Monday, June 25, 2018

दुर्ग भ्रमंती – कात्रज ते सिंहगड (K2S)


नमस्कार मंडळी
          दुर्ग भ्रमंती च्या आठवणीतील मे जून महिना म्हटला की आठवतो तो कात्रज ते सिंहगड (K2S) चा थरारक ट्रेक. ट्रेकिंगच्या विश्वात काही स्थळांभोवतीच्या वाटा या रात्री उमलतात. पुण्यातील K2S ची वाटही अशीच, भटक्यांच्या पावलांना चांदण्या रात्री जागवणारी. K2S हा मुळात चांदण्या रात्री आणि चांगल्या वातावरणात करावयाचा ट्रेक. परंतु आम्ही (म्हणजे मी व माझ्या महाविद्यालयीन वर्गमित्रानी) दिवस निवडला भर उन्हाळ्यात (मे महिन्यात) दिवसा उजेडी ट्रेक करायचा. आपण काहीवेळा अज्ञानात एखादे धाडस करुन बसतो. K2S भर उन्हाळ्यात करणे हे असेच एक धाडस होते. आमच्यातील एकाला या आधी K2S चा अनुभव होता. तर एकाचा आयुष्यातील हा पहिलाच ट्रेक. बाकी उरलेल्या तिघांना ट्रेकिंग चा अनुभव तर होता पण K2S ची ओळख नव्हती

झाले ! आम्ही पांडवांनी ट्रेक साठी जय्यत तयारी सुरु केली. रस्त्यात एकही गाव नसल्यामुळे भरपूर पाणी, नीकॅप, इलेक्ट्रॉल, ग्लुकोज, खाण्याचे जिन्नस अशा समानाने सॅक फुगली. मे महिन्याच्या शेवट्च्या शनिवारी पहाटे सारे पांडव शूज घालून स्वारगेटला एकदम वेळेत हजर. स्वारगेटवरून कोंढाणपूरची बस पकडली. आमचा अवतार पाहून सगळ्या 'कोंढाणपूरकरांना' समजलं की पोरं सिंहगडाला चाल्ल्यात. बस निघाली. जवळपास सगळी लोकं एकमेकांना ओळखत होती. एक मध्यमवयीन गृहस्थ आमच्यामागे बसले होते. त्यांनी विचारलं, "कुठं निघालाय?"
         "सिंहगड", मोघम बोलून मी पुढे वळलो.
          आमच्यातील भीमाच्या च्या अवतारात असणाऱ्या मित्राने त्याला विचारलं, "काही प्रॉब्लेम नाही ना जायला? आम्ही असं ऐकलं की बिबट्या फिरतोय..."
         "काय नाय होणार... फक्त जिगर पायजे जिगर..." गृहस्थ मिशी पिरगळत बोलले.
        एव्हाना गाडी घाटाला लागली होती. जसं जसं डोंगर, झाडी वाढायला लागली तसं तसं आमच्या मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले.
      आम्ही जुन्या पुणे-सातारा रस्त्याने कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे उतरलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते. डोंगरधारेवरची ही वाट. काटेरी झाडीतली. यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या. तर यातील चौदावी टेकडी ही प्रत्यक्ष सिंहगड डोंगर होती.
       टनेल जवळील वाघजाई देवीच्या दर्शनाने ट्रेकला सुरवात केली. आम्ही पहिली टेकडी चढून पठारावर आलो तेव्हा पहिल्यांदाच संह्याद्रीचे रौद्र स्वरूप एवढ्या जवळून पाहिले. पहिल्या टेकडीने पुढील प्रवासाची छोटी झलक दाखवली होती. पुढील संपूर्ण ट्रेक हा उन्हाळ्यात सुकलेल्या काटेरी झुडपातून होणार याचा सर्वांना अंदाज आला होता. पण जसे सिंहगडावर स्वारी करून गेल्यावर सूर्याजी मालुसरे म्हणाले होते, ‘सर्व दोर कापले आहेत. तेव्हा आता उडी मारून मरा किंवा लढून मरा!’ तसेच आम्हाला वाटले. आमच्यातील कुणीही माघारी फिरता या तंगडतोड ट्रेकवर आपली पावले टाकली


          एखादी टेकडी चढणे सोपे होते परंतु उतरणे खूपच कठीण जात होते. कारण उतारावरील माती सै कोरडी असल्यामुळे पाय रोवून उभे राहणेही शक्य होत नव्हते. हा टप्पा म्हणजे भयानक घसरण, बुड न टेकवता खाली उतरणं महाकठीण काम. या वाटेवर जवळपास सगळेजण चालण्यापेक्षा घसरायला पसंती देतात, त्यामुळे चक्क घसरगुंडी करून उतरायला सुरुवात केली.

