Tuesday, September 29, 2020

जशी मला भावली----श्री मंदार आपटे

 

ओढ - संजीवनी बोकील

 


जवळ जवळ २४०० वर्षांपूर्वी ग्रीक तत्ववेत्ता ऍरिस्टोटल सुखाबद्दल म्हणतो "सुख हीच एक गोष्ट अशी आहे जी मनुष्य स्वतः साठी इच्छितो. याचे संपत्ती, सन्मान, आरोग्य किंवा मैत्री यासारखे नाही.” या सुखाची ओढ मनुष्याला कायमच असते. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत माणूस सुख शोधात असतो. सुखाचा मोह असा असतो की त्याला परतवून लावणे अतिशय कठीण असते. संजीवनी बोकील यांची ही समर्पक कविता मी याच कारणासाठी निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.

 

ओढ - संजीवनी बोकील

दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर...

कवयत्री संजीवनी बोकील यांनी या छोट्या पण मार्मिक कवितेत सुखाला गोजिरवाण्या बाळाची उपमा दिली आहे. हे गोजिरवाणे बाळ आपले नाही, पोरके आहे, रडत आहे, अनौरस आहे. पण तरीही ते गोजिरवाणे आहे. कावयत्रीतील आईला ते साद घालत आहे. ओढ लावत आहे.

या गोजिरवाण्या बाळाकडे (सुखाकडे) पाहताना कवयित्रींच्या द्विधा मनस्थिती झाली आहे. उचलून घ्यावे की घेऊ नये अशी अनिश्चितता वाटत आहे. ते आपले नसल्याचे भय आहे. पण त्याच्याकडे पाठही फिरवत येत नाही. एकीकडे सुख अनुभवायचा लोभ आहे तर दुसरीकडे ते सुख आपले नसल्याने ते टिकणार नाही याची भीती पण आहे.

मोह आणि वस्तुस्थिती या दोन्हीमध्ये आपण नेहमीच अडकलेले असतो. कॅच २२ परिस्थिती असते. पण हे सुख निरपेक्ष आहे. सुखाला हे माहिती नाही की ते कवयित्रीचे नाही. त्याला माहिती नाही की ते अनौरस आहे. ते निखळ आहे. ते समोर आलेल्या व्यक्तीला आनंद देते, ओढ लावते.

सुखाला कवयित्रीने दिलेली गोजिऱ्या बाळाची उपमा इतकी चपखल आहे की दुसऱ्या उपमेचा विचारच करू शकत नाही. ही उपमा हे या कवितेचे सौंदर्यही आहे आणि या कवितेच्या यशाची गुरुकिल्ली देखील आहे.

No comments:

Post a Comment