सूड
भूत, पिशाच्च, पुनःर्जन्म, आत्मा यावर आपला विश्वास आहे का?माझा तर अजिबात नाही. साहजिकच आहे ! सुवर्णपदक विजेता डॉ. अविनाश घोरपडे ,ज्याने संपूर्ण (संपूर्ण कसलं ! खर तर अपूर्णच म्हणायला हवं !!...) आयुष्य केवळ आणि केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच झोकून दिलं ,त्याचा अशा फालतू गोष्टींवर विश्वास असणं संभवतच नाही.आता अपूर्ण आयुष्य म्हणायचं प्रयोजन अशासाठी की अवघ्या ४२ व्या वर्षी मृत्यू येणं हे अकालीच म्हणायला हवे ना?अपघात वगैरे असेल तर गोष्ट वेगळी!पण स्वतःच्याच भल्यामोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि ते सुद्धा त्यातील एका सुविद्य ICU मध्ये मृत्यू येणं हा दैवदुर्विलास नाही तर दुसरं काय?
बालपणापासूनच मला डॉक्टर व्हायची प्रबळ इच्छा होती.
४-५ वर्षाचा असताना, मी शेजारच्या डॉक्टरकाकांचा जुना स्टेथोस्कोप
कानाला लावून आणि थोरल्या भावाचा पांढरा शर्ट एप्रन म्हणून घालून घरभर फिरायचो. मग
आई-बाबाना, कंटाळा येईपर्यंत इंजेक्शन्स द्यायचो. शाळेत असताना मी निबंध किंवा वक्तृत्व
स्पर्धेत नेहमीच पहिले किंवा दुसरे पारितोषिक पटकवायचो. विषय असायचा. "मला डॉक्टर का व्हायचंय?". बारावीला आणि प्रवेश परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मेरिट लिस्ट मध्ये आल्यामुळे सहजपणे विख्यात स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. वैद्यकीय शास्त्र हे आवडतं क्षेत्र असल्यामुळं खूप मन लावून रोज ७-८ तास अभ्यास करायचो. दरवर्षी विद्यापीठात पहिल्या तीन क्रमांकात असायचो.शेवटच्या वर्षी तर कॉलेजमध्ये प्रथम आणी विद्यापीठात दुसरा क्रमांक आल्यावर खूप कौतुक झालं . पण पदव्युत्तर पदवीसाठी विषय निवडताना द्विधा मनस्थिती झाली होती.सर्जन बनून खोऱ्याने पैसे ओढायचे की मेडिसिन मधे संशोधन करून समाज कल्याण करायचं ?आणि यावेळी आईबाबांचे संस्कार कामी आले .खुपच कमी विद्यार्थी प्राधान्य देत असलेला IMMUNOLOGY हा विषय निवडला.शिकता शिकता संशोधन सुद्धा चालू ठेवलं .अनेक परिसंवादांना उपस्थित राहिलो.बऱ्याच प्रगत देशाकडून मला व्याख्यान देण्यासाठी आमंत्रणे यायला लागली . अशाच एका सेमिनारमध्ये डॉ. माधवीशी ओळख झाली.गायनॉकॉलॉजिमधे ती पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत होती.किचकट वैद्यकीय विषयांवर चर्चा करता करता ,आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो ,कळलंच नाही .ती अमेरिका सोडायला तयार होईल की नाही ,ही एक आडकाठी होती.पण माधवीच स्वतः म्हणाली "आपल्या देशाची सेवा करायला मला जास्त आवडेल".मग पुण्यात थाटामाटात आमच लग्न झालं .हनिमूनला कुठं जायचा,हा थोडासा लाडिक वादाचा विषय झाला होता,पण वीणा ट्रॅव्हल्सचे स्पेशल हनिमून पॅकेज एवढे आकर्षक होते की दोघांपैकी आधी न पाहिलेल हॉंगकॉंग/चीन हे गंतव्यस्थान पक्क झालं. हॉंगकॉंग आणि चीनमधली चेंगडू ,झंजीयाजी ,यांगझी नदी - पर्यटन ही प्रणयरम्य स्थळं मधुचंद्रासाठी अगदी साजेशी होती. बीजिंगला एका संद्याकाळी माझा मित्र डॉ जियांग आणि त्याची पत्नी मेइ यांच्याबरोबर छानश्या उपहारगृहात जेवलो. एकूण सहल मजेत झाली .फक्त खटकलं ते लुच्ची या प्राचीन शहरातले खाण्याचे प्रकार पाहून. मांजरं , झुरळं ,उंदीर व इतर किडे खाताना , त्या लोकांना पाहून अंगावर शिसारी आली होती .
या नऊ दिवसांच्या, कधीच संपू नये अस वाटणाऱ्या काळात आमच्या भविष्याच्या योजना तयार झाल्या आणि त्याप्रमाणे भारतात परतल्यावर काही महिन्यातच घोरपडे हॉस्पिटल तयार झाले. एका बाजूला माधवीचे प्रशस्त प्रसूतिगृह तर दुसऱ्या बाजूला माझे कन्सल्टिंग कक्ष आणि अत्याधुनिक संशोधन केंद्र! दोघांचेही विषय तसे वेगळे असल्यामुळे आमचे व्यावसायिक जीवन आणि पर्यायाने कौटुंबिक जीवन अगदी मजेत चाललं होत. त्यात साडेतीन वर्षांनी सानिकाचा जन्म झाला, मग काय! आनंदाला पारावारच नाही राहिला. मी सरकारी रुग्णालयात इंटर्नशीप करत असताना माझ्या हाताखाली एक केरळी परिचारिका होती. मारिया नाव तीचं .मराठी उत्तम बोलायची.ती मला नेहमी मजेनं म्हणायची ,"डॉक्टर तुम्ही हॉस्पिटल उघडाल तेंव्हा मी तुमच्याकडे नोकरीला येईन बरं का!"आणि योगायोग म्हणा किंवा दुसर काहीही म्हणा, आमच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासक म्हणून ती खरोखरच रुजू पण झाली. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कदाचित तिला केरळमध्ये जवळचे कोणीच नातेवाईक नसल्यामुळे, ती आमच्या कुटुंबाचा एक घटकच झाली.वयानं ५-६ वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी असल्यानं ,कधी कधी योग्य सल्ले पण द्यायची.फावल्या वेळेत कधी माधवीच्या वॉर्डमध्ये सुद्धा जाऊन काम करीत असायची तर कधीकधी कधी घरी किंवा हॉस्पिटलमध्ये सानिकाचा खूप लाडानं सांभाळ करायची .मारीया ला मी करित असलेल्या संशोधनाची सुद्धा पूर्ण माहिती असायची.काहीच दिवसात पुण्यामधल्या नामांकीत हॉस्पिटलसमधे घोरपडे हॉस्पिटलची गणना होऊ लागली.असे सगळे सुखा-समाधानात दिवस जात असतानाच एके दिवशी दूरदर्शनवर वाईट बातमी प्रसारित झाली .चीनमध्ये एक व्यक्ती एका अज्ञात विषाणू मुळे दगावल्याची आणी बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याची ! माझ्या अभ्यासाच क्षेत्र 'विषाणू' हेच असल्यामुळे आणी या बातमीच गांभीर्य लक्षात आल्यामुळं, मी माझा मित्र डॉ जियांग याच्याशी ४-५ दिवसांनी संपर्क साधला. त्याच्या बोलण्यावरून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाटायला लागली होती. त्याने संपूर्ण देशाला धोक्याची सूचना दिली होती आणि स्वतः नमुने तपासण्यात रात्रंदिवस मग्न झाला होता.दोनच दिवसात चीन सरकारने डॉ जियांगला कडक सूचना दिली, त्याचे संशोधन जप्त केले आणि त्याच्याकडून दबावाने लिहून घेतले कि ' ही कोरोना विषाणूची बाब, चिंताजनक नसून जनतेने काळजी करण्याचे कारण नाही '. पण माझ्याशी फोनवर बोलताना प्रत्येकवेळी तो खूपच गंभीर होता असे माझ्या लक्षात येत होते. चीनमध्ये तोपर्यंत हाहा:कार उडाला होता. मी माझे संशोधन चालूच ठेवले होते. मला फक्त कोरोना विषाणूचा भारतामध्ये शिरकाव नको होता.पण नियतीच्या मनात वेगळेच होते .थोड्याच दिवसात फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर कोरोनान थैमान घातलं होतं आणि एके दिवशी डॉ. जियांगचा याच विषाणूमुळे मृत्यू झाल्याचं समजल. मला अतिशय दुःख झालं आणि मी कमालीचा अस्वस्थ झालो.ज्या डॉक्टरने ,वारंवार सूचना देऊन ज्या विषाणूबाबत लोकांना सावध केलं होत ,त्याच डॉक्टरला ,त्याच विषाणूनं पछाडावं यापेक्षा दुसरे दुर्दैव तरी काय?
दिवसेंदिवस प्रत्येक शहरात विषाणूला बळी पडण्याची शक्यता वाढत चालली होती. पुण्यातही मृत्यू पावलेल्यांची संख्या १६० च्या वर पोचली होती.रुग्णवाहिका,रुग्णालयं तोकडी पडत होती. मी माधवी आणि मारियाशी याविषयी चर्चा केली आणि आमच पूर्ण हॉस्पिटल फक्त कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला.काही डॉक्टर्स ,परिचारिका आणि कर्मचारी या निर्णयामुळे धास्तावुन गेले आणि जिवाच्या भीतीपोटी नोकरी सोडून गेले.पण मी,माधवी डगमगलो नाही.खूप खर्च करून कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे मागवली आणि रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन,अमेरिकेहून महागड्या दराने व्हेंटीलेटर्स मागवले.मी,माधवी आणि मारिया जीवाचं रान करून, रुग्ण हाताळण्यात तहान,भूक,झोप सर्व काही विसरून गेलो होतो.सानिकाकडे पण दुर्लक्ष होत होतं . ती बिच्चारी गोंधळून गेली होती.आठ वर्षाची चिमुरडी पोर!तिला काय उमजणार हा विषय??
सुरुवातीला आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील काही रुग्ण दगावले .मला,माधवीला त्याचे खूप दुःख व्हायचे .काही दगावलेल्या रुग्णांचे मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक टाळाटाळ करायचे .३-४ वेळा फोन केल्याशिवाय यायचे नाहीत . त्या गोष्टीने तर मला फारच यातना व्हायच्या.
मी रुग्णांचे रक्त,थुंकी,स्वाब,प्लाझ्मा यांच्या नमुन्यांची तपासणी करता करता, संशोधन सुद्धा करत होतो . माझे काही मित्र होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधामध्ये संशोधन करत होते. त्यांना आणि काही औषध कंपन्यांच्या प्रमुखानं सोबत घेऊन मी अनेक फॉर्मुले बनविले आणि त्याच्या चाचण्या रुग्णांवर चालू केल्या. माझी बुद्धिमत्ता पूर्णपणे पणाला लावली .आणि एके दिवशी माझा एक डोस यशस्वी ठरतोय असे लक्षात आले . बरेचसे रुग्ण या औषधाने १४ दिवसाच्या ऐवजी ९ दिवसातच बरे होऊ लागले. आणखी त्यावर प्रयोग करून, सुधारित नवीन डोसचा वापर करून ,मी केवळ ६ दिवसांतच रुग्णांना ठणठणीत बरा करून घरी पाठवायला लागलो.संपूर्ण पुणे शहरात आणि मग महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.आरोग्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून माझ अभिनंदन केलं आणि मी शिफारस केलेल्या औषधांचं युद्धपातळीवर उत्पादन करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली .आता फक्त भारतभर नाही तर जगभर ही बातमी पसरली आणि माझ्यावर इ-मेल्स,व्हाट्स-एप
आणी ट्विटर मेसेजेसचा भडीमार चालू झाला. एकीकडे माझं संशोधन चालूच होतं . संपूर्ण देशाला या विषाणूपासून मुक्त करायच असेल तर असा डोस आवश्यक होता, कि रुग्ण ४ दिवसात बरे व्हायला हवे. मी शेकडो नमुने तपासायचो,वेगवेगळे प्रयोग करायचो आणि प्रयोगशाळेत १०-१२ तास काम करत राहायचो. अगदी दमून जायचो मग कधी कधी खुर्चीतच झोपून जायचो ..........
