Friday, May 25, 2018

दुर्ग भ्रमंती – इरशाळगड




परदेशात राहणाऱ्या प्रत्येक मराठी मनाला आपल्या मराठी मातीची  ओढ नेहमीच असते. तशीच माझ्या मनालाही कायम आहे ती दुर्ग भ्रमंतीच्या स्वरूपात. आणि मग विचारचक्र सुरु होते की आपल्याला मिळालेल्या या स्वर्गीय आनंदाची चव आपल्या पुढच्या पीढीला देखील चाखायला दिलीच पाहिजे.

२०१६ ची अबू धाबी मधील उन्हाळी सुट्टी, म्हणजे महाराष्ट्रातील वर्षा ऋतू. तेव्हा ठरवलेच, की यावेळी मुलीलासुद्धा " ट्रेक" ला घेउन जायचे. गिर्यारोहण हा साहसखेळ एकट्याने करायचा नसून हा सांघिक प्रकार आहे याची पूर्ण जाणीव असल्याने आम्ही ठरवले की कुठल्यातरी प्रोफेशनल ग्रूप सोबत जाणे योग्य. इंटरनेटवर विविध संकेतस्थळावर शोध घेतल्यानंतर आम्ही "स्मॉल स्टेप एडवेंचर" या संस्थेला संपर्क करून आमचे बूकींग "इरशाळगड " साठी पक्के केले.
पुढच्याच आठवडयात पनवेल स्टेशनवर भेटायचे ठरले. ठरलेल्या ठिकाणी आणि वेळेत सर्वजण हजर होते. संस्थेचे सदस्य एकमेकांशी संपूर्ण अनोळखी अशा ग्रूप चे नेतृत्व करणार होते. त्यांनी पनवेल स्टेशनपासून गाडी/ टमटम ची सोय केली होती. आम्ही सर्वजण "नानीवली" नामक छोट्या गावात पोहोचलो. तेथे चहा नाश्त्यासोबत सर्वांची एकमेकांशी ओळख झाल्यावर मग पुढील वाटचालीला सुरुवात झाली.

संस्थेच्या सदस्यांनी देखील नवीन ठिकाणासोबत एकरूप होण्यासाठी त्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. नानीवली हे छोटेखानी गाव चौक नावाच्या पंचायत क्षेत्रात येते. चौक म्हणजे स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ. इरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण इरशाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठेही उल्लेख नाही. गडावरील पाण्याच्या टाक्याचे अस्तित्व पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते.

नानीवली पासून सुरू झालेली सपाट वाट थोड्याच वेळात चढणीच्या वाटेमध्ये बदलली. मागे वळून पहिले तेव्हा मोरबे धरणाच्या "बॅक वॉटरचे" विहंगम दृश्य नजरेस पडले.
 
पुढची वाट पुन्हा सपाट शेतमळ्यामधून जाऊ लगली. आता इर्शाळगडाचे सुळके आणि विशेष म्हणजे " नेढं  देखील दिसू लागले. नेढं म्हणजे खडकाला पडलेले नैसर्गिक भोक. लवकरच आम्ही सगळे मावळे इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी नावाच्या गावात पोहोचलो. गावाच्या थोडे बाहेर विशाळादेवीचे मंदिर आहे. विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव इरशाळगड पडले असावे असा समज आहे.

इरशाळवाडीपासून पुढे गडापर्यंत बऱ्यापैकी चढणीची वाट आहे. काही ठिकाणी कातळावरून आधार घेत, एखाद्या खाचेत हाताची बोटे अथवा पाय फसवून वर चढायचे आहे. एके ठिकाणी तर चक्क शिडी देखील लावली आहे. संस्थेच्या सदस्यांनी आम्हाला आणि विशेषतः माझ्या मुलीला कातळारोहणचे मूलभूत तंत्र शिकविले. त्याचा आम्हा सर्वानाच चांगला उपयोग झाला.

बिकट चढणाची वाट कापत असतना पाठीवरील पाण्याचे वजन लवकर कमी होउ लागले. साधारण तासाभराच्या चढाई नंतर सर्वजण गडावर पोहोचलो. गड सर केल्यावर मिळणारे स्वर्गीय सुख म्हणजे नक्की काय हे माझ्या मुलीने पुरेपूर अनुभवले. गडावरील नेढ्यामध्ये मग आपापले "प्रोफाइल अपडेट" करण्यासाठी एक "फोटोसेशन" पार पडले. ट्रेकिंग दरम्यान अशा प्रकारे छायाचित्र घेताना अर्थातच सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागते. संस्थेच्या सदस्यांचे आणि ग्रूप मधील जाणकार लोकांचे याकडे काटेकोरपणे लक्ष होते.

गडमाथ्यावरुन समोर कर्नाळा, प्रबळगड, मलंगगड, माथेरान अशी विविध शिखरे नजरेस पडतात.
नेढ्यापासून थोडे पुढे एक पाण्याचे टाके आहे. आणि मग इथून पुढे संपूर्ण सुळका आहे. तो चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे गरजेचे आहे. आमच्यापैकी कुणीच इतके पारंगत नसल्याने आम्ही सुळका चढणे टाळले.  नेढ्यापासून थोडे खाली उतरुन मोकळ्या अशा जागेत सर्वानी आपापले डबे उघडले. संस्थेने सर्वांसाठी पुरी भाजीची सोय केली होती. गडभोजन झाल्यावर आणि आजूबाजूचा परिसर स्वछ केल्यावर पुन्हा एकदा ग्रूप फोटो झाले. आणि मग गड उतरायला सुरुवात केली ती समोरचा सह्याद्री पुन्हा एकदा डोळ्यात साठवूनच.

चढाई साठी लागणारा वेळ: अंदाजे तास.

श्रेणी: सोपी ते मध्यम (प्रोफेशनल ग्रूप सोबत असल्यास लहान मुलेदेखील चढू शकतात.)



सोबत काही छायाचित्र जोडलेली आहेत.










सारंग आपटे





No comments:

Post a Comment