          टेकडी उतरल्यावर मध्ये पठारासारखा भाग येई तेथे जरा वेग वाढे. परत पुढची चढण आली की तो मंदावे. मधूनचं झाडात खुट्ट व्हायचं आणि आम्ही जागेवर स्तब्ध उभे राहून आवाजाचा कानोसा घ्यायचो. तेव्हा सगळी इंद्रिये त्यांच्या पूर्ण क्षमतेने धोक्याचा अंदाज घ्यायची. मग असेल एखादा ससा असे म्हणून आम्ही पुढे चालायचो. तीन चार टेकड्या पार झाल्यावर आमचे भीमराव चांगलेच दमलेले दिसले. एव्हाना दुपारचे साडेबारा वाजले होते आता थोडा वेळ थांबायचे ठरले. बरोबर आणलेला डबा इथेच खाल्ला आणि पुन्हा वाटचालीला सुरूवात केली. एव्हाना ऊन देखील वाढले होते. भर उन्हात पायपीट करताना सगळ्यांचीच कसोटी लागली. दर ४०  ते ४५  मिनिटाने थांबा घेत होतो. पाचव्या टेकडीनंतर भीमराव पुन्हा उसळला. म्हणाला,  मी काही इथून पुढे चढू शकत नाही. आणि तिथेच झोपला. त्याला बाबापुता करत उठवलं. म्हणलं वर जाऊन झोपू. वारं पण असेल आणि एवढी झाडीपण नसेल. मग हळूहळू आम्ही माथ्यावर पोहोचलो. आम्ही तिथेच एका दगडाला टेकून बसलो. हा तर लगेच घोरायला लागला. सर्वांच्याच मनोधैर्याची कसोटी होती. पण ट्रेक पूर्ण करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. कारण परत मागे फिरणे शक्य नव्हते. एकमेकाला धीर देत, होईल होईल म्हणत तसच पुढे जात राहीलो.

         टेकडीला वळसा घातला असता तर कमी दम लागला असता. परंतु चालण्याचे अंतर दुप्पट झाले असते. म्हणून दमछाक होत असून देखील आम्ही टेकडी पूर्ण चढून उतरण्याचा पर्याय निवडला होता.
        एक एक टेकडी जशी पार होत होती तशी पुढची टेकडी समोर आ वासून उभीच. एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांना चिअर करत पुढं जाणं सुरुच होतं. आमचा वेग फारच मंदावला होता. पण तरीही टिम स्पिरीट आणि कमिटमेंट याचा प्रत्यक्ष प्रत्यय येत होता.
         मजल दरमजल करीत दुपारी साडेचारपर्यंत दहा टेकडय़ा पार करून झाल्या होता. आता फक्त तीन उरल्या होत्या, पण फार चढण होती. पहिली टेकडी अर्धी चढलो असेल. त्या टेकडीवर जाऊन समोर पाहिलं. दिमाखात उभा असलेला राकट सिंहगड साद घालत होता. सर्वानाच थोडा हुरूप आला. लक्ष फार जवळ दिसत होते. पण त्याचबरोबर वेळही फार कमी शिल्लक होती. शेवटी कसेबसे तेरावी टेकडी पार केली आणि आम्ही सिंहगडाच्या पक्क्य़ा वाटेला येऊन मिळालोआता गडावर जाण्यासाठी डोंगरातून वा गाडी रस्त्याने असे दोन मार्ग होते. पण डोंगर चढायचे त्राण कुणामध्येही उरलेले नसल्यामुळे आणि खूप उशीर सुद्धा झाला असल्यामुळे आम्ही जीप करून पुण्याकडे रवाना झालो.
            जवळपास १८ वर्षांपूर्वी हा ट्रेक केला त्यावेळी गूगल चे ज्ञान नव्हते. परंतु आता या लेखाच्या निमित्ताने गूगल वरील नकाशा बघताना तो सारा मार्ग आणि त्यावरील थरार डोळय़ांपुढे चमकून गेला.





चढाई साठी लागणारा वेळ: अंदाजे १० तास.
श्रेणी: मध्यम ते कठीण (वाट अवघड नाही परंतु मनोधैर्याची कसोटी बघणारा ट्रेक)




सारंग आपटे

No comments:

Post a Comment