आणि हे सगळं करत असताना माझ्या शरीराला कोरोना विषाणूने कधी ग्रस्त केलं ते लक्षातच आलं नाही .तरी मारिया मला नेहमी म्हणायची,डॉक्टर तुम्ही स्वतःची काळजी नीट घेत नाही आहात .तुमचा सर्दी - खोकला वाढत चाललाय .मी दुर्लक्ष केलं .आणि एके दिवशी दुपारी काही रिपोर्ट्स वाचत असतानाच चक्कर आली आणि खुर्चीवरून खाली पडलो.माधवीनं आणि मारीयानं लगेच आमच्याच हॉस्पिटलच्या ICU मधे मला नेलं आणि उपचार चालू केले. दोन दिवस श्वास घेताना त्रास होत होता . ऑक्सिजनचं प्रमाण ९० पेक्षा कमी झालं होत आणी दुर्दैवानं माझ्या औषधांचा, माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. माझी प्रकृती खालावत गेली मारियाने शेवटी व्हेंटिलेटर लावला. पण खूप उशीर झाला होता.माधवी सकाळपासूनच माझ्याजवळ बसून राहिली होती आणि सानिका दरवाजाच्या बाहेर स्टुलावर उभे राहून मला काचेतून बघत होती .मी तिला थरथरत्या हातानं 'बाय' केलं आणि प्राण सोडला . माधवीने रडून टाहो फोडला.मारिया तिला आधार देत होती पण तिचा सुद्धा मनावर ताबा राहत नव्हता.सानिकाच्या बालमनाला याचा काहीच बोध होत नव्हता. माझ्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली .मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे माधवीला सांत्वनाचे संदेश आले .पण भेटायला जवळच्या नातेवाईंकांपैकी सुद्धा फारसे कोणी आले नाही . ओळखीच्या लोकांनी दुःख व्यक्त केल पण माधवीच्या मदतीला , माझे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पुढे यायला धजत नव्हत. शेवटी मारिया आणि हॉस्पिटलचे जुने दोन कर्मचारी यांच्या मदतीनं मला प्लास्टिक मध्ये गुंडाळून स्मशानात नेलं .तिकडचे कामगार पण माधवीने ५०००रुपये टेकवल्यावरच लाकडं वगैरे रचवायला तयार झाले.पण सगळे लांबूनच! माझा आत्मा ही केविलवाणी दृश्ये केवळ हतबल होऊन पाहत होता. ज्या जगाला मी माझे प्राण पणाला लावून, वाचवायचा प्रयत्न करत होतो तेच जग, आता माझे काय हाल करत आहे?कुणी भटजी पण आला नाही मंत्र म्हणायला! माझं दहावं ,बारावं ,तेरावं ही कार्य होऊच शकली नाहीत .माझ्या आत्म्याला शांती मिळण्याच्या ऐवजी खूप मनस्तापच झाला आणि सूडाच्या भावनेनं तो पेटून उठला. आमची सगळी स्वप्ने धुळीला मिळाली होती .आता माधवीचं पुढे काय होईल? अशा तरुण वयात तिला असे का भोग भोगावे लागताहेत? सानिकाच्या शिक्षणाचं काय ? तिला तर माझ्या आणि माधवीपेक्षाही मोठी डॉक्टरीण व्हायचं होतं . माझा आत्मा पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत राहिला ....... मग निर्णय झाला!
... सूड!! आणि फक्त सूड !! माझ्या सुखी आणि समाधानान भरलेल्या आयुष्याची अशी राखरांगोळी व्हायला कोणी जबाबदार असो व नसो .... मी आता स्वस्थ नाही बसणार! ज्या कोरोनावर मी मात केली त्या कोरोनाचाच वापर करून मी सूड घेणार आणि सर्वांचा विनाश करणार! माझा आत्मा सूडबुद्धीनं प्रथम मोठ्या हॉस्पिटलमध्ये घुसून औषधांच्या मिश्रणाची अदलाबदल करू लागला. काही दिवसातच बरे झालेले रुग्ण आजारी पडून गंभीर अवस्थेत गेले. गंभीर रुग्ण तर काही तासातच माझ्या कृतीला बळी पडून तडफडून मृत्यू पावले. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या आणि मग तिसऱ्या अस करत माझा आत्मा हा प्रयोग अंमलात आणू लागला. मृतांची संख्या वाढत चालली.मग एक शहर सोडून दुसऱ्या शहरात घुसलो. एका राज्यातून दुसऱ्या राज्याचा बळकाव केला . मृतांचे आकडे वाढतच होते .दर दिवशी माझी ही किमया देशामधे किमान १०० जणांचा बळी घेत होती . सर्व डॉक्टर्स,संशोधक हतबल झाले आणि माझा आत्मा खदखदून विकृतपणे हसत होता.
