Monday, June 25, 2018

संक्रमण.....

 
      बहरच्या संपादकांचा बहरसाठी साहित्य पाठविण्याचा संवादसंदेश वाचला. खूप छान शब्दात मांडलेला हा संवाद मनाला भिडला आणि मधे नकळत खूप दिवस रुसलेली लेखणी सर सर बरसू लागली अगदी ऋतुबदलाच्या पावसासारखी. 

     खरंच मे ते जून हा प्रवास संक्रमणाचा, बदलाचा... तप्त धरतीने तृप्त हिरवाईची शाल पांघरायचा. मनमर्जी सुट्टी ते शिस्तबद्ध नियमित शाळेचा, आईच्या पदराखालून कधी बालवाडीच्या टप्प्यावर शाळेच्या ‘ होम अवे फ्रॉम होम’ च्या प्रांगणात पाऊल टाकण्याचा तर 12 वीच्या टप्प्यावर शाळेच्या सुरक्षित विश्वातून, अज्ञान कुमार अवस्थेतून बाहेरच्या जगाच्या अफाट विश्वात, सज्ञान यौवनावस्थेत पाऊल टाकण्याचा.

      हे दोन्हीही टप्पे खरंतर आई आणि बाळ दोघांसाठीही तितकेच महत्त्वाचे आणि हळवे करणारे ... एका टप्प्यावर आपल्या बाळाच्या पंखात शिक्षणाचे, ज्ञानाचे बळ यावे म्हणून बाळाच्या बोटाला धरून, कडेवर घेऊन बाळाला शाळेच्या प्रांगणात सोडते. बाळ परत परत आईला मिठी मारतं, रडतं. तरी ती मोठ्या कष्टाने त्याचे चिमुकले हात बाजूला करते आणि मोठ्या धैर्याने शाळेत त्याला सोडून पाठ फिरवून घरी येते. रडणाऱ्या बाळाला धीर देते. डोळ्यातले पाणी त्याला दिसू न देता प्रयत्नपूर्वक बाजूला सरते.... तर दुसऱ्या टप्प्यावर हेच बाळ रडणाऱ्या आईला जवळ घेतं. अग मी होस्टेलमध्ये घेईन काळजी स्वतःची , तू नको काळजी करू. मी आता मोठा/ मोठी झालो/ झाली आहे म्हणत maturity च्या एका अनोख्या जाणीवेने आईला धीर देते. डोळ्यातले पाणी तिला दिसू न देता आपल्या ध्येयाच्या दिशेने पावलं टाकतं. आईकडे मोठ्या निकराने पाठ फिरवतं. त्यातून हे बाळ आईचं एकुलतं एक किंवा पहिलं बाळ असेल तर आईसाठी हे टप्पे तसे खडतरचं. याचा अर्थ दुसऱ्या बाळासाठी वाईट अथवा काळजी वाटतं नाही असं नाही फक्त मनाची तयारी झालेली असते इतकचं. बाळ किलकिल्या डोळ्यांनी आईकडे बघून ओळखीचं हसायला लागतं, तिचा स्पर्श ओळखायला लागतं, दुसऱ्या अनोळखी व्यक्तीकडे बघून पटकन मुरकी मारतं, रांगणे, उभे राहणे, चालणे, बोलणे हे सगळे टप्पे ओलांडतं चार पाच वर्षे कशी झपाट्याने सरतात ते कळतंच नाही आणि मग उभा राहतो पहिला टप्पा संक्रमणाचा....

      आईचे बोट सोडून, घरातला मनमानी कारभार सोडून शाळेच्या थोड्याश्या शिस्तबद्ध विश्वात पाऊल टाकण्याचा. शाळेच्या प्रवेशद्वारावरून पळून येऊन, आईच्या मागे दडून, रडून गोंधळ घालून, ‘ मला नाही शाळेत जायचं, मला काही नको, नवीन डबा , दप्तर नको, आवडीचा खाऊ नको, काही काही नको, फक्त तू हवीस ‘ म्हणत आईच्या कमरेला घट्ट मिठी मारण्याचा . आई ही चिमुकली मिठी सोडवते आणि बाळाला ज्ञानाची, शिक्षणाची कवाडं उघडी करून देते.

      बाळ हळूहळू या विश्वात रमायला लागतं, मित्रमैत्रिणी मिळतात, शिक्षकांशी गट्टी जमते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ब्रह्मवाक्य वाटायला लागते. आमच्या मॅडमनी/ सरांनी असेच सांगितले आहे आणि तेच बरोबर आहे. असं म्हणतं म्हणतं दहा बारा वर्षे कशी सरतात तेच कळत नाही आणि मग काहींच्या विश्वात उभा राहतो संक्रमणाचा दुसरा टप्पा... शाळा/ ज्युनिअर कॉलेजच्या शिस्तबद्ध आखीव रेखीव आयुष्यातून आपल्या ध्येयाच्या दिशेने स्वयंशिस्तीच्या आयुष्यात पाऊल टाकण्याचा.....

      या टप्प्यावर बाळाला सोडताना मात्र आई थोडीशी धास्तावते. बाळाच्या पंखात बळ तर आले आहे पण अजूनही नेमकी दिशा त्याला सापडायची आहे. त्या दिशेकडे झेपावत असताना ते कुठे भलत्याच दिशेला भरकटणारं तर नाही ना ही अनामिक भीती तिला अस्वस्थ करत असते. आतापर्यंत पिल्लू नजरेसमोर होतं, घरट्याच्या दारापासून घरटं असलेल्या झाडाच्या फांदीपर्यंतच त्याची भरारी होती. त्याचे सवंगडी पण माहितीचे , नजरेखालचे होते. आता पिल्लाचे विश्व विस्तारणार आहे. सारं आकाश त्याला भरारी मारण्यासाठी साद घालत असणारं आहे. त्या आकाशाला गवसणी घालत असताना येणाऱ्या वाऱ्यापावसाने ते कोलमडून तर पडणार नाही ना? या प्रवासात भेटणाऱ्या एखादं दुसऱ्या सहप्रवाशाच्या नादाने ते दुसऱ्याच वाटेवर वाट तर चुकणार नाही ना? भरारी मारताना ते त्याच्या घरट्याला विसरणार तर नाही ना ? त्याला आवडता खाऊ पोटभर मिळेल का ? त्याच्याशी ते कसं जुळवून घेईल ? या अश्या अनेक शंकाकुशंकांनी तिचं मनं काहूरलेलं असतं. डोळे नकळत भरून येत असतात. बाळाची कमरेला पडलेली चिमुकली मिठी मोठ्या निकराने सोडवणारी ती माऊली या टप्प्यावर मात्र मोठ्या झालेल्या बाळाला मिठीत बद्ध करण्याचा असफल प्रयत्न करत असते. मग बाळच तिला मिठीत घेतं, ‘ नीट राहीन ग मी, कशाला काळजी करतेस माझी, तू तुझी आणि बाबाची काळजी घे’ असं म्हणत तिला दिलासा द्यायचा प्रयत्न करतं. बाळाच्या या अनोख्या mature रूपाने ती सुखावते, त्याच्या कौतुकाने, अभिमानाने तिचे डोळे भरून येत असतात. आणि बाळ तिच्या डोळ्यातले अश्रू पुसताना तिला अजून वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवतं ...

        खरंतर आईइतकाचं बाळासाठीही हा टप्पा मनात उत्सुकता आणि जबाबदारी या उनपावसाचा खेळ मांडणाराच असतो. वेळेत घरी परतलो नाही म्हणून पडणाऱ्या आईबाबांच्या ओरड्याच टेन्शन नसणार हा आनंद जितका सुखावणारा तितकीच घरी परतल्यावर वाट बघणारं, पावसात भिजून आल्यावर गरम गरम चहाचा कप समोर करणारं, आपलं सगळं न कंटाळता शांतपणे ऐकून घेणारं कुणी नसणारं ही जाणीव ही हुरहूर लावणारी. वाढदिवसाला मित्रमैत्रिणींबरोबर मनमुराद धुमधमाल करत असताना वाढदिवसासाठी खास आपल्या आवडीचा पदार्थ करणाऱ्या, औक्षण करून आपल्या उदंड यशाची आणि आयुष्याची प्रार्थना करणाऱ्या आईशी मात्र virtual संवाद साधत समाधान मानावं लागणार, कधीकधी मेसमधली बेचव, न आवडीचे जेवण आईच्या हातच्या चविष्ठ जेवणाच्या आठवणींवर गोड मानुन घ्यावं लागणारं ही सारी सारी विचारांची वादळं डोक्यात घोंगावत असतात....

        २६ मे ला १२ विचा result लागला आणि आज मी आणि माझा मुलगा ज्यावेळी या टप्प्यावर उभे आहोत त्या वेळी या गोष्टी, ही संक्रमणे मला प्रकर्षाने जाणवतं आहेत.... ही संक्रमणे त्याच्या कल्याणासाठीच आहेत हे ही कळतंय आणि तो ही हे सगळं यशस्वीपणे निभावून नेईल ही खात्री पण आहे तरीही मन उगाचच कातर होते आहे... त्याच्या इतकेच सगळे घरदारच या संक्रमणाच्या चाहुलीने भरून आलंय... जूनच्या पावसाळी संक्रमणाच्या वेळी आकाश जसे गच्च दाटून येते तसेच काहीसे... हे दाटून आलेलं आकाश ज्यावेळी बरसून जाईल त्यावेळी हे संक्रमण सारे विश्व नव्या हिरवाईने समृद्ध आणि आल्हाददायक, मनाला मोहवणारं, बाप्पाच्या आशीर्वादाने नव्या टप्प्याचं सीमोल्लंघन ठरेल यात शंकाच नाही....



विद्या श्रीकांत भट

No comments:

Post a Comment