Monday, June 25, 2018

प्रलय - पुस्तक परीक्षण


लेखक : विनीत बाजपेई
प्रकाशक : व्ही. बी. परफॉरमेंस एल एल पी.
पाने  : ३१५
प्रकाशन: सन २०१८
भाषा : इंग्रजी

       “हडप्पा” जिथे संपले तिथून ही कथा पुढे सुरु होते.  ख्रिस्तपुर्व १७०० साल: मनुला त्याच्या आईचे कलेवर घेवुन पूर्वेला काळ्या मंदिराकडे जायला सांगितले जाते. वाटेत त्याला गूढ मत्स्य भेटतो. मनुचे वडिल वैवस्वन पुजारी तिरस्कार आणि प्रतिशोधाच्या भावनेने अंध झाले आहेत आणि असुरांच्या मदतीने हडप्पामधील प्रत्येक मनुष्य, प्राणी व वनस्पतीचा सर्वनाश करणार आहेत. आजचा काळ: विद्युतला आता बनारसच्या देव-राक्षस मठासंबंधी रहस्य, कारस्थान, गुढ गोष्टींचे आकलन व्ह्यायला लागले आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि बनारस मधील सिध्द अघोरी महा तांत्रिक त्रिजट कपालीक यांची युती झाली आहे.

       काळ्या मंदिराचे रहस्य काय आहे? वैवस्वन पुजारीचे अजुन किती अध:पतन होणार आहे ? पुजारी घराण्याला कुठला शाप आहे ? मत्स्य कोण आहे? न्यू वर्ल्ड ऑर्डरला विद्युतची भिती का वाटते आहे ? महा तांत्रिक त्रिजट कपालीक परम तांत्रिक द्वारका शास्त्रींना आव्हान देवू शकेल ? विद्युत खरंच देवता आहे का ?

      लेखक आपल्याला एका अद्भुत प्रवासाला घेवुन जातो. आपल्याला एकाचवेळी दोन गोष्टी सांगतो. आजकाल ही कथाकथन शैली खुप प्रसिध्द झाली आहे. एक कथा आहे वैवस्वन पुजारीची, हडप्पाचा सूर्य, प्रत्यक्ष देवता. पण हा देवता देखिल पुरुषोत्तम नाही. जेंव्हा त्याचं अध:पतन होतं तेंव्हा देवही नाराज होतात. प्रलय खचितच येणार. दुसरी गोष्ट आहे विद्युतची. विद्युत हा वैवस्वनचा पुनर्जन्म आहे. त्याला काळ्या ताकदींची ताकत व त्यांचे उद्दिष्ट समजायला लागले आहे. त्याचे पणजोबा द्वारका शास्त्री अजुनही त्याला काळ्या मंदिराचे रहस्य सांगायची वे आली नाही असे म्हणत आहेत.

      या पुस्तकात काही नविन पात्रे येतात. “हडप्पा” मधील विद्युत, द्वारका शास्त्री, वैवस्वन पुजारी, मास्केरा बियांका व् इतर सर्व पात्रां व्यतिरिक्त मत्स्य, ब्रम्हानंद, त्रिजट कपालीक, पिशाचिनी, डाकिणी, मृतात्मे हे सर्व या पुस्तकात हजेरी लावतात.

      कथा मांडणी मनोरंजक आहे. प्रलयाचा  काळ, मनु, त्याची नाव, मत्स्याचे मार्गदर्शन आणि मदत आणि वैवस्वन पुजारीचा प्रतिशोध हा या कथेचा एक भाग झाला. मत्स्याचे पत्र हे नक्कीच श्रीहरी विष्णुच्या व्यक्तिमात्वावर आधारीत आहे. मठ, अमानवी शक्ती, अघोरी आणि येऊ घातलेलं सुष्ट आणि दृष्टांमधील युद्ध हा या कथेचा दुसरा भाग आहे. सर्व जण विद्युतच्या विरोधात उभे ठाकले आहेत. विद्युत त्यांचा सामना कसा करणार?

      पण हे येऊ घातलेलं महायुध्द या पुस्तकात होतंच नाही. ते आता तिसऱ्या पुस्तकात होईल. मी जेंव्हा पहिले पुस्तक “हडप्पा” वाचलं तेंव्हा माझा असा समज झाला होता की पुढचे पुस्तक “प्रलय” ही या कथेची सांगता असेल. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही  ही त्रयी आहे असे कुठेही लिहीलेले नाही. वाचकांना या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर असे समजते की तिसरे पुस्तक  “ काशी” ही या मालिकेची सांगता असेल.

       पहिले पुस्तक छान होते म्हणुन लेखकावर हे पुस्तक अपेक्षाभंग करणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी होती. जरी हे पुस्तक पहिल्या पुस्तकाइतके चांगले नसले तरी त्याच्या पेक्षा फार कमी पडत नाही. हे पुस्तक पुढच्या पुस्तकाची पुर्वतयारी आहे. आपण अशी अपेक्षा करुया की तिसरे पुस्तक हे या मालिकेचे शिरोमणी ठरेल.

मी हे पुस्तक का वाचले?                                “हडप्पा” आवडले होते.

काय आवडले नाही?                                    त्रयी? शेवटच्या पानापर्यंत समजत नाही.

काय आवडले?                                           “हडप्पा” नंतर अपेक्षाभंग होत नाही.

शिफारस                                                  “हडप्पा” वाचले असेल र हे वाचा, अन्यथा आधी “हडप्पा” वाचा.





 
मंदार आपटे.
 
 

No comments:

Post a Comment