Saturday, January 30, 2021

घरचे-बाहेरचे---------मंजुषा जोशी

 

          घरचे-बाहेरचे.

                                       -मंजुषा जोशी

हा लेख काही खास पदार्थांबद्दल आहे. समस्त वाचक वर्ग जर काही हटके पाककृती वाचायला मिळतील म्हणून सरसावून बसला असेल तर कृपया रिलॅक्स. मस्त गरम चहा / कॉफी चा कप हातात घ्याजोडीला चिप्स, चिवडा, चणे-दाणे ही असू द्यात. इथे पाककृती नसल्या तरी आपण कध्धीच न केलेल्या किंवा रोजच करत असलेल्या पदार्थांच्या गप्पा आहेत. त्या हमखास रंगतील.

काही पदार्थ इतके खास असतात की ते आज पर्यंत कोणत्याही नात्यातल्या, ओळखीतल्या कुठल्याही सुगरण-सुगरणींन केलेले मी कधीही बघितले नाहीत. उदाहरणादाखल आपल्या संक्रांतीचा हलवा. तो घरात दुकानातूनच येतो. कोणे एके काळी, जेव्हा नेहमीचे, सणावाराचे, साठवणीचे, सगळेच पदार्थ घरीच केले जात असत, (थोडक्यात माझ्या लहानपणी) तेव्हाही हलवा वाण्याकडूनच यायचा. त्याच्या बरणीतही तो असाच कुठल्यातरी मोठ्या वाण्याकडून येत असावा. अनेक दिवस संक्रांतीचा हलवा वेदांप्रमाणेच अपौरुषेय (की अ-स्त्रैय?) आहे असाच माझा समज होता. नंतर कधीतरी त्याच्या पाककृतीची रसभरीत वर्णने ऐकली, यूट्यूबवर बघितली देखील. तो किती निगुतीने करावा लागतोकडक थंडीतच चांगला होतो,  जातीच्या सुगरणींना जमतो, एक ना दोनपण माझ्या तरी पाहण्यात संक्रांतीचा हलवा घरी करणारे सुगरण आलेले नाहीत.

शेवया, जिलेबी, बुंदीचे लाडूमांडे हेही पदार्थ असेचबॅंबीनो किंवा तत्सम शेवयाच माहित असलेल्या बऱ्याच जणांना शेवया हातांनी करता येतात हेच माहित नसेल. अर्थात मलाही फक्त माहितीच आहे, पण याची देही याची डोळा शेवयांचा सोहळा काही मी पाहिलेला नाही. खानदेशातून माझ्या आत्या, मावश्या स्वतः केलेल्या शेवया दरवर्षी आणायच्या. शेवयांचं पीठ दळायचं, भिजवायचं, हातांनी शेवया वळून अलगद खाटेवर टाकायच्या, अशी त्यांची वर्णन ऐकली आहेत. त्यांनी निगुतीने, प्रेमाने केलेल्या शेवयांची सर कुठल्याही वर्मेसिली ला नाही हे अनुभवलंही आहे. पण आसपास कोणाला शेवया करताना बघितलं मात्र नाही.  मांडे तर फक्त ज्ञानेश्वरांच्या गोष्टीतच ऐकले होतेपुण्याच्या चितळें कडे ते मिळतात हे ऐकूनच थक्क झाले होते. मुंबईत मांडे-बिंडे कुणाला माहीतही नसतातकॉलेजमध्ये माझ्या सिंधी मैत्रिणीला पुरणपोळी समजावता समजावताच पुरेवाट झाली होती. अगदी अलीकडे पुण्यात भीमथडीच्या प्रदर्शनात मांडे करण्याचं थेट प्रात्यक्षिक बघितलं. तरीही आजूबाजूला, नात्यात कुणी सणावाराला घरी मांडे केल्याचं ऐकिवात नाही. जिलेबी, बुंदीचे लाडू हेही साधारण याच पंक्तीतले. म्हणजे लग्न-मुंजीत लावलेले आचारी हे पदार्थ करतातहीपण जेवायला बोलावून गरम गरम भजी वाढतात तशी कुणी स्वतः करून गरम गरम जिलबी किंवा बुंदी वाढली आहे असं झालं नाही.

ह्या गोड पदार्थांच्या यादीत वर्षानुवर्ष अग्रस्थानी बसलेला एक खमंग पदार्थ म्हणजे बाकरवडी. चितळे, काका हलवाई या विशिष्ट पुणेकरांना काही विशेष सिद्धी प्राप्त झाल्याने फक्त त्यांनाच बाकरवडी करता येते असं मला वाटतं – मुंबईकर असूनहीत्यांच्यासारखी जाऊ द्या, घरगुती का होईना पण दिवाळीला आम्ही बाकरवडी केली असं कुणी म्हणत नाही.

मला वाटतं या अशा पदार्थांचा दराराच असा आहे की भले भले ही ते करायच्या वाटेला सहसा जात नसावेतआचाऱ्यांची, दुकानदारांची मक्तेदारी राखून ठेवणारे हे असे पदार्थ एकीकडे आणि दुसरीकडे, जवळपास प्रत्येक गृहिणीचा परिसस्पर्श लाभलेले अस्सल घरगुती पदार्थ हे दोन्हीही आपलं खाद्यजीवन स्वादिष्ट करतातआपल्या घरातलं गरम गरम साधं वरण भात तूप संध्याकाळी घरी जेवताना जेवढा छान लागतं तेवढा इतर कुठेही लागत नाही. पोह्यांचा चिवडा, प्रसादाचा शीरा, अगदी साधं लिंबाचं सरबत ह्यांचंही असेच आहे.

एखाद्या चवीची सवय, एखाद्या हाताचा स्पर्श, घरांचं घरपण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम साध्या साध्या पदार्थांना खास करून टाकतो. म्हणून तर आईच्या हातच्या आमटीची चव बायकोच्या आमटीला नसते. बायकोच्या/ नवऱ्याच्या हातचा फक्कड चहा कुठल्याही टपरीला किंवा टी जॉईंटला मागे टाकतो. चौपाटीवरची भेळ आणि थिएटर्स मधले पॉपकॉन यांची मजा वेगळीच असते.

घरच्या- बाहेरच्या मनपसंत पदार्थांमध्ये त्यांच्या परमाणांची गणितं आणि कृतीची शास्त्रं या व्यतिरिक्तही खूप काही असतं. सांगता आलं नाही तरी करणाऱ्याला ते जमलेलं असतं आणि खवय्यांना ते कळलेलं असतं.

 

No comments:

Post a Comment