Wednesday, November 18, 2020

माझी दिवाळी----------डॉ. पल्लवी प्रसाद बारटके

 

 

माझी दिवाळी

 

स्वर्णिम प्रकाश घेवून येणारी तेजस्वी दिवाळी. आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाईनी वातावरण प्रकाशमय करणारी दिवाळी.

मंडळी, बाह्य जगात केलेली रोषणाई तर आपल्या नजरेस पडतेच, परंतु मनाची रोषणाईसुद्धा तितकीच महत्त्वाची असते, नाही का!

'अलक'च्या माध्यमातून मीही मला भावलेली दिवाळी साजरी करत आहे.

अलक १ -

आज अनघाचा वाढदिवस आहे. शाळेतून घरी जाताना तिचं फेवरेट गिफ्ट घ्यायचंय...

 "बाई आता विनायक येणार नाही शाळेला" -दिनू..

"काय !"-शाळेतला हुशार आणि तितकाच मेहनती विनायक डोळ्यांसमोर आला- "काय झालं?" दिनू- "त्याचे आई-बाबा त्या नवीन कॉम्प्लेक्सच्या बांधकामावर मजुरी करायचे. आता ते काम रखडलंय ना, त्यामुळे फी नाही भरू शकत तो शाळेची."

"Oh!", मन खूप नाराज झालं.

घरी आल्यावर माझा उदास चेहरा पाहून अनघा मला येऊन बिलगली. "काय झालं मम्मा? इतकी गप्प का आहेस?"

तिला कितपत कळेल हे माहीत नसूनही विनायकची परिस्थिती तिला सांगितली.

ती काहीही न बोलता आत निघून गेली आणि थोड्या वेळाने येऊन तिने माझ्या हातावर काही तरी ठेवलं. पाहते तर ती तिची छोटी मण्यांची पर्स होती. "मम्मा, आपल्या आभा ला दिवाळी गिफ्ट घेण्यासाठी मी हे जमवले होते. यातून तू त्या विनायक दादाची शाळेची फी भर".

"अगं पण",

तितक्यात आभा धावत आली अणि म्हणाली, "चालेल मला मम्मा, ताईनं सांगितलंय मला की मी आत्ता हट्ट नाही केला, तर देव बाप्पा मला next time खूप मोठं गिफ्ट देईल."

त्या तीन वर्षाच्या चिमुरडीचे ते बोल आणि तिच्या नऊ वर्षाच्या ताईचा समंजसपणा मला दिवाळीच्या रोषणाईपेक्षा भारी वाटला.

माझं घर दिवाळीपूर्वीच प्रकाशित झालं होतं.

 

अलक २ -

केरवारा करून शरीफ लादी पुसत होता आणि माझी फराळाची लगबग सुरू होती. दिवाळी अगदी तोंडावर आलेली. लाडू वळत वळत आमच्या गप्पा चालू होत्या. तो त्याच्या बांगलादेशातल्या घरच्या गोष्टी सांगत होता. इकडे परदेशात येऊन सहा वर्ष झाली. पैशांची जमवाजमव करण्यात इतका अडकला की गेली सहा वर्ष घरच्यांना भेटू शकला नव्हता. तितक्‍यातच त्याच्या आईचा फोन आला. आईने विचारले, "कसा आहेस बाबा? नीट जेवतोस ना ?".

तर, "हो,काही काळजी करू नकोस, चांगले चालू आहे माझे" असे म्हणत तिलाच औषधपाणी वेळच्या वेळेस घे, माझी काळजी करू नकोस असे सांगत होता. आईच्या काळजीची कल्पना होती त्याला. आपलं पोर दूरदेशी असल्यावर आईच्या जीवाची होणारी घालमेल, तो जाणून होता. म्हणूनच उसन्या अवसानाने तिला निश्चिंत रहायला सांगत होता.  मी माझ्या विचारांच्या तंद्रीत असतानाच, "मॅडमजी, काम हो गया और कुछ करना है क्या?"या त्याच्या प्रश्नाने भानावर आले. "और? हा, है ना. रुको", असे म्हणत वळलेले दोन लाडू त्याच्या पुढ्यात ठेवले.त्याचे डोळे चमकले. लाडू खाल्ल्यावर, "माँ की याद दिला दी आपने" असे म्हणताना त्याचे डोळे बरेच काही बोलुन गेले.

 "अग मम्मा पण अजून नैवेद्य नव्हता दाखवला आपण", इति अनघा.

तिला म्हणाले,"देव तरी कुठे वेगळा असतो अग". ती समजून हसली आणि माझे मन दिवाळीच्या खऱ्या प्रकाशात न्हाऊन निघाले.

 

अलक ३ -

मी कॅन्सर रिसर्च सेंटर ला असताना एक last stage चे पेशंट होते. मोठे कर्तबगार जमीनदार, गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. पण आताच्या ह्या प्रचंड वेदनादायी स्टेजमध्ये तोळामासा झालेले, अगदी मेटाकुटीला आलेले. औषध गोळ्यांनी फक्त तात्पुरता आराम पडत होता. घरचे खूप अस्वस्थ झाले होते. परिस्थितीची कल्पना होती सर्वांना. भेटायला येणारे रडके चेहरे, निराशाजनक उदासीन वातावरण सगळे.

पण मी जेव्हा जेव्हा राऊंड ला जायचे तेव्हा तेव्हा हे काका मोठ्या हौशीने गप्पा मारायचे माझ्याबरोबर. मोठ्या उत्साहाने त्यांच्या गावाच्या विकासासाठीच्या मनातल्या कल्पना सांगायचे. एकदा त्यांच्या पत्नी मला म्हणाल्या, "डाग्दर, खरं सांगू का, तुमी राऊंडला कधी येनार, याची रावसाहेब वाटच बगत असत्यात बगा. तुमी जसं आपुलकीने बोलतायसा ना, त्याने त्यांस्नी लई आराम पडतोय बगा."

रावसाहेब-"अवं, आजकालचे डाग्दर पेशंटकडं निस्ते पेशंट म्हनूनशान बगत्यात. पन तुमी मानुसकीच्या नात्याने बोलतायसा, वेळ काढतायसा, यातच निम्मा आजार बरा झाल्यासारका वाटतोय बगा. सुखी राव्हा."

त्या दोघांच्या या समाधानाच्या आशीर्वादाने माझ्या मनातला आकाशकंदील लख्ख प्रकाशला.

मंडळी दिवाळी हा निव्वळ एक वार्षिक सण नाही तर आपल्या आयुष्यातील अशा छोट्या मोठ्या घटनांनी प्रकाशित झालेला, उजळून निघालेला क्षण आहे. आणि अशा असंख्य क्षणांसाठी आपल्यालाच प्रकाशरूप व्हायचे आहे.

चला तर मग दिवाळीचे खरे स्वरूप जाणून घेऊया. ज्ञानाचा, सहिष्णुतेचा, कृतज्ञतेचा, विवेकाचा प्रकाश पसरवूया.

सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा .

 

 

डॉ. पल्लवी प्रसाद बारटके, अबुधाबी

 

No comments:

Post a Comment