विश्व मराठी परिषदेने आयोजित
केलेल्या कोविड-१९ जागतिक कथा आणि कविता लेखन स्पर्धेमध्ये जगभरातील ३६ देशांमधून, अमेरिकेतील २१ राज्यांमधून आणि
महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यांमधून ४६७४ बांधव सहभागी झाले होते.
या सर्व स्पर्धकांमधून श्री.आनंद नेवगी यांच्या कवितेची
विशेष पारितोषिक नंबर ३ साठी निवड
झाली. त्यांचे मनोगत व कविता खालील पृष्ठावर सादर करीत आहोत .
आपल्या सर्वानाच माहिती आहे कि कोरोनाच्या
प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे .आखाती देशामध्ये राहणाऱ्या अनिवासी कामगारांचे तर खूपच हाल चालू आहेत .त्यातून काही कामगारांच्या नोकऱ्या
गेल्या आहेत आणि त्यांची
भारतात परतण्याची सोयही होत नाही आहे .रोजचा राहण्याचा भाडं आणि खाण्यापिण्याचा
खर्च कुठून करायचा हा भला मोठा प्रश्न
गेले ४-५ महिने अशा कामगारांसमोर उभा राहिला आहे.काही जण तर केवळ एकवेळचच जेवण
करून दिवस काढीत आहेत.या पार्श्वभूमीवर
अशाच एका कामगाराच्या मनातल्या दुःखद भावना मी माझ्या कवितेद्वारे व्यक्त करीत आहे .
(कविता १५ जून २०२० या दिवशी
लिहिली आहे.)
मला जाऊ द्या ना घरी ,माझे
वाजले इथे बारा
कोण्या एका दलालानं, आमिषं दर्शवली खोटी
वेड्यावानी भुलुन त्याला, चूक केली मोठी
वरीस पण नाही झालं, पै-पैका नाही झाला जमा
वाटलं होतं होईल भलं, हव्यासानं आलो इथं कामा
नाही भोळ्या भाबड्यांचं काम, पैशाचा खेळ सारा
मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले इथे बारा ll१ll
नोकरी गेली, पैसे संपले, काय करू कळंना
त्यात हे कोरोनाचं झंझट, डोक्याचा भुंगा जाईना
संस्था-मंडळवाले आले, दिली दोन पाकिटं, फोटो काढून गेले
संत्र्या मंत्र्यांशी म्हणे बोलले, फेसबुकवर व्हिडीओ अती गाजले
सहन होत नाही, कशा थांबवू अश्रूंच्या धारा
मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले इथे बारा ll२ll
गावाकडं काय सांगू, काही केल्या समजनां
निघायची चिन्हं तर अजिबातच दिसनां
होती ती तिकडची, शेती बागायतीच चांगली
कुठुन बुद्धी
सुचली, बुर्ज खलिफाची
स्वप्नं पाहीली
कॅडबरी परफ्यूम विना, आता जाऊ कसा मी दारा
मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले इथे बारा ll३ll
कानावर आलं, आर्मी नेव्हीची कितीतरी जहाजं येणार
आजारी गरोदर बायांना सुखरूप आधी नेणार
एम्बॅसी च्या दारात तिष्ठत उभं राहून, आता दुखू लागले
पाय
कुठं आहेत ती विमानं, आणि जहाजं पाण्यात बुडली की काय?
पुरे झाले आता देवा, तुझ्याच दारी मला दे थारा
मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले इथे बारा ll४ll
विमानाच्या भाड्यासाठी, कुठं भीक मागू कळेना
कधी गावी पोचेन, आशेचा किरण दिसेना
उपाशी माय माझी तिथं, घास नीट खाईना
काळजीनं माझ्या, म्हाताऱ्याचा डोळ्याला
डोळा काही लागना
लेकरांच्या आठवणीनं माझा, जीव झालाय कावरा बावरा
मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले इथे बारा ll५ll
कवी- आनंद नेवगी ,अबु धाबी
वरील कविता ऐकण्यासाठी व बघण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करावे:
प्रस्तावना - https://drive.google.com/file/d/1aUPkyr4dMtc4addOeXftwA7v-tq-psuQ/view?usp=sharing
कविता - https://drive.google.com/file/d/1LKfF2BdrEAyRP_q8Vp2hYLFZ0RJAyup8/view?usp=sharing
No comments:
Post a Comment