणि ती व्यक्ती आपल्या समाजास योगदान देण्यात सक्षम होते.

मानवांनी विचार करणे, भावना व्यक्त करणे, एकमेकांशी संवाद साधणे आणि जीवन जगणे या आपल्या सामूहिक आणि वैयक्तिक क्षमतेसाठी मानसिक आरोग्य मूलभूत आहे.

तर आपल्या मित्रासाठी नेहमीच 'friendship bench ' वर available राहा....

 



No comments:

Post a Comment