Saturday, August 22, 2020

परंपरा गणेशोत्सवाची.....:- श्री. प्रशांत कुलकर्णी

 

परंपरा गणेशोत्सवाची


परदेशात दोन मराठी माणसे एकत्र आली की ते पहिल्यांदा एक संस्था काढतात. त्याला महाराष्ट्र मंडळ आणि त्या गावाचे नाव देऊन आपले कार्य चालू करतात. बाकीचे कार्यक्रम होवो न होवोत पण गणेशोत्सव मात्र नक्की साजरा करतात. अबुधाबी मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यालाही आता 45 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

सत्तरच्या दशकात मराठी माणसाने पोटापाण्यासाठी देशांतर करायला सुरुवात केली. उच्च शिक्षण आणि चरितार्थासाठी काही जणांनी आधीच अमेरिका, इंग्लंडची वाट धरली होती. तर केवळ नौकरी साठी आखाती देशानी आपली दारे उघडली होती. केरळ सारख्या राज्यातील लोकांनी भारतातल्या आपल्या नोकऱ्या सोडून इकडे यायला सुरुवात केली. सुट्टीवर आल्यावर त्यांच्या तिथल्या सुरस कथा ऐकून हळूहळू मराठी माणसाचे कुतूहल जागे होत इकडे येण्याची मानसिक तयारी होत होती.

अशा वेळी अबुधाबी मध्ये अबुधाबी विमानतळ बांधण्याचे काम लार्सन अँड ट्युबरोला मिळाले. भारतात L & T त काम करणाऱ्या मराठी माणसांना डेप्युटशन वर अबुधाबीला यायची संधी मिळाली.

इथेच त्यांना नौकरी निमित्त आलेली चार मराठी माणसे भेटली. नौकरी नंतर च्या वेळात भेटीगाठी होऊ लागल्या आणि अनौपचारिक दृष्ट्या मंडळाची स्थापना झाली. मग गणेशोत्सव साजरा करण्याची करण्याची कल्पना काहींच्या डोक्यात आली.

पण सर्वात मोठा प्रश्न होता तो गणेशाची मूर्ती कशी आणायची हा. एअर इंडिया तील अधिकाऱ्यानी भारतातून  मूर्ती आणून द्यायला मदत केली. एअर इंडिया ची ही साथ पुढची 20-25 वर्षे  दुबईत मंदिरा जवळच्या दुकानात गणपती च्या मूर्ती मिळेपर्यंत कायम होती. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मूर्ती चा प्रश्न यायचा आणि त्यावेळी जुलै ऑगस्ट मध्ये भारतात सुट्टी वर गेलेल्या फॅमिलीवर ही जबाबदारी दिली जायची. फॅमिलीवर यासाठी, की फॅमिली बरोबर असली तर अबुधाबी एअरपोर्ट वर सामानाची जास्त तपासणी व्हायची नाही. मुंबईहून एका आंब्याच्या वा तत्सम पेटीत थर्माकोल चे तुकडे वा कुरमुरे मूर्तीच्या आसपास भरून ती मूर्ती सुरक्षित पणे पॅक करायची आणि इथे एअरपोर्ट वरून बाहेर काढायची ही मोठी कसरतच होती. मुंबईहून ती मूर्ती लगेज मध्ये न टाकता 'हॅण्डबॅगेज' म्हणून जवळ ठेवायला परवानगी मिळायची पण अबुधाबी त स्क्रिनिंग च्या वेळी टेन्शन यायचे. अशावेळी एअर इंडिया चे कर्मचारी मदतीला धावायचे आणि मूर्ती घेऊन येणाऱ्या कुटुंबाला विमानतळावरील ओळखीतून सही सलामत बाहेर काढायचे. विमानतळा बाहेर मूर्ती येईपर्यंत चिंतेत उभे असलेल्या कार्यकर्त्याच्या जीवात जीव नसायचा. एकदा का ती मूर्तीची पेटी हातात आली की जीव भांड्यात पडायचा. मूर्ती सुखरूप बाहेर आली की एअर इंडियाच्या माणसाबरोबर नेत्र पल्लवी चे इशारे व्हायचे आणि डोळ्यातले थॅंक्यु चे भाव सर्व काही सांगून जायचे.

मूर्ती चे आगमन झाल्यावर दुसरा प्रश्न स्थापना कुठे करायची हा असायचा. सुरवातीच्या कालखंडात इंडिया सोशल सेन्टर मध्ये स्थापना होत होती, पण एकेवर्षी भारतात सांप्रदायिक दंगली झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून ISC ने गणपती स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर बाप्पाला ISC मध्ये पुनरागमनासाठी तब्बल तीन दशके वाट पाहावी लागली. पण त्यावर्षी ISC ने अगदी शेवटच्या क्षणी नकार  दिल्यावर सर्वांची धावपळ झाली आणि एका कार्यकर्त्याच्या घरीच गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर 2010 पर्यंत गणपती बाप्पा अनेकांच्या घरी असे विराजमान झाले. त्यावेळेस गणपती स्थापनेसाठी जागेची फक्त एकच अट असायची ती म्हणजे ज्याच्याघरी स्थापना करायची तो जास्तीत जास्त पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर राहणारा असावा. ही अट अशासाठी की दर्शनाला येणारा भक्तगण हा सहजपणे जिन्यातून ये जा करू शकेल. जेणेकरून त्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होऊन त्यांनी पुढे तक्रार करू नये. दर्शनासाठी येणारे भक्तगण हे नुसते मराठी समुदायापुरते मर्यादित नव्हते तर गुजराती, सिंधी, तामिळ, कानडी असे सर्व प्रकारचे गणेशावर श्रद्धा, भक्ती असलेले लोक असायचे. फारशी पब्लिसिटी न करताही त्यांना यावेळेस गणपती कुठे आहेत याचा पत्ता लागायचा आणि संध्याकाळी गर्दी व्हायची.

दरवर्षी गणपतीची जागा बदलत राहायची. त्यानंतर लागोपाठ चार पाच वर्षे मनोज धुत यांच्या टुरिस्ट क्लब मधील घरात गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर बी आर शेट्टींनी आपल्या फूडलॅन्ड रेस्टॉरंट च्या दुसऱ्या मजल्यावरील जागा कैक वर्ष मंडळाला दिली. यासर्व ठिकाणी संध्याकाळची गर्दी आटोक्यात ठेवण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत असे निभावले आहे की आजही बाहेरची माणसे मंडळाच्या crowd मॅनेजमेंट चे कौतुक करतात.

सुरवातीच्या काळात मंडळात पूजा सांगायला भटजी चा शोध घ्यावा लागे. अशावेळी काही हिंदी भाषिक भटजी देखील पूजा सांगायला चालायचे. पण नव्वद च्या दशकात गुरुदत्त जोशी नावाचे शास्त्रशुद्ध पूजा सांगणारे भटजी मंडळाला लाभले आणि पुढील दहा वर्षे निर्विघ्नपणे गणपतीची पूजा पार पडली. पुढे 'आडीया' मध्ये नौकरी करणारे जोशी नव्याकोऱ्या मर्सिडीज मधून पूजा सांगायला दुबई अबुधाबी ला जाऊ लागले आणि आमची कॉलर ताठ झाली. त्यानंतर आजतागायत धनंजय मोकाशी आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी ही जबाबदारी यथोचित पार पाडली आहे.

एकेवर्षी गणपतीची मूर्ती भारतातून आणणे शक्य झाले नाही तेव्हा मंडळाच्या गायडोळे नी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या फिलिपीनो कलीग कडून गणपती चा फोटो दाखवून हुबेहूब तशीच मूर्ती करवून घेऊन मोठा प्रश्न सोडवला होता. (काही शंकेखोरांना मूर्तीची सोंड फिलिपीनो नाकाप्रमाणे थोडी चपटी वाटली होती हा भाग वेगळा!)

2010 नंतर  बी आर शेट्टींच्या साह्याने बाप्पाची स्थापना परत ISC च्या मोठया सभागृहात व्हायला सुरुवात झाली जी प्रथा आजतागायत सुरू आहे.

