Tuesday, September 29, 2020

घट्ट मुळे, ताठ मान----रुपाली मावजो किर्तनी

 

घट्ट मुळे, ताठ मान

 

मला नेहमीच वाटतं, मी

झाड असायला हवे होते

मातीत घट्ट मुळे धरून

ताठ उभी राहिले असते

 

फांदीवर माझ्या खेळवीत पाने

फ़ुले फळे डोलवली असती

उन्हात कितीही तापले तरी

आसपास शितल ठेवली असती

 

निवारा देण्या साठी, मी

कायम  तयार राहीले असते

प्रवाश्यांना आराम द्यायला

सावली पसारून बसले असते

 

अंगावर वारं घेतले तरीही

पाने सळसळून हंसले असते

मुळात पडलेल्या चिखलालाही

खत समजून बहरले असते

 

वादळाची चाहूल लागताच 

मुळे खुपसून राहिले असते

वाऱ्याला  गुंतवून माझ्यात, मी

वाऱ्या सोबत डोलले असते

 

फुलायचे फळायचे थांबले म्हणून

उपयोगी पडायचे थांबले नसते

पाने सगळी झडली तरीही

ताठ मान धरून उभी असते

 

होईल तसे होईल तेवढे 

जमेल त्याला दिले असते

खरंच नेहमी वाटते, मी

झाड असायला हवे होते

 

करता करता विचार असाच

मनांत माझ्या येऊन जातो

झाले तर नाही ना झाड मी

पुन्हा पुन्हा विचार येतो

 

खरी इच्छा असली तर म्हणे

वाटते तसेच होऊन जाते

घट्ट मुळं खुपसून तेव्हा

मीच झाड आसल्यासारखी 

ताठ मानेने मी उभी राहते

ताठ मानेने मी उभी राहते

 

                                                          -रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment