Friday, May 25, 2018

हडप्पा

हडप्पा : रक्तधारेचा शाप
प्रकाशक : व्ही बी परफॉर्मन्स एल एल पी

पाने : ३१६
प्रकाशक : सन  २०१७
भाषा : इंग्रजी

ख्रिस्तपूर्व  १७०० सालचे हडप्पा- वैवस्वन पुजरी, अर्धा माणूस अर्धा देवता, हडप्पाचा प्रतिशोध घ्यायचा निश्चय करतो. सरस्वती, जीवनदायिनी रक्तधारा बनते. २०१७ साली विद्युत शास्त्री, उद्योजक, वेगवेगळ्या लढाऊ पद्धतीमध्ये माहीर असा राजबिंडा तरुण- त्याला बनारसच्या देव-राक्षस मठातून फोन येतो. त्याला त्याच्या पणजोबांना भेटायला गेलेच पाहिजे. न्यू वर्ल्ड ऑर्डर आर्यपुत्राला मारायला उठली आहे.

न्यू वर्ल्ड ऑर्डर काय प्रकार आहे ? रोमी कोण आहे ? विद्युतला बनारसहून  का बोलावणं  आलं आहे ? कसलं युद्ध येणार आहेरक्तधारेचा शाप काय आहे ? हडप्पाच्या कुठल्या गुपितांचं  रक्षण केलं जातंय ? कोण आहे विद्युत शास्त्री ?

वैवस्वन पुजरी, त्याची पत्नी संजना, मुलगा मनु , जिवलग मित्र आणि मेहुणा चंद्रधर   यांची ख्रिस्तपूर्व १७०० सालाची गोष्ट व विद्युत, त्याची भावी पत्नी दामिनी, जीवश्च , कंठश्च मित्र बाला, बाल मैत्रीण नैना, पणजोबा द्वारका शास्त्री  आणि देव-राक्षस माठातील लढवैये साधू यांची आजच्या काळातील गोष्ट आपल्याला आळीपाळीने सांगितली आहे.

ही लढाई आहे सुष्ट आणि द्रुष्टांमधील, प्रकाश आणि अंधारातील, बनारसच्या देव-राक्षस मठ आणि रोमच्या न्यू वर्ल्ड ऑर्डर मधील.

हडप्पा वासियांना  घोडे माहिती नव्हते आणि घोडेस्वारी करणाऱ्या निळ्या डोळ्यांच्या, गोऱ्या कातडीच्या आर्य लोकांनी त्यांचा पराभव करून त्यांचा नामशेष केले या पाश्चिमात्य सिध्दान्ताला हे पुस्तक छेद देते. लेखकाचे असे म्हणणे आहे की हा सिद्धांत हा ब्रिटिशांच्या प्रचारतंत्राचा भाग होता. भारतीयांच्या मनावर ते कनिष्ठ  वंशाचे आहेत आणि त्यांच्यावर राज्य करण्यासाठी वरिष्ठ वंशाची गरज आहे हे बिंबवण्याच्या मानसिक युद्धाचा हा एक भाग होता. त्यामुळे हडप्पाच्या अवषेशांच्या शोधा  आधी सापडलेल्या ब्राम्हणाबाद  या शहराचा ब्रिटिशांनी विध्वंस  केला आणि त्या शहरातील विटा लाहोर कराची रेल्वे बांधणी साठी वापरण्यात आल्या. पुरावे नष्ट केले गेले. लेखकाचे असे म्हणणे आहे कि हडप्पावासीच खरे आर्य आहेत.

पुस्तकातील एका भागात पुरोहितजी दामिनीला सनातन धर्मात अर्थात हिंदू धर्मात स्त्री पुरुष समानता कशी आहे किंबहुना स्त्री ही पुरुषापेक्षा कशी श्रेष्ठ समजली गेली आहे हे समजावून सांगतात. हा भाग खूप चित्तवेधक आहे.
लेखकाने कथा छान  सांगितली आहे. कथा पकड घेते आणि पकड टिकवून ठेवते. कथा लिहीताना लेखकाने केलेलं संशोधन दिसून येते. पात्ररचना योग्य आहे. प्राचीन गूढवाद  या पुस्तकात सर्वव्यापी आहे. वाचकांचे कुतुहूल प्रदीप्त होते. परंतु देवता वैवस्वनच्या शक्ती थोड्या अतिशयोक्त वाटतात.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वीज व वादळाच्या  पार्थ्वभूमीवर प्राचीन भग्न अवशेष दिसतात आणि वाहत्या नदीच्या मागे उगवता किंवा मावळता सूर्य दिसतो. या आकर्षक मुखपृष्ठामुळे पुस्तकाच्या दुकानात लक्ष वेधले जाते. हे पुस्तक क्रॉसरोड मध्ये प्रामुख्याने प्रदर्शीत केले होते.

मी जेंव्हा पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पोहचलो तेंव्हा मला समजले की कथा इथे संपत नाही. हा भाग १ होता आणि भाग २ प्रलय अजून प्रदर्शित व्हायचा आहे. ही गोष्ट लेखक वाचकांना सांगत नाही. ना मुखपृष्ठावर, ना ब्लर्ब मध्ये, ना परिचयामध्ये . मला असे वाटते की एखादी मालिका वाचायची की नाही हा सर्वतोपरी वाचकाचा निर्णय असला पाहिजे आणि संभाव्य वाचकांना हे पुस्तक मालिकेतील पहिले पुस्तक आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याची जबाबदारी लेखकाची आणि प्रकाशकांची आहे. असं न करणं  ही एक प्रकारची फसवणूक आहे. असं करून त्यांना काय मिळतं ? चांगल्या कामाचा विचका होतो.

ही एक गोष्ट सोडली तर पुस्तक उत्तम आहे. 

मी हे पुस्तक का वाचले ?                   हडप्पा बद्दलचे कुतुहल
काय आवडले नाही ?                         हा भाग १ आहे हे सांगितले नाही.
काय आवडले ?                                 नाट्य व कथाकथन
शिफारस                                         छान पुस्तक - जरूर वाचा.







maMdar AapTo



No comments:

Post a Comment