यंदाची दिवाळी
यंदाची दिवाळी म्हणं दिवाळी न्हाई
कुठ रांगोळी न्हाई का सजलेली आळी न्हाई
कोरोनाच्या भितीने एकत्र जमण न्हाई
चार फुटावरनच बोल राजा , गप्पांमध्ये रंगण न्हाई
फोनवरून भेटत्यात समदी नाती, पण त्वांडाकड बगून त्यात दंगण न्हाई
समद्यांचंच ह्ये हाल हायत बाबा, तुझी अन माझी कथा काही निराळी न्हाई
यंदाची दिवाळी म्हणं दिवाळी न्हाई
परवा गेलथो बाजारला, लेक सुट्टीवर येणार हाय
बोहल्यावर चढवून त्याला, बनायचंय बायकोला वरमाय
त्याच्या म्हातारीने तयारी केलीया काय न काय
लाडू नका म्हणू की भडंग नका म्हणू
चकली कानवली नका म्हणू की नका म्हणू शंकरपाळी
न्हाई
यंदाची दिवाळी म्हणं दिवाळी न्हाई
काल रातच्याला... मात्र यक अघटित घडलं, सीमेवर म्हणं दुश्मनान फटाक फोडलं
केलथा पलटवार... आपल्या बी मर्द गडयान
एक गोळी मातूर छाताडाला लागून, माझं ख्वान्ड खाली पडलं
घरचे समदे दिवे गेले पटदिशी इझून, ऋषीकेशची पणती मात्र इझली न्हाई,
यंदाची दिवाळी म्हणं दिवाळी न्हाई
समदा जिल्हा आलथा.... लेकराला माती द्यायला, कोरोनाला बी वाट न्हवती यायला न जायला,
*ऋषिकेश अमर रहे* चा नारा घुमला आसमंती अन गुर बी लागली रडायला
ह्याचा अर्थ न समजायला त्याची भन दुधखुळी न्हाई
खरंच हो यंदाची दिवाळी दिवाळीच न्हाई
यंदाची दिवाळी दिवाळीच न्हाई
शैलेश मालुसरे
No comments:
Post a Comment