Tuesday, September 29, 2020

मन कोविड ----प्रशांत कुलकर्णी

 

मन कोविड                    

 

          संध्याकाळचे सहा वाजत आले होते. नंदिनी अबूधाबीतील आपल्या घराच्या बाल्कनी मध्ये उभी होती. गेल्याच आठवड्यात इथला रमजान सुरु झाला होता. आणखीन एका तासाने त्यांचा आजचा रोझा संपणार होता. इफ्तार ची वेळ जवळ येत चालली  होती.समोरच्या रस्त्यावर तशी सामसूम होती .अशी सामसूम ही यावेळेस नेहमीचीच . पण  ही  सामसूम मागच्या अनेक वर्षाच्या रमजान पेक्षा वेगळी होती. किती वर्ष झाली आपण इकडे हे रमजान अनुभवतोय? २०?२५? भारतात असताना रमजान कधी यायचा अन कधी जायचा ते समजायचे देखील नाही . झाला हे तेव्हाच समजायचे जेव्हा ऑफिस ला ईद ची सुट्टी मिळायची . पण अबूधाबीत आल्यावर मात्र ती रमजान कधी येतोय याची  वाट पाहायची .

           इथला रमजान म्हणजे समीरच्या ऑफिसला महिनाभर चक्क अर्धा दिवस सुट्टी ! मुलांच्या शाळा पण अर्धा दिवस. सकाळी लवकर उठायची घाई नाही . डब्बा नाही. दिवसभर घरात सर्व निवांतपणे चालायचे . दुपारी सर्व घरी आले कि पोटभर जेवण आणि मग तास दोन तासाची वामकुक्षी ठरलेली. तशी ती दुपारची झोपायची नाही. पण या रमजान मुळे सवय लागायची. मग पाचच्या सुमारास आळस झटकून उठायचे व कॉर्निश ला वॉक ला जायचे .ही  वेळ तिला अत्यंत आवडायची .घराघरात सर्वजण इफ्तारच्या तयारीत गुंतलेले . रस्ते देखील ओस पडलेले . रस्त्यावरील तुरळक गाड्या इफ्तारची वेळ गाठायची म्हणून इकडे तिकडे पळत असायच्या नुसत्या . अशावेळी  कॉर्निश ला जाऊन फिरायला तिला फार आवडायचे . ऐसपैस पसरलेली मोठ मोठी हिरवीगार  गार्डन  व समोरचा  विस्तीर्ण समुद्र किनारा.माणसांची वर्दळ नाही. खरा निवांतपणा इथे तिला मिळायचा.

         पण या वेळेचा रमजान अगदी वेगळा आहे नाही ?तसे गेले महिना दिड महिना हे असेच चाललंय . प्रथम रात्री आठ ते सकाळी सहा पर्यंत लॉक डाऊन जाहीर झालेलं .आता रमजान मुळे रात्री दहा ते सकाळी सहा एवढंच . दिवसभर तशी सुपरमार्केट्स,ग्रोसरी शॉप ,भाज्यांची दुकानं उघडी असतात . काही ऑफिसेस ५०:५० सुरु आहेत तर काहींनी ऑनलाईन वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे . तरीपण नेहमीचे रुटीन कुठंतरी हरवलंय .ऑफिस झाले की  सर्वजण घरात येऊन बसतात . मग दुसऱ्या दिवशीच ऑफिस ला जायला बाहेर पडायचे . घरात लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू ऑफिसमधून येतानाच घरी घेऊन यायच्या. आल्यावर चपला,बूट बाहेर काढायचे. भाज्या धुवायला मोठ्या पातेल्यात टाकायच्या ,त्यात सोडा,मीठ,व्हिनेगर जे असेल ते घालायचे . मग त्या बाहेर डायनिंग टेबल वर मोठा कापड वा पेपर वर निथळू द्यायच्या. किती काम वाढलंय ना ?किती परिस्थिती बदललीय गेल्या महिनाभरात . अगदी फेब्रुवारी पर्यंत आपल्या गुरुवार शुक्रवारच्या च्या वीकएंड पार्ट्या सुरु होत्या . २-४ जवळच्या फॅमिली फ्रेंड्स ना एकमेकांकडे बोलावणं हा इकडचा ठरलेला प्रोग्राम.  दुसरे आहे काय आणखीन इथे मन रमवायला. मंडळ आणि प्रत्येकाचे ठरलेले ग्रुपस. सकाळच्या वेळात मुले शाळेत आणि नवरोजी ऑफिस ला गेले कि मैत्रिणी बरोबरच्या निवांत गप्पा या वेळ जाण्यासाठी इथे लँडलाईन कॉल फुकट असल्याने जास्तच रंगायच्या. (समीर त्याला गॉसिपिंग म्हणतो.म्हणू देत.) गेल्याच  महिन्यात तर आनंद ची वाढदिवसाची पार्टी झाली होती. किती मजा आली होती. सर्व मित्र मैत्रिणी बरोबर हसणे खिदळणे नाच, गाणे, गेम्स ,खाणे ,पिणे नुसती धमाल .परदेशातील आपल्या वास्तव्यात घरच्यांच्या आठवणी दूर सारत नवीन नाती,नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्याचे हे क्षण .खरंच गेले कित्येक वर्ष आपण या नात्यात रमलो होतो.

अन अचानक हे असे काय घडले की  नात्यांच्या मैत्रीची ही  उब आता हवीहवीशी वाटते  आहे. परत एकदा सर्वांना भेटावेसे वाटते आहे . एखाद्या तुरुंगात अडकल्यासारखी आपली सर्वांची अवस्था झाली आहे.  कोणाकडे जाणं नाही ,कोणाला घरी बोलावणं झालं  नाही . कंटाळा आला कि दूरवर लॉन्गड्राइव्ह ला जाणं नाही . मंडळात एखाद्या कार्यक्रमात एकमेकांना उत्साहाने भेटणे नाही की  स्टेजवरील कलाकाराला टाळ्या वाजवून दाद देणे नाही .किती दिवसात पोट धरून हसलो देखील नाही.

          कधी संपणार हे सर्व ?नंदिनी विचारांच्या जंगलात खोलवर गुंतत चालली होती. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावर सुपर मार्केट मधून काही सामान खरेदी करून निघालेला एक माणूस अचानक धपकन फुटपाथवर पडला. त्याच्या हातातील पिशवीतले सामान इतस्त्तः विखुरले गेले .आजूबाजूच्यांची धावपळ झाली ती त्याला सावरण्यासाठी नाही तर त्याच्या पासून दूर पळण्यासाठी . समोरच्या दुकानातून कोणीतरी पोलिसांना फोन केला.काही मिनिटातच वाव वाव करत २-४ पोलिसांच्या गाड्या व ऍम्ब्युलन्स तिथे येऊन दाखल झाल्या. निप्तेष्ट  पडलेलं ते शरीर. ऍम्ब्युलन्स मधून वैद्यकीय कर्मचारी सम्पूर्ण पि. पी. ई.किट घालून  पूर्ण तयारीनिशी त्याला चेक करण्यासाठी खाली उतरला. त्याला CPR केले पण काहीच रिस्पॉन्स मिळत नाही हे बघितल्यावर त्याच्या बॉडी वर पांढरी चादर टाकून परत ऍम्ब्युलन्स मध्ये जाऊन बसला आणि लॅपटॉप वर इंसिडेन्ट रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. कोण असेल तो माणूस? नंदिनी च्या मनात विचार आला. नक्की काय झाले असेल त्याला?कशाने गेला असेल तो?कोणी जवळचे असेल का त्याचे इथे?का एकटाच राहत असेल बिचारा?आता पुढे काय ? एक ना अनेक शंकांनी तिच्या मनात घर केले .

          तो पर्यंत पोलिसांनी त्याच्या खिशातील आयडेंटिटी कार्ड वरून त्याच्या ओळखीच्यांना कळवले होते . ५-१० मिनिटातच चार पाच बायका धावतपळत तिथे पोहोचल्या. लांबूनच त्यांना ती बॉडी दाखवण्यात आली . त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या ते बघूनच नंदिनीचे डोळे पाण्यानी डबडबले. काय परिस्थिती उद्भवली आहे आज ? त्याची पत्नी देखील त्याच्याजवळ जाऊ शकत नाही.