       अबुधाबी मंडळाच्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना त्याच्या सजावटीचा, मखराचा उल्लेख झाला नाही तर ते वर्णन अधुरे राहील. नव्वदच्या दशकात गजाभाऊ वऱ्हाडकर नावाचा अतुलनीय कलाकार मंडळाला लाभला आणि दरवर्षी गणपती बरोबरच गणपतीचा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. गजाभाऊ च्या अफाट कल्पनाशक्तीतून मुंबई-पुण्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे लोकांच्या डोळ्यांची पारणं फेडू लागले. गणपती जवळ आला की 2-3महिने आधी गजाभाऊच्या घरी त्यांना मदतीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होई. गजाभाऊच्या मार्मिक टिपण्या ऐकत, त्यांच्या देखरेखीखाली कामाला सुरुवात होत असे. गजाभाऊ चा मोठेपणा असा, की एवढया वर्षात डेकोरेशनच्या खर्चाव्यतिरक्त एकही पैसा न घेता तीन महिने आपले घर त्यांनी या कार्यासाठी दिलेले असायचे. वर्षानुवर्षे त्यांनी निस्वार्थीपणाने आपली सेवा गणपतीच्या चरणी वाहिली. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून मंडळाने त्यांना सन्माननीय सभासदत्व बहाल केले होते. गजाभाऊ नंतर अनिल आणि अनुजा सावंत यांनी असेच दिमाखदार देखावे उभारून मंडळाची परंपरा जपली आणि मंडळाची शान वाढवली.

      दीड दिवसाच्या गणपती नंतर वेध लागायचे ते गणपती विसर्जनाचे. अधिकृत रित्या वा परवानगीने काही होत नसल्याने विसर्जनही तसे सांभाळूनच करावे लागे. अशावेळी मंडळातले वरिष्ठ आपले कॉन्टॅक्टस वापरून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत सहाय्य करायचे. कधी अबुधाबी इंटरकॉन्टिनेंटल च्या मागे गुजराती मच्छिमारांच्या बोटी उभ्या असत. दोन बोटीतून बाप्पा ला समुद्राच्या मध्यभागी घेऊन जात. मग बोटीतच बाप्पाची आरती करून तिथूनच विसर्जन करायचे, तर कधी एखाद्या निर्जन किनाऱ्यावर बोटीतून उतरून विसर्जन व्हायचे. नंतर काही वर्षे टुरिस्ट क्लब च्या मेरिडीएन हॉटेल च्या मागून 50-60 माणसे मावतील अश्या मोठया बोटीतून ढोलकी वाजवत, गजाननाचा जयजयकार करत सादियात आयलंड वर जायचे आणि तिथे जेट्टीवर उतरून किनाऱ्यावर उतरायचे मग जोरजोरात आरत्या म्हणून बाप्पाला निरोप द्यायचा. अशावेळी तिथे कोणीही आजूबाजूला नसल्याने सगळ्यांचे कंठ जरा जास्तच सुटायचे.

विसर्जनानंतर लगेच आवराआवरीला लागायचे आणि त्यानंतर मनोज धुतांकडे मंजूभाभीनी सर्व कार्यकर्त्यांसाठी आग्रहाने केलेल्या श्रम परिहाराला हजर राहायचे हा वर्षानुवर्षांचा जणू शिरस्ताच बनला होता. मनोज धुतांच्या आधी ही जिम्मेदारी अग्निहोत्री काकांनी सांभाळली होती. स्थापनेच्या दिवशी दुपारच्या भोजन प्रसादासाठी काका काकूंचे सर्वांना अगत्याचे आमंत्रण असे. तिथे भारतीय राजदूतापासून ते छोटेमोठे उद्योगपती, मंडळाचे कार्यकर्ते हजर असत.

        आता गेली दहा वर्षे ISC मध्ये न चुकता बाप्पा चे आगमन होत आहे. काळाप्रमाणे आता उत्सवात खूप स्वागतार्ह बदल झाले आहेत. जागा मोठी असल्याने मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात, स्टेज वर लेझीम, ढोल ताशाच्या साथीने नृत्यसंगीताचे कार्यक्रम होतात. मंडळाचे सभासद त्यात उत्साहाने भाग घेतात. भारतात साजऱ्या केलेल्या गणपतीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या होतात. सासर-माहेरच्या गणपतीची आठवण, हुरहूर काही प्रमाणात दूर होते. परदेशातील माहेरघर म्हणून मंडळाबद्दल एक आपलेपणा, आपुलकीचा भाव निर्माण होतो. दीड दिवसाचा गणपती वर्षभराचा आनंद पदरात देऊन जातो. विसर्जनाला जाताना घरातल्या गणपतीच्या आठवणीने मन व्याकुळ होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना आवाज कातरतो, डोळे पाणावतात आणि जड पावलांनी सर्व घरी परततात ते पुढच्या वर्षीच्या गणपतीची वाट पहात.

 

-प्रशांत कुलकर्णी






No comments:

Post a Comment