एके दिवशी एका रुग्णालयात हे कारस्थान चालू असतानाच मागून एक हाक ऐकायला आली "डॉक्टर ,डॉक्टर अविनाश कसे आहात ?" पाहतो तर मारिया !
"अरे मारिया, तू ? इथे कशी काय??" ती म्हणाली"डॉक्टर तुम्ही गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आणि ६ व्या दिवशी माझा मृत्यू झाला.माझाही अंत्यसंस्कार शास्त्रानुसार न झाल्यामुळे, माझा आत्मा अशांत राहिला आणि तुमच्या शोधात फिरत राहिला. आता तुमची भेट घडली." हे ऐकून माझ्या आत्म्याला खूप बरं वाटलं . संपूर्ण मनुष्यजातीची नायनाट करण्याची माझी योजना मी तिला सांगितली आणि माझ्या ' मिशन ' मधे सहभागी होण्याच आव्हान केलं . काही वेळ मारीयाचा आत्मा निःशब्द राहिला आणि मग बोलू लागला "डॉक्टर, आपण जिवंत असताना करीत असलेल्या समाजकल्याणासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी राहिले, पण आता तुमचा आत्मा सूडाच्या भावनेनं विनाकारण पेटलेला आहे . मृत्यू हा अटळ असतो, हे मी आपल्याला नव्याने सांगायला नको.ज्या हातांनी आणि बुद्धीचा कस लावून तुम्ही शेकड्यानी प्राण वाचवले ,तेच प्राण आता क्रूर मार्ग अवलंबून, निष्ठुरपणे तुम्ही घेत आहात . डॉक्टर ,आठवा ती शपथ !जी पदवी प्राप्त करताना आपण घेतली होती ..... "माणुसकीच्या नावाखाली ,माझ्या क्षमता ,नम्रता,करुणा आणि आजारी लोकांच्या हिताचे समर्पण करून मी ,माझ्या औषधांबाबतच्या ज्ञानाचा वापर करून त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करेन." डॉक्टर ,तुमचा आत्मा आता या शपथेचा अपमान करून निष्पाप, आजारी माणसांचा बळी घेउन, स्वतःशीच प्रतारणा करतोय. थांबवा हे सगळं डॉक्टर, थांबवा!" मारिया माझ्या खांद्याला गदागदा हलवत राहिली ... डॉक्टर !
, डॉक्टर!! असं पुन्हा पुन्हा म्हणू लागली!
.... आणि मी दचकून जागा झालो ..मारीयाचा आवाज स्पष्टपणे कानावर आदळत होता ....
"अहो डॉक्टर, उठा ! पंतप्रधानांच्या कार्यालयातून फोन आला होता. पीएम ना तुमच्याशी बोलायचं आहे !".अरे ! म्हणजे मी जिवंत आहे?? आणि हे सर्व स्वप्न होतं ??? कदाचित प्रयोगशाळेत रिपोर्ट वाचता वाचता कधी डोळा लागला समजलच नसाव !
..दहा मिनिटांतच पुन्हा फोन वाजला . पीएमच्या सेक्रेटरीने पंतप्रधानांशी संपर्क साधला.पंतप्रधानांनी मी करीत असलेल्या संशोधनाचे कौतुक केलं आणि WHO न माझी खास सल्लागार म्हणून नेमणूक केल्याचेही सांगून अभिनंदन केले . मी फोन खाली ठेवला काही वेळ माझ्यातच हरवलो.कधी एकदा ही बातमी माधवीला प्रत्यक्ष घरी जाऊन सांगू असं झालं . आता थोड्याच वेळात ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरणार आणि फोनवर फोन येत राहणार म्हणून मारियाला अभिनंदन करून मी म्हणालो,
" मारीया ,मी जरा घरी जाऊन माधवी आणि सानिकाला भेटून येतो,तू तोपर्यंत सगळे कॉल्स अटेंड कर. मी माझा मोबाइल पण बंद ठेवतोय काही वेळ!"
निघता निघता फोन घणघणत होता ...मी त्याच्याकडे लक्ष न देता तडक गाडीकडे निघालो.गाडी चालू केली आणि स्टीअरींगवर हात फिरवता फिरवता त्या स्वप्नाचा विचार करू लागलो ...मग पाल झटकावी तसा तो विचार झटकून ,स्वतःशीच ठरवलं ... " आज पूर्ण दिवस सानिकासाठी!"
लेखक : आनंद नेवगी , अबू धाबी .--
No comments:
Post a Comment