थोड्याच वेळात ऍम्ब्युलन्स ती बॉडी घेऊन गेली . तिथे जमलेले त्याचे मित्रपरिवार पोलिसांच्या मागे आपापल्या गाड्या घेऊन निघाले. काय काय करावे लागेल त्यांना आता?कुठल्या तरी हॉस्पिटल ला घेऊन जातील. वेळ मिळाला कि डॉक्टर पोस्ट मार्टेम करतील. मग?कोरोना आढळला तर बॉडी सुतराम कोण्याच्या दृष्टीस पडण्याची शक्यता नाही . परस्पर च ते घेऊन जातील.कुठं? तिथे जमलेल्या मित्रांवरून आणि  बायकांवरून तो हिंदू वाटत होता . मग त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे होतील?दहन कि दफन?परवाच नाही का शहराच्या बाहेरील लेबर कॅम्प मधील एक हिंदू कामगार कोरोना ने गेला तर पोलिसांनी परस्पर त्याचे दफन  करूनही  टाकले . इथल्या सरकारची आज्ञाच आहे म्हणे तशी.मग हा माणूस कोरोनाचा नाही निघाला तर ? भारतात तरी कसे घेऊन जाणार ?लॉक डाउन मुळे विमानसेवा पण बंद आहे ? एक ना अनेक प्रश्नांनी नंदिनीच्या मनात विचारांचे काहूर उठले. बाल्कनी चे दार बंद करीत सुन्न होऊन ती हॉल मध्ये सोफयावर येऊन बसली. डबडबलेल्या डोळ्यांतुन येणाऱ्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली. कोणाचा कोण ?पण आपल्याला का एवढे वाईट वाटते आहे? माणूस म्हणून तर निश्चितच . शिवाय एक भारतीय म्हणून किंवा कदाचित एक हिंदू म्हणूनही जास्त वाईट वाटत असेल. तिथेच जर एखादा इतर देशाचा नागरिक असता तर आपल्याला एवढे वाईट वाटले असते का?कदाचित हळहळ व्यक्त करीत आपण ती घटना सोडूनही दिली असती.मग आत्ताच हि घटना आपल्या मनात का घर करून राहिली आहे. नंदिनीने विचार केला की हि वेळ आज त्या समोरच्या अनोळखी फॅमिली वर आली आहे. उद्या आपल्या ओळखीच्या कोणावरही येऊ शकते.कोणाला कुठल्या प्रसंगातून जावे लागेल हे कसे सांगता येणार?आज अशी काही परिस्थिती उदभवेल याचा विचार कोणाच्या ध्यानीमनी पण नव्हता. पण आज माणसांचे एकमेकांकडे बघायचे संदर्भच बदलले आहेत . एकमेकांना आधार देत एकमेका साहाय्य करू,कठीण प्रसंगी पाठीशी उभे राहू असे म्हणणारे हात आज हातात  घेतानाही थरकाप होतोय.किती दिवसात मुलांच्या केसातून प्रेमाने हात फिरवला नाही कि  चेहऱ्यावर मायेचा स्पर्श केला नाही. आई म्हणून मुलाने घट्ट मिठी मारली नाही कि लाडाने त्यांच्या गालाची पप्पी घेतली नाही . स्पर्शच टाळायचा म्हणे या जीवघेण्या रोगात?स्पर्शच करायचा नाही तर जगायचे कसे?मग तुमचे प्रेम व्यक्त तरी कसे करायचे? नुसते लांबून डोळे भरून पाहून,शब्दातून ते व्यक्त होते का ?त्याला कृतीची जोड नको?ना ना विचार आणि शंकांनी नंदिनीच्या डोक्याला मुंग्या आल्या.

           तिला अचानक तिच्या आई वडिलांची आठवण आली . दोघेजण ऐंशीच्या घरात . मुलुंडला एकटेच राहतात. तसे सोसायटीची माणसे आहेत म्हणा मदत करायला. काय हवे नको ते आणून

देतात. पण किती दिवस?खाणे पिणे भाज्या या मिळत राहतीलही. पण अचानक एखादी इमर्जन्सी आली तर?कुठे हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे लागले तर? आपण एवढ्या लांब .परत जाऊही  शकत नाही . कधी भेटणार आपण त्यांना?जेव्हा केव्हा जाऊ  तेव्हा देखील लगेच त्यांना थोडी भेटता येणार? तिकडचे नियम तर सारखे बदलत असतात. आता पहिले पंधरा दिवस क्वारंटाईन ,त्यात तुमचे लॅब टेस्टिंग ! त्यानंतर ठरणार तुम्ही त्यांना भेटायचे का नाही ते?तोपर्यंत लॉक डाउन उठले तर ठीक आहे.नाहीतर आपल्याला जायला वाहन तरी मिळेल का?आणि एवढे सर्व करून त्यांच्या सोसायटीत आपल्याला प्रवेश तरी देतील का?परवाच नेहा सांगत होती कि तिचे सासू सासरे लॉक डाउन च्य आधल्या दिवशी  दुबई हून पुण्याला परत गेले तर सोसायटीची लोकं कसे संशयाने बघत होते त्यांच्या कडे. समोर आले तर दूर पळायचे . वाळीत टाकल्या सारखे  वागत होते.त्यात त्यांचीही काय चूक आहे म्हणा ?परिस्थितीच अशी उद्भवली आहे कि माणूस माणसाकडे संशयाने बघायला लागला आहे .अरे देवा ! कुठल्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाही आहेत .तसा  तिचा रोजच्या एक फोन असतोच  म्हणा. रोजच्या रोज त्याच त्याच सूचना. बाबा पण वैतागतात कधी कधी .त्यांना या वयात कधी कधी लक्षात राहत नाही.पण काय करणार? काळजी वाटते आणि सांगितल्या शिवाय राहवत पण नाही . त्यांच्या आठवणीने नंदिनी चा जीव व्याकुळ झाला. तिने फोन उचलला आणि विडिओ कॉल लावला.पलीकडे बाबांचा उत्साही स्वर ऐकू आला .आई तर नुसती बडबडतच होती .कधी कधी दोघे एकदम बोलायला लागतात.त्यामुळे नक्की काय ते समजत नाही .म्हणून एकाला बोलायला  सांगितले तर आई नंतर तेच परत रिपीट करते . म्हणून आईला ती रागवायची. पण आज तिला त्यांचे दोघांचे बोलणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत होते. आईचे झाले कि बाबा पुन्हा आई !त्या दोघांच्या बोलण्यात आशावाद,आनंद,उत्साह पाहून नंदिनीला थोड्यावेळापूर्वी मनाला आलेली मरगळ,उदासीनता काही प्रमाणात दूर झाली.

              फोन संपल्यावर नंदिनी उठली. संध्याकाळ ची वेळ होत आली होती. कोपऱ्यातील मस्जिद मधून इफ्तार ची अजान ऐकायला येत होती . दिवसभराचा रोझा करून तो सोडायची वेळ आली होती.आज फक्त ही अजान ऐकून घरच्या घरी सर्व उपवास सोडतील. इतर वेळीस हा आवाज ऐकला कि थवेच्या थवे मस्जिदच्या दिशेने धावत सुटत. पण आज मस्जिद मध्ये मुल्ला शिवाय इतर  कोणालाही प्रवेशाला बंदी आहे. लोकं घरातच राहून त्याचे पालन करीत आहे . यावेळेसची ईद देखील त्यांच्या  चंद्रदर्शनावर आहे .म्हणजे आपल्या चंद्रोदयासारखेच ना ? लहानपणी आई पण अशीच संकष्टी,अंगारकी चतुर्थी ला तिला बाल्कनीत चंद्र बघायला पाठवायची. मगच दिवसभराचा उपास सुटायचा.किती साम्य आहे ना !धर्म वेगळे असले म्हणून काय झाले?मानवाची देवाची उपासना करण्याची पद्धत फक्त वेगळी असते . देवावर श्रद्धा,विश्वास असणाऱ्याला तो कधीच संकटात एकटा सोडणार नाही . मग तो कुठल्याही धर्माचा असो .

नंदिनी  हातपाय धुवून देवघरा समोर येऊन उभी राहिली . देवापुढे दिवा लावला. उदबत्तीघरात उदबत्ती लावून शांतपणे हात जोडून देवापुढे उभी राहिली. क्षणार्धात उदबत्तीचा सुवास घरात सर्वत्र दरवळला. निरांजनाच्या मंद प्रकाशात नंदिनीचा चेहरा उजळून निघाला . तिच्या चेहऱ्यावर शांत,संयमी भाव प्रकटत होते .हळूहळू डोक्यातील विचारांचे काहूर कमी होत होते . मन शांत होत होते. थोड्याच वेळात त्या देवघरात नंदिनीचा  धीरगंभीर रामरक्षेचा आवाज घुमला.मनाची चलबिचल दूर व्हायला लागली . थोड्या वेळापूर्वी हळवे झालेले तिचे मन हळूहळू कणखर बनत होते.तिच्या

चेहऱ्यावर एक दृढनिश्चय प्रकट होत होता. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा,कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचा.आता त्या देवघरात फक्त नंदिनी आणि तिचे रामरक्षेचे सूर ऐकायला येत होते.बाकी सर्व शांत होते .

प्रशांत कुलकर्णी

अबुधाबी

No comments:

Post a Comment