Saturday, January 30, 2021

घरची बाहुली------ --रुपाली मावजो किर्तनी

 

 

घरची बाहुली

बॅग भरताना पुन्हा पुन्हा वाटेल
'
काही विसरले तर नाही ना
लग्ना नंतर माझ्याच घरात
मी पाहुणी तर होणार नाही ना

ज्या घराला माझं घर म्हणायचे
त्याला माहेर कसं म्हणू मी?
पाऊल घरातनं बाहेर टाकताना
वळून का बघायचं नाही मी?'

नाही जमणार कदाचित तुला
भेटून जायला सारखं सारखं
पण आई वडिलांचं घर मुलीला
कधीच होत नाही परकं

बाय लाडकी घरच्यांची