Wednesday, November 18, 2020

नव प्रभात नव दिशा------रुपाली मावजो किर्तनी

 

नव प्रभात नव दिशा

 

यंदाची ही दिवाळी 

सर्वार्थाने वेगळी असेल

उत्साह, तरी जबाबदारीने 

उचललेलं पाउल दिसेल

 

कुणी कुणाकडे जाणार नाही 

दिवाळी साजरी नक्की करतील

अंधारातून बाहेर पडायला

मदतीचा हातही देतील

 

कंदील लावतील, दिवे पेटतील

चकली लाडू चिवडा करतील

सणाच्या तयारीत सर्व जण

(थोड्या वेळा साठी का होईना)

चिंता काळजी विसरून जातील

 

पुन्हा घेऊन आली दिवाळी

 मानवतेचा नव संदेश

काळोखातनं वाट काढायला

पसरा प्रकाश देश विदेश

 

लक्ष्मीच्या पावलांनी घर सारं

सुख समृद्धी ने भरूच दे

हीच पावलं धडपडणाऱ्या

झोपडी कडेही वळू दे

 

रांगोळीच्या अनेक रंगात

दीप सुखाचे पेटुदे

निराश मनांत  रंग भरूनी

दीप आशेचे उजळू दे

 

कंदिलाच्या लख्ख उजेडात

मिटून जाऊ दे ही निशा

पसरलेला प्रकाश दाखवो

नव प्रभात नव दिशा

 

-रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment