Wednesday, November 18, 2020
कोथिंबीर वडी-----------मनाली सहस्रबुद्धे
साहित्य :
कोथिंबीर,डाळीचं पीठ,तांदूळ पीठ,ओवा,हळद,लाल तिखट,मीठ,तेल
कृती :
प्रथम एक जुडी कोथिंबीर
नीट निवडून घ्यावी.नंतर धुवून थोडी ओलसर असतानाच बारीक चिरून घ्यावी.
बारीक चिरलेल्या
कोथिंबिरीत २ मोठे चमचे डाळीचे पीठ,२ छोटे चमचे तांदूळ पीठ,चिमूटभर ओवा,हळद,चवीनुसार
मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
मिश्रण खूप ओले किंवा खूप
कोरडे असू नये.कोथिंबिरीच्या ओलसर पणात जर सर्व एकजीव झाले नाही तर गरजेनुसार थोडे
पाणी घालावे.
वरील मिश्रण एका गोल
डब्यात किंवा भांड्यात नीट पसरवून घ्यावे.कुकर मध्ये थोडे पाणी घेऊन कोथिंबीर
वडीचे मिश्रण असलेला डबा किंवा भांडे वाफवावयास ठेवावे. कुकर ची शिट्टी लावू नये.
साधारण १५ ते २० मिनिटात छान शिजलेली कोथिंबीर वडी तयार होते.
कोथिंबीर वडी चे मिश्रण
थोडे गार झाल्यावर त्याच्या आपल्या आवडीनुसार वड्या पाडून घ्याव्या.वड्या
पाडेपर्यंत गॅसवर तेल गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवावे. तेल गरम झाल्यावर वड्या
तळून घ्याव्या.
गरमागरम खुसखुशीत कोथिंबीर
वडी पुदिना चटणी बरोबर अतिशय चविष्ट लागते.
तळ टीप : कोथिंबीर वडीचे
मिश्रण कालवताना त्यात आवडत असल्यास थोडी थालीपीठ भाजणीसुद्धा घालू शकता. वड्या
अजून खमंग होतात.
Friendship Bench----------- अश्विन गाडगे
Friendship Bench
"यारो दोस्ती बडी ही हसीन हैं ..ये
ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं.. "
K K चे हे गाणे मैत्रीचे सुंदर वर्णन
करते. खरं तर मैत्री मधला सर्वात सुंदर
अनुभव म्हणजे; आपण जसे आहोत तसे मित्र आपल्याला
स्विकारतात. त्याच बरोबर आपले अनुभव, भावना आणि विचार मित्रांबरोबर
शेअर करतो. मित्रा बरोबर आपल्या समस्या शेअर केल्या की
आपल्याला बरे वाटते.
आता
तुम्ही विचाराल यात काय नवीन ? तर याच आधारावर मला एक विलक्षण
कल्पना - Grandma Friendship Benches याची माहिती द्यायची आहे.
तर
जाऊया झिम्बाब्वे ला. या आफ्रिकन
देशात १४ दशलक्षाहून अधिक लोक आहेत परंतु २० पेक्षा कमी मानसशास्त्रज्ञ आहेत. अनेक
वर्षांच्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारी नंतर मानसिक आरोग्य हे
एक मोठे आव्हान आहे आणि झिम्बाब्वेच्या चारपैकी एकाला नैराश्य (anxiety) किंवा चिंताग्रस्तपणाचा (depression)
त्रास असल्याचे डॉक्टरांचा अंदाज
आहे. दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढू लागली. रुग्णालयांमध्ये मोकळी जागा
शोधणे अशक्य सिद्ध झाल्यावर, मानसशास्त्रज्ञ डॉ. डिक्सन चिबांडा यांनी पब्लिक
पार्क बेंचला थेरपीच्या जागांमध्ये बदलण्याची कल्पना दिली.
थेरपिस्ट
कमी आहेत तर नवीन थेरपिस्ट तयार करावे लागतील. या साठी मोकळा वेळ आणि भरपूर अनुभव
असलेले आजी आजोबा यांची नेमणूक करण्यात आली.
स्थानिक
समुदायातून अनेक आजींना सीबीटी (Cognitive Behavioural Therapy) नावाच्या टॉकिंग थेरपीमध्ये
कित्येक आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण
तर पूर्ण झाले पण हे सुरु करायला डॉक्टरांना थोडी भिती होती आणि याला कसा प्रतिसाद
मिळेल या बाबत साशंक होते.
आजी
म्हटली की प्रेम आणि जिव्हाळा आला आणि
त्यात झिम्बाब्वेच्या समाजात आजींचा खूप आदर केला जातो. तर अश्या प्रकारे अनेक
आजींनी पार्क च्या बेंचेस वर बसून लोकांच्या समस्या ऐकण्यास सुरूवात केली.
अश्या
प्रकारे 'Grandma Park Benches' खूप लोकप्रिय झाले आणि यांनी ५०,००० पेक्षा जास्त लोकांना
त्यांच्या आयुष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य दिले.
झिम्बाबवे
ला ‘Grandma bench’ च्या रूपात त्यांना एक 'friendship bench'
मिळाला.
तुमच्या
कडे आहे का असा मित्र कट्टा जिकडे तुम्ही तुमच्या मानसिक समस्या बिनधास्त पणे शेअर
करू शकता ?
आणि
हो, जर आपण चिंता किंवा
नैराश्यासारख्या मानसिक आजारातून जात असाल तर कृपया एखाद्या मित्रा बरोबर नक्की
शेअर करा.
आणि
तुम्हाला जर कोणी त्यांचे प्रॉब्लेम शेअर करत असेल तर नक्की ऐकून घ्या आणि हो, काही जाणवल्यास मानसशास्त्रज्ञाकडे
रेफर करा.
मानसिक
आरोग्य हे आरोग्याचा एक अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. डब्ल्यूएचओच्या अनुसार :
"आरोग्य ही पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणकारी
अवस्था आहे आणि केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही.
मानसिक
आरोग्य ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला स्वतःची क्षमता समजते, जीवनातील सामान्य ताणतणावांचा सामना करता येतो, उत्पादनक्षमपणे कार्य करू शकतो आणि ती व्यक्ती आपल्या
समाजास योगदान देण्यात सक्षम होते.
मानवांनी
विचार करणे, भावना व्यक्त करणे, एकमेकांशी संवाद साधणे आणि जीवन जगणे या आपल्या सामूहिक आणि
वैयक्तिक क्षमतेसाठी मानसिक आरोग्य मूलभूत आहे.
तर
आपल्या मित्रासाठी नेहमीच 'friendship bench ' वर available
राहा....
परिराणी-------श्री. संतोष राक्षे
परिराणी
लालचुटुक गुलाबी
गाडीला लावले पंख गुलाबी मोरपिसांचे
पांढरे घोडे गाड़ी
ओढायला आणि बसायला सीट चमचम हिऱ्यांचे
झुबकेदार मिशीवाला
राजकुमार होता तिचा गाडीवान चालक
बाबांकडे पाहून अदबीने
म्हणतो कसा, कुठे जायच बोला मालक
गाडीतून आकाशाची
सफर म्हणजे धमाल खूप सारी
चंद्राचा गरगर भोवरा
करून मीच घेतली गिरकी भारी
जाताजाता झोपलेल्या
सूर्याच्या डोक्यावर मारली टपली
ओरडा नको म्हणून
चांदण्याच्या चादरीआड़ हळूच लपली
मध्येच मग लागली
एका परीराणीची नगरी काचेची नगरी
चॉकलेट सिंहासनावर
ऐटबाज परी, जणू आई झाली नवरी
लुपाछूपी खेळायला
तिथे हजर खूप ताया, हरीण नी ससा
बाहुली हाती देत
परीराणी म्हणते कशी.... आता तरी तुम्ही हसा
रात्री जेवायला तीने
दिले .. आईसक्रीमचे लाडू, त्यावर मारला ताव
सोबतीला होते पॉपकॉर्नचे
गुलाबजामून आणि चमचमीत मिसळपाव
मांडीवर थोपटत मग
तिने सांगितली.. गोष्ट एक…. सात बुटक्यांची
खऱ्या परीच्या कुशीत
निजवत..
म्हणत गेली
परिराणी स्वप्नांची ....उद्या येईन मी नक्की परत
जशी मला भावली-------------श्री मंदार आपटे
कविता: जशी मला भावली
आवाहन - दत्ता
हलसगीकर
२०१७ हे साल
संयुक्त अरब अमिरातीने "इअर ऑफ गिविंग" म्हणून साजरे केले. समाजाच्या ऋणाची
परतफेड करण्याच्या संस्कृतीचा प्रसार करणे हे या मागचे उद्दिष्ट होते. आज मी निवडलेली
दत्ता हसलगीकरांची कविता देखील याच संकल्पनेवर आहे. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर
मांडतो.
आवाहन - दत्ता
हलसगीकर
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे
या कवितेमध्ये कवी म्हणतो की ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी ते, ज्यांच्याकडे नाही त्यांना, द्यावे. ज्यांच्याकडे बाग आहे त्यांनी फुले द्यावीत. ज्यांच्याकडे सूर आहेत त्यांनी गाणी द्यावीत. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी द्यावे. ज्यांच्याकडे श्रीमंत हृदय आहे त्यांनी ते रिते केल्यानेच
भरते. जे मोठे आहेत त्यांनी लहानांमध्ये मिसळावे आणि जे जे पीडित आहेत त्यांना आधार द्यावा. इतरांना आपल्यामुळे जर आनंद मिळत असेल तर तो जरूर द्यावा.
समाजवादी दृष्टिकोनातून केलेली ही कविता मनाला स्पर्श करून जाते कारण यात केलेली मागणी रास्त आहे आणि कवी अतिशय सध्या भाषेत खूप काही सांगून जातो. आपल्या शेतात जर चांगले पीक यावे म्हणून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे वाटणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट आपल्याला जे सांगते तेच ही कविता सांगते. कवीने मानवातल्या मानवतेला केलेलं हे आवाहन आहे.
देण्याने तुमचे कमी होत नाही तर इतरांचे वाढते. जर सर्वांची उन्नती झाली तरच समाजाची उन्नती शक्य आहे. आणि ज्यांची परिस्थिती चांगली आहे (आर्थिक, सामाजिक, वैचारिक) त्यांनी इतरांच्या उन्नतीला हातभार लावणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
शेवटच्या चार ओळी तर या कवितेचा उच्चबिंदू आहेत. जे आभाळाएवढे झाले आहेत त्यांनी थोडे खाली यावे आणि सामान्यजनांच्या मिसळावे, स्वतःच्या परिस्थितीचा गर्व असू नये. जे मातीत मळले आहेत त्यांना उभारी घेण्यास थोडा आधार द्यावा. थोडा हे महत्वाचे. आयते देऊ नये पण त्यांना थोडा आधार देऊन स्वावलंबी करावे.
तुकाराम महाराजांनी भक्तीयोगात म्हंटले आहे "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा". कवी या कवितेत हाच विचार कर्मयोगात मांडतो आहे.
जशी मला भावली---------श्री मंदार आपटे
पाणीच पाणी - बा. भ. बोरकर
पाणी, जल, नीर, जीवन. पाण्याला विविध नावानी संबोधले
जाते. मनुष्य जीवन पाण्यामुळे अस्तित्वात आले, फुलले, बहरले आणि जोपासले. पाणी म्हंटले
की बहुतांशी आपल्या मनात चांगल्या आठवणी जाग्या होतात. पाणी निर्मळ, शुद्ध, अस्वच्छता
घालवणारे आणि तहान भागवणारे. भारतात चालू असलेल्या पावसाळ्याचे निमित्त साधून मी बा.
भ. बोरकरांची ही कविता निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.
पाणीच
पाणी - बा. भ. बोरकर
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी
कसे आहे हे पाणी? ते तृप्त आहे, तुष्ट आहे, रुष्ट
आहे, पुष्ट आहे. प्रवाह हा पाण्याचा स्थायीभाव. त्याला अडवलेले, कोंडलेले आवडत नाही.
त्याला नदीरूपाने वेगाचे वेड आहे. या वेगवान पाण्याला निर्बंध घातला (धारण) आणि मग
त्याला नियंत्रित पद्धतीने प्रवाही केले तर त्यात दडलेली ताकत (वीज) ते आपल्याला देते.
पण हेच पाणी जर विहिरीत असेल तर ते शांत असते, पारदर्शी
असते आणि जेंव्हा त्याला विहिरी बाहेर काढतात तेंव्हा ते उच्शुंखल असते कारण ते थोडे
असते, कमी असते. ते मानवता जोपासते, वाढवते.
हेच पाणी जेंव्हा सागरात जाते तेंव्हा अक्राळ विक्राळ
आणि अनिर्बंध होते आणि पुन्हा पुन्हा ते खडकावर धडक मारत राहते. न थकता, न थांबता.
परिणामांची पर्वा न करता. अविरत.
हेच पाणी जेंव्हा पाऊस बनून पडते, तेंव्हा त्याचे
वेगवान थेम्ब साळींदराच्या काट्या प्रमाणे टोचतात, पण जेंव्हा ते जमिनीवर पडते तेंव्हा
मात्र ते एखाद्या लाडक्या प्राण्याप्रमाणे पायाशी घोटाळते. जमिनीची तहान भागवते. पिकांना
पाणी देते. थकल्या भागल्या वसुंधरेला ताजे तवाने करते.
अश्या या पाण्याच्या उत्सवी, पाणी उफाळून आले आहे
आणि पाण्याच्या या मोठेपणाच्या प्रत्ययाने मी देखील पाणीच झालो आहे. मी देखील स्वतःला
विसरून गेलो आहे. मी देखील तद्रूप झालो आहे. तन्मय झालो आहे.
पाण्याचा सर्वात मोठा गुणधर्म आहे देणे, देत राहणे.
त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता. जिथे जाईल तिथले होणे. ज्यात जाईल त्याचा रंग
धारण करणे. अशा या निर्मळ, शुद्ध आणि दातृत्वयुक्त पाण्याची माहिती सांगावी तेवढी थोडीच.
ही कविता दोन कारणांसाठी मला विशेष भावली. एक म्हणजे
या कवितेत पाण्याची अनेक रूपे चितारली आहेत आणि दुसरे म्हणजे ही कविता हा अनुप्रास
अलंकाराचा अत्योत्तम नमुना आहे.
नव प्रभात नव दिशा------रुपाली मावजो किर्तनी
नव प्रभात नव
दिशा
यंदाची ही दिवाळी
सर्वार्थाने वेगळी असेल
उत्साह, तरी जबाबदारीने
उचललेलं पाउल दिसेल
कुणी कुणाकडे जाणार नाही
दिवाळी साजरी नक्की करतील
अंधारातून बाहेर पडायला
मदतीचा हातही देतील
कंदील लावतील, दिवे पेटतील
चकली लाडू चिवडा करतील
सणाच्या तयारीत सर्व जण
(थोड्या वेळा साठी का होईना)
चिंता काळजी विसरून जातील
पुन्हा घेऊन आली दिवाळी
मानवतेचा नव संदेश
काळोखातनं वाट काढायला
पसरा प्रकाश देश विदेश
लक्ष्मीच्या पावलांनी घर सारं
सुख समृद्धी ने भरूच दे
हीच पावलं धडपडणाऱ्या
झोपडी कडेही वळू दे
रांगोळीच्या अनेक रंगात
दीप सुखाचे पेटुदे
निराश मनांत रंग भरूनी
दीप आशेचे उजळू दे
कंदिलाच्या लख्ख उजेडात
मिटून जाऊ दे ही निशा
पसरलेला प्रकाश दाखवो
नव प्रभात नव दिशा
-रुपाली मावजो
किर्तनी