MMAD चा आठवणीतला रमदान
यावर्षीचा रमदान कधी आला आणि कधी संपला हे समजलेच नाही. पण अबुधाबीत एक काळ असा होता की आम्ही रमदान ची आतुरतेनं वाट बघत असू. अर्धा दिवस निवांत ऑफिस, मुलांच्या शाळांना पण अर्धा दिवस सुट्टी. कुठल्या गोष्टीची घाई नसे.
पण या बरोबरच प्रत्येक रमदान चे आकर्षण असे ते
आपल्या महाराष्ट्र मंडळा तर्फे घेतले जाणारे 'रमदान
गेम्स'.वर्षातून एकदा येणारा हा रमदान
चा महिना वर्षभराचा आनंद देऊन जायचा. या रमदान गेम्स ची सुरुवात मात्र मजेशीर आहे.
१९९१-९२ सालातील
गोष्ट आहे. मुकुंद चिपळूणकर मंडळाचे सचिव होते. (हेच ते मुकुंद ज्यांनी मंडळाची घटना लिहून काढली होती. त्यामुळे आम्ही
त्यांना मंडळाचे घटनाकार म्हणायचो) तर आता ते सचिव असताना त्यांच्या डोक्यात एक
कल्पना आली. रमदान च्या दिवसात एक महिना बहुतेक सर्व सभासदांना अर्धा दिवस सुट्टी
असतेच. घरी आल्यावर काय करायचे हा प्रश्न ज्याला त्याला होता. नुसते खायचे,
प्यायचे,
झोपायचे
असे त्रिसूत्री धोरण बरेच जण त्याआधी वर्षानुवर्षे निष्ठेने पार पाडत होते. बरं
त्याकाळी TV चॅनेल्स नव्हते,
इंटरनेट,मोबाईल
चा शोध तर कोसो दूर होता. अशा वेळी सभासदांना गुंतवून ठेवण्यासाठी आपण घरच्या घरी
काही बैठ्या खेळांच्या स्पर्धा ठेवल्या तर? मग
कमिटीतून एक एक गेम सुचवल्या गेले आणि त्यातून कॅरम, बुद्धिबळ,
रम्मी
या खेळांच्या स्पर्धा घेण्याचे ठरले. मग रितीप्रमाणे प्रत्येकाला फोन करण्यात आले,
सभासदांचा
याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. जवळपास २००-२५०
सभासदांची संख्या असलेल्या मंडळात तब्बल ७०-८०
एन्ट्री कॅरॅम ला आल्या. मग त्यात मेन्स सिंगल्स, वूमन
सिंगल्स, मिक्स डबल्स असे ड्रॉ पाडण्यात
आले. अनिल आणि प्रिया पाकळे यांच्या घरी ४-४
कॅरम बोर्डस लावण्यात आले (हे कॅरॅम बोर्ड पण सभासदांच्याच घरून आणण्यात आले)
भारतात असताना किती जण पूर्वी शाळा,कॉलेज,
सोसायटीमध्ये
कॅरॅम खेळत होतो हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यावर्षीचा सभासदांचा प्रतिसाद
बघून हा इव्हेंट त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक कमिटीच्या वार्षिक कॅलेंडर मध्ये
समाविष्ट झाला. सुदैवाने त्याकाळात रमदान हिवाळ्यात येत होता त्यामुळे वातावरण पण
आल्हाददायक असायचे. काही सभासद आपल्या वार्षिक सुट्ट्या रमदान गेम्स प्रमाणे
ऍडजस्ट करीत असत.
रमदान सुरू झाला रे झाला की लगेच Draw
पाडून
स्पर्धेला सुरुवात व्हायची. दुपारी ४ वाजल्या पासून matches
ना
सुरुवात व्हायची ते रात्री १० पर्यंत तो हॉल स्पर्धा खेळणाऱ्या आणि उत्साहाने
स्पर्धा बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या आरडा-ओरडा,
प्रोत्साहन देणारे याने गजबजलेला असे. या स्पर्धेची जबाबदारी घेतलेला कमिटी मेंबर
समोरच्या भिंतीवरील चार्टमध्ये
सभासदांच्या matches लावण्यात
आणि सभासदांना फोन करण्यात मग्न झालेला असायचा. (याचे आणखीन एक काम असायचे ते हे
की कॅरम खेळणाऱ्या सभासदाची नखे वाढलेली नाहीत ना हे एकदा चेक करायचे. कारण कॅरम
बोर्ड परत करताना त्यावर पडलेले ओरखडे बघून यजमानांचे टोमणे ऐकावे लागायचे.) मधेच
एखादा धावत जाऊन कॅरम ची पावडर संपली म्हणून खालच्या इराण्याकडे जाऊन ४-६
डब्बे घेऊन येत असे. कोपऱ्यात ठेवलेल्या डायनिंग टेबल वर चहा,
कॉफी,
दूध,
प्लास्टिक
ग्लासेस, बिस्किटं,
पाण्याची
सोय केलेली असायची. रोझा संपायच्या वेळी एखादा हौशी मेंबर धावत खाली जाऊन गरमागरम
भजी, सामोसे घेऊन यायचा . मग थोडा वेळ स्पर्धा
बाजूला ठेवून गप्पा गोष्टींचा फड रंगायचा. या निमित्ताने मंडळाच्या सभासदांची
एकमेकांशी चांगली ओळख व्हायची आणि नंतर समान धागे जुळले तर या ओळखीचे रूपांतर
पुढेमागे मैत्रीतही होत असे. रमदान चा पूर्ण महिना या स्पर्धा चालत. कधीकधी तर
फायनल स्पर्धा ईदच्या सुट्टीतही घेतली जाई. रथी महारथी ची फायनल बघायला देखील
गर्दी व्हायची. या धावपळीत रमदान कधी आला आणि गेला हे समजायचे देखील नाही.
एकीकडे कॅरम स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे
कोणाच्या तरी घरी रम्मी ची स्पर्धा गुरुवार-शुक्रवारी ठरलेली असे. मग तो शुक्रवार 'पत्तेवाल्यांचा'.
ज्याच्या
घरी हा डाव रंगे त्यांच्या बेडरूम,
ड्रॉइंग रूम, मध्ये चादरी,
चटया
टाकून बसायची व्यवस्था केली जायची. डाव लांबले तर दुपारचे जेवणही मागवले जायचे. पण
संध्याकाळ पर्यंत सर्व मंडळी ठाण मांडून बसत.
याबरोबरच बुद्धिबळाची स्पर्धा ही इथे वयाची अट
नसल्याने लहानथोरांच्या सहभागाने रंगे. नंतर टेबल टेनिस च्या स्पर्धाही घेतल्या
जाऊ लागल्या. अशा प्रकारच्या भरगच्च खेळांनी रमदान चा महिना कधी संपायचा हे कळायचे
देखील नाही. मग हेच स्पर्धक दरमहिन्याला खेळण्यासाठी भेटण्याचा वादा करत आणि नवीन
वर्षाच्या संकल्पा प्रमाणे हे वादेही नेहमीच्या रुटीन मध्ये विसरले जायचे. याची
आठवण व्हायची ती पुढील वर्षाच्या रमदान गेम्स ची घोषणा झाल्यावर आणि मग परत एकदा
मेंबर्स प्रॅक्टिस ला सुरुवात करायचे. हे रमदान गेम्स दरवर्षी नियमितपणे चालले होते.
मग हिवाळ्यात येणारा रमदान हा दरवर्षी पंधरा दिवस मागे येत येत जुलै-ऑगस्ट मध्ये
यायला लागला. तो सिझन इथल्या शाळांचा समर वेकेशन चा असल्याने अनेक सभासद भारतात
असत, त्यामुळे रमदान गेम्स हळूहळू मागेपुढे
व्हायला लागले. सभासदांची संख्या वाढत असतानाही आयोजनातील उत्साह कमी होत गेला. सभासदांना
महिनाभर एकत्र आणण्याचा, ओळखी
पाळखी वाढवण्याचा एक दुवा कमी होत गेला. वर्षभरात कधीतरी या स्पर्धा घेतल्या जाऊ
लागल्या. अजूनही दरवर्षी प्रत्येक कमिटी त्यात नवीन गेम्स ची भर घालत वर्षातून
वेगवेगळ्या वेळी या स्पर्धा घेते पण 'रमदान
गेम्स'चा तो महिना परत तसाच यावा
याची वाट पाहतोय.
या रमदान महिन्यात सर्व सभासदांना एकत्र
आणणाऱ्या आणखीन एका मनोरंजक खेळाची भर एकेवर्षी पडली. ती म्हणजे 'अंताक्षरी'.
पण
त्याविषयीच्या आठवणी पुढील बहर मध्ये.
प्रशांत कुलकर्णी
No comments:
Post a Comment