तुळशीमाळ कुंकवाने
सजलेली
तोंडावर
सुरकुत्यांची नक्षी दाटलेली
हनुवटीला चार केसांनी
पिकलेली
हाताना रबरी
कातडी गुंडाळलेली
सदैव हवीहवीशी वाटणारी.....आजी....आमची आजी
आंबाड्यात चाफा-अबोली माळलेली,
गोंधनाने सगळं
अंगअंग नटलेली
कमरेत थोडीशी काठीपायी
वाकलेली,
बसूनच घर
अंगण तुळस सारवणारी
सदैव हवीहवीशी वाटणारी.....आजी....आमची आजी
राशीतून हमखास गोड आंबा
शोधणारी
मोठ्ठ पोट
फुगलेली भाकरी बनविणारी
साखर-भातात साय दुध वाढणारी
पोळीवर
तुपाची उभी धार धरणारी
सदैव हवीहवीशी वाटणारी......... आजी....आमची आजी
राम - कृष्णाच्या
गोष्टी सांगणारी,
आकाशात सप्तर्षी
शोधून काढणारी
मांडीवर घेवून थोपटत
अंगाई गाणारी,
अंथरुणावर
निजवून परीराज्यात नेणारी
सदैव हवीहवीशी वाटणारी......... आजी....आमची आजी
आईपासून खात्रीने आमचा
मार हुकविणारी
चुकलं कितीही..
काहीही.. तरी मुके घेणारी
नजर काढून बोटं कडकड
मोडणारी
उद्याची
स्वप्न आजच डोळ्यात देणारी
सदैव हवीहवीशी वाटणारी.........आनंदी आजी....आमची आजी
No comments:
Post a Comment