Wednesday, November 18, 2020

दिवाळीतील किल्ल्याची दुनिया------------डॉ. प्रसाद प्रफुल्ल बारटके.

 

दिवाळीतील किल्ल्याची दुनिया

   

दिवाळी म्हणजे  आकाश कंदील, दारापुढे सुंदरशी रांगोळी, दिव्यांची रांग, सुगंधी तेल व सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, स्वादिष्ट असे गोडधोड फराळ, सायंकाळी लक्ष्मीची पूजा, भरपूर फटाके आणि मनमुराद अशी चिंताविरहित सुट्टी... काय मंडळी गेलं ना मन आपल्या बालपणीच्या गोड आठवणीत? हीच तर खरी गंमत आहे...

     2020मध्ये कोरोनामुळे आपण जरा जास्तच वेगाने म्हणजे तथाकथित हायपरलूपपेक्षाही जास्त गतीने या आठवणींमध्ये जातो, रमतो आणि प्रफुल्लित होऊन परत येतो. तुमच्यासारख्याच माझ्यासुद्धा अशाच  बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी  आहेत. त्यात एक विशेष आठवण म्हणजे किल्ला बनवणे.

        मंडळी माझं मूळ गाव रोहा, जिल्हा रायगड. आता रायगड म्हटलं म्हणजे आठवतात ते,  मराठी मनांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या कर्तृत्वाने कोण भारावून जाणार नाही. शाळेत असताना इतिहासाचे sir इतके समरसून महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगायचे की  लढा, किल्ला, गनिमीकावा यासारख्या शब्दांनी आमच्या  अंगातही वीरश्री संचारत असे. आणि मग दिवाळी जवळ आली की आम्ही महाराजांचे मावळे बनून हर हर महादेवची आरोळी ठोकून किल्ला बनवण्याच्या मोहिमेवर निघत असू.

       आमचे मोठे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही दहा चुलत भावंडं, आजूबाजूचे मित्र असे मिळून वीसेक जण होत असू.  सुरुवातीला कोणता किल्ला बनवायचा हे ठरवले जाई. मग जबाबदा-या दोन गटांमध्ये विभागल्या जात. त्यातल्यात्यात लहान मुलांच्या एक गटाची जबाबदारी असे, किल्ल्याला लागणारे दगड धोंडे, काळी व लाल माती जमवण्याची. तर मोठया  मुलांचा दुसरा गट, तटबंदी साठी नळीची कौले, गुहा/ लेणी बनवण्यासाठी नारळाच्या करवंट्या, किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावासाठी लागणाऱे साहित्य म्हणजे लाकडी भुसा, कारंज्यांसाठी सलाईनच्या रिकाम्या बाटल्या/नळ्या तसेच रंगकामासाठी काव, गोळा करत असे.

           सर्व साधनांची जुळवाजुळव झाल्यानंतर किल्ला बनवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होई. कुठल्या प्रकारचा किल्ला बनवायचा हे अगोदरच ठरवलेले असल्याने त्या अनुषंगाने त्यावर मंदिर, एखादी पाण्याची टाकी, गुहा, नागमोडी चढण, पायथ्याशी थोड्या पायऱ्या,  बुरूज,  तटबंदी बनवली जात असे.  संपूर्ण किल्ला बनवून झाल्यावर त्यावर थोडे धान्य म्हणजे हळीव, मोहरी, मेथी टाकण्यात येई जेणेकरून त्या उगवलेल्या धान्यातून जंगल सदृश भासावे.

        पायथ्याशी असलेल्या गावासाठी  पुठ्ठ्यापासून घराचे साचे बनवून त्याला मातीने रंगवायचे. नंतर सर्व घरांची गावानुरूप मांडणी करून खाली सगळीकडे लाकडी भुसा पसरायचा. नारळाच्या शेंडीचा ब्रश म्हणून वापर  करून कावेने रस्ते आखले जायचे. सलाईनच्या नळ्या वापरुन siphon तत्त्वानुसार कारंजी बनवली जायची. मग सगळेजण आपल्याकडे असणारे मावळे, प्राणी, तोफा, सिंहासनावर बसलेले महाराज अशा किल्ला सजावटीसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या प्रतिकृती आणत असत. सुवाच्य अक्षर असणाऱ्याकडून गडावर लावण्यासाठी स्थल-फलक लिहून घेतले जात. किल्ल्यावर छोट्या छोट्या पणत्या लावून रोषणाई केली जायची. मी व माझा भाऊ बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती तयार करायचो व किल्ला बघायला येणार्‍यांना मोठ्या कौतुकाने ती सांगायचो. आपल्या वेगवेगळया गड व दुर्गांची माहिती आणि त्यातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास लोकांपुढे मांडताना छाती गर्वाने फुलून यायची.

         मंडळी, लहानपणी दिवाळीत किल्ला बनवत असताना नकळतपणे आमच्यावरही नियोजनबद्धता, एकाग्रता,  स्वराज्यासाठी महाराजांची दूरदृष्टी,  समयसूचकता, मावळ्यांची निष्ठा, असे अनेक सुसंस्कार घडले. अत्यंत कठीण दुर्गम परिस्थितीतही वास्तूशास्त्राचा   अत्यंत उत्कृष्ट नमुना असणारे असे गड व दुर्ग बांधले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना या लेखनाच्या निमित्ताने मानाचा त्रिवार मुजरा.

आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

डॉ. प्रसाद प्रफुल्ल बारटके.

 

 

 

 

No comments:

Post a Comment