Saturday, January 30, 2021

महाराणी ताराबाई---------मंदार आपटे

 

महाराणी ताराबाई

१६७५ साली स्वराज्याचे सेनापती आणि सोयराबाईंचे थोरले बंधू हंबीरराव मोहिते यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीचे नाव ठेवले ताराबाई. वयाच्या व्या वर्षी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराजांची धाकटी सून आणि छोट्या राजारामाची पत्नी म्हणून भोसल्यांच्या घरात आली. ताराबाईचा जीवनकाल तीन कालखंडात विभागला जाऊ शकतो.

. लग्न ते वैधव्य (उदय)

१६८९ साली औरंगजेबाने घातपाताने संभाजी महाराजांना पकडले आणि धर्मांतर करायला सांगितले. स्वाभिमानी संभाजी महाराजांनी नकार दिल्याने त्यांचे हाल हाल करून त्यांना मारून टाकले. त्यानंतर काही काळातच औरंबागजेबाचा सेनापती झुल्फिकार खान याने रायगडाला वेढा घातला. रायगड  हातचा जाणार हे स्पष्ट दिसत होते. राजाराम , ताराबाई, येसूबाई आणि शाहू रायगडावर होते. राजाराम आणि ताराबाई मुघलांच्या वेढ्यातून निसटले आणि दक्षिणेत चेन्नई पासून १६० कि. मी. वर असलेल्या जिंजीच्या किल्ल्यावर पोहचले. येसूबाई आणि शाहू यांना मुघलांनी कैद केले. पण झुल्फिकार खान त्यांच्या मागावर गेला आणि त्याने जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला. १६९० ते १६९८ ही आठ वर्षे चाललेला हा वेढा मुघल इतिहासातील सर्वात दीर्घ वेढा होता. त्या काळात राजाराम महाराजांची प्रकृती नाजूक झाली होती. पण ताराबाईंनी मराठ्यांचे मानसिक धैर्य खच्ची होऊ दिले नाही आणि वर्षे या वेढ्याचा प्रतिकार करत राहिल्या. त्याकाळात ताराबाई राजकारणात आणि युद्ध कौशल्यात निष्णात झाल्या. या काळात त्यांनी दक्षिणेतून मराठ्यांच्या मुघलांबरोबर चालू असलेल्या लढ्याचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात मुघलांना आपल्या गनिमी काव्याने सळो की पाळो करून सोडत होते ताराबाईचे सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव (संताजी-धनाजी).

१६९८ साली राजाराम आणि ताराबाई जिंजीच्या वेढ्यातून निसटले आणि महाराष्ट्रात आले. परंतु दोनच वर्षात, १७०० साली, राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यावेळी ताराबाईचे वय होते अवघे २५ वर्षे. ताराबाईंना त्यावेळी लहान मुलगा होता, शिवाजी. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला राजसबाईंना पण एक मुलगा होता, संभाजी. औरंगजेबाला वाटले मराठे संपले. स्वराज्याला राजाच राहिला नाही. एक बाई आणि दोन मुले काय तो प्रतिकार करणार. मराठे संपले! औरंगजेबाचे जीवितकार्य सिद्धीस आले! मुघल लेखक काफी खान लिहितो "औरंजेबाने ढोल ताशे पिटून मराठेशाही संपल्याचा आनंद साजरा केला". त्यांना वाटले "कमजोर उपेक्षणीय आणि असहाय्य"  राणी काय करू शकणार?

२. महाराणी ताराबाई (माध्यान्ह)

पण या संकटांनी डगमगत तर त्या ताराबाई कसल्या? काहीही झाले तरी स्वराज्याचे रक्षण झालेच पाहिजे. म्हणून ताराबाईंनी आपला लहान मुलगा शिवाजी याला गादीवर बसवले आणि मुखत्यार म्हणून राज्य केले. गनिमी कावा आणि मुघल सरदारांना लाच देण्यात ताराबाईंचा हातखंडा होता. ताराबाई तलवारबाजी, धनुर्विद्या, घोडेस्वारी, डावपेच आणि रणनीती मध्ये पारंगत होत्या. ताराबाईंच्या काळात मराठ्यांनी गमावलेले प्रांत परत मिळवले तसेच गुजरात आणि माळव्यावर छापे घातले. ताराबाईंनी मुघलांशी लढाया केल्या आणि जिंकल्या. मुघलांना काढता पाय घ्यावा लागला. १७०५ साली ताराबाईंनी पन्हाळा ही स्वराज्याची राजधानी केली.

मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचे औरंग्याचे स्वप्न पूर्ण होण्याची लक्षणे दिसेनात. जे सहज होईल असे वाटले ते होईना, उलट मराठ्यांची ताकत वाढली. मराठ्यांचा खात्मा करण्यासाठी दिल्लीहून औरंगाबादला जवळजवळ ५० वर्षे येऊन राहिलेल्या औरंग्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. ताराबाईंनी स्वराज्याचे रक्षण केले. मराठी राज्य वाचवले. १७०७ साली औरंगजेब मरण पावला.

काफी खान ताराबाईंबद्दल लिहितो "ती एक हुशार बुद्धिमान स्त्री होती, आणि तिच्या पतीच्या कार्यकाळात तिला नागरी आणि सैनिकी बाबींबद्दल माहिती असल्यामुळे नावलौकिक मिळाला होता".

३. छत्रपती शाहू  (सायंकाल)

औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मुघलांनी शाहू महाराजांना सोडले. ताराबाईंनी ते खरे शाहू महाराज आहेत, तोतया नाही, याची खात्री केली. पण मराठ्यांमध्ये दुफळी झाली. स्वराज्याच्या गादीचा खरा वारसदार कोण? शाहू की ताराबाई-शिवाजी? हळू हळू ताराबाईंच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर यांच्यासारखे मातब्बर सरदार शाहू महाराजांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४ मध्ये राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजीला पन्हाळा येथे छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई त्यांचा मुलगा शिवाजी यांना अटक केली. त्यानंतर पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई सातारा येथे राहण्यासाठी गेल्या.

आपला नातू रामराजा याला दत्तक घ्यावे म्हणून ताराबाईंनी शाहूचे मन वळविले. शाहूंच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीराव पेशव्यानीं रामराजाला साताऱ्याच्या गादीवर बसविले. रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागत आहेत, हे पहाताच ताराबाईंनी तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला. १७५० मध्ये साताऱ्यात ताराबाईंनी रामराजास कैदेत टाकले. पेशव्यांनी ताराबाईना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले आणि त्या पेशव्यांना शरण गेल्या.

पानिपतच्या युध्दानंतर १७६१ साली, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

 

आपल्या एका आयुष्यात ताराबाईंनी स्वराज्याचा उदय, जवळ जवळ अस्त, पुनरुज्जीवन, पेशवाईचा सुवर्णकाळ आणि पानिपतचा आघात हे सर्व पाहिले. मुघल दक्खन जिंकू शकले नाहीत कारण ताराबाई भक्कम उभ्या होत्या. ज्या वेळी मराठी साम्राज्य नामशेष होण्याची वेळ आली होती त्या वेळी भवानी ताराबाईंच्या रूपाने धावून आली आणि स्वराज्य वाचवले. जर तारा बाई नसत्या तर नसते पेशवे, नसता महाराष्ट्र आणि नसती मराठी अस्मिता. आपल्या भाळी आली असती गुलामी, फक्त गुलामी!

No comments:

Post a Comment