Monday, June 25, 2018

आठवणीतला पहिला पाऊस..


           मे महिन्याची सुट्टी म्हंटलं की सालाबाद प्रमाणे आमची रवानगी गावी दिवेआगरला... कोकण म्हणजे आंबे, चिंच, फणस, भरपूर मस्ती आणि भयंकर उकाडा.  घामाच्या धारा सुकून त्याच रूपांतर घामोळारूपी बिंदूत होत असे.
         १३ जून पर्यंत शाळा सुरु होत नसे आणि पहिला पाऊस पाहिल्याशिवाय आमचे गाव सुटत नसे. पाऊस हल्ली जसा उशिरा येतो ना तस आधी नव्हतं. मृगाचा पाऊस जुनलाच येत असे. भात शेतीचे रापण (भाजणी) झालेली असायची. शेती मधे जीवाला झेपेल इतकी आणि आवडेल इतकी मदत केली जात असे. अशातच ढग दाटुन येत. बघता बघता कृष्णरूपी आकाश विट्ठल बनत असे, सोसाटयाचा वारा सुटे, वातावरण ढवळून निघे आणि त्या पहिल्या मेघधारा बरसत..
        आम्ही सगळी भावंडे आणि मित्र पद्धतशीर शर्ट भिरकावून वगैरे उडया मारत भिजत असु. तो देखील अविरत बरसे आम्हा चातकांची तहान पूर्ण होईपर्यंत. आमची मस्ती मर्यादा ओलांडत नाही ह्यांचे भान आजी ठेवत असे.
       शेणाने सारवलेले सपाट अंगण एखादी काच फुटावी तसे चक्काचुर होत असे. ते टपोरे थेंब अंगाला लागत पण जमिनीमध्ये मिसळण्याआधी असीम सुख देवू जात. त्यातून पसरलेला सुगंध त्याची सर ह्या जगती नाही. पहिला पाऊस तिथे अनुभवला आणि त्यापुढे दरवर्षी आवडला.
       अभियांत्रिकीच्या डिप्लोमा चे नवीन वर्ष जुलैच्यादरम्यान सुरु होत असे, त्यामुळे जूनमधे सुट्टी. ती सुट्टी रीतसर मामाच्या गावी. जून मध्ये इतरांच्या शाळा चालू असल्याने मी एकटाच. मामी सख्या मुलाप्रमाणे जीव लावत असे त्यामुळे मुरुड म्हटले की माझी चंगळच.
     मुरुडला समुद्र किनारी सुरु वृक्षाची उंचच उंच झाड़े आहेत. आता ती संख्या रोडावली आहे पण तेव्हा खुप घनदाट झाडांची गर्दी  होती.
    नाक्यावर ताशी  ५० पैश्याप्रमाणे सायकली भाडयाने मिळत . तिच्यावर टांग मारली की त्या सुरुच्या झाडाखाली जावून मस्त - तास घालवत असे. एकांति, मी आणि समुद्र आणि त्या लाटांचा आवाज... अशातच सोसाटयाचा वारा, पुन्हा ओळखीचे काळे ढग, पुन्हा पहिला पाऊस येत असे.... किनाऱ्याच्या रेतीमधे पाय रोवत रोवत दूसरे टोक गाठायचे आणि तसेच परत यायचे... अंग आणि मन दोन्ही प्रसन्न... चिंब भिजून जावून पाऊस शांत होत नाही तोपर्यंत घरी नाही निघायचे.
      अभियांत्रिकीच्या पुढच्या खडतर प्रवासाची चाहुल लागत असताना ….पावसाची पहिली भेट मन शांत करीत असे.…नवतारुण्याचा उधळलेला पहिला पाऊस...
     इंजिनीरिंग पदवी कोर्स नागपुरला, वार्षिक पॅटर्न . परीक्षा में मध्ये  सूरु होत असे ती महिनाभर चाले. त्यामुळे विदर्भाचा नही मी भरपूर सोसलय. भयंकर उकाडा आणि शारीरिक होरपळ ह्याचा खुप जवळून अनुभव घेतलाय.
     त्या रणरणत्या उन्हात देखील आमचे क्रिकेट चाले, परीक्षा संपलेली असे आणि नही... मग पावसाची चाहुल... नागपुरचा पाऊस म्हणजे संततधार आणि मूसळधार... दीपक क्रिपलानी (DK) आणि त्याची बजाज चेतक म्हणजे आमची जीवनवाहिनी. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून आम्ही कधी ट्रिपल सीट तर कधी सर्कस करुन चौघे एकत्र फिरत भिजत असु. काटोल रोडच्या ज्या हाईवेवर मृगजळ दिसत असे तिथेच रस्ता आरसपानी दिसे...फक्त पहिल्या पावसानेच.
      मग भिजतच सदर (स्थानिक नाका) इथे सरदारजींच्या धाब्यावर जाऊन चिकन आणि मटनवर यथेच्छ ताव मारला जाई. ती सौंधिसी मिट्टीकी खुशबू आणि धाब्यावरचे तंदूर म्हणजे सोने पे सुहागा….पहिला पाऊस असाही....    
       पहिली स्थायी नोकरी आणि स्थायी छोकरी. आयुष्याची सकाळ संपुन रखरख चालू होणारच होती आणि पहिल्या पावसाप्रमाणे येऊन श्वेता भेटली. मग सौमित्रच्या गारवा आणि सांजगारवाच्या कविता समजू लागल्या आणि आवडू लागल्या. पहिल्या पावसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. पावसाचे थेंब आता रोमांचित करू लागले.
     पावसाची चाहुल लागताच बैंडस्टैंडला खड़कावरती विसावून हाती घेतलेला तिचा हात... पहिल्या पावसाची ओढ़ कैक वर्षात इतकी प्रखरपणे जाणवली नव्हती. भावी आयुष्याची सुरेख स्वप्ने एकत्र बसून त्या पावसात भिजत सजवली. हजारो संकट रूपी प्रखर किरणांसाठी तिचे लाखो स्माइल्स आणि प्रेम... बैंडस्टैंडच्या वादळी पावसाला देखील आम्ही एकत्र खंबिरपणे सामोरे गेलो. अद्भुतरम्य पाऊस....
     डॉक्टर म्हणाले जूनपर्यंत बाळ जन्मेल. पण साराने २३ मेला आम्हाला सुखद धक्का देत ह्या जगती आगमन केले. ऑफशोअर नोकरीमुळे कुटुंबातील सहवासाचा बराचसा काळ मी गमावला होता. त्याची कसर भरून काढ़ावी अस ठरवले आणि दिला राजीनामा. आता फक्त आम्ही तिघे...
      नवीन घेतलेला आबोदाना आणि त्याची गॅलरी . तिथे बसून गप्पाटप्पा साजऱ्या व्हाव्या म्हणून हिरवागार कडप्पा लावून घेतला..
      त्याच गॅलरी साराची टोपडी आणि इतर कपड़े वाळत घातलेले... टॉपफ्लोअ असल्यामुळे उन जरा जास्तच जाणवत असे.  आणी अशातच पहिला पाऊस आला.... जूनला नुसता आलाच नाही तर बरसलाच... धोधो.. त्या गॅलरीमधे १५ दिवसाच्या साराला कुशीत घेऊन तिला दाखवलेला पहिला पाऊस. पावसाच्या तुषाराने हलके भिजलेली सारा....अविस्मरणीय पहिला पाऊस..
     गेल्या वर्षा पासून पहिला पाऊस दिसतो फक्त, कधी फेसबुकवर तर कधी व्हाट्सअँपवर. आखाती देशात नाही म्हणायला पाऊस येतो पण त्यात आपलेपण नाही जाणवले, तो दिसतो पण भेटत नाही बरसत नाही....
     आता फक्त आठवणीचे ढग जमा होतात...विचारांच्या विजा चमकतात आणि धारा डोळ्यातुन वाहतात

हा पाहा आलाच पहिला पाऊस..

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा

भिजा मनसोक्त...


 

शैलेश मालुसरे
 

No comments:

Post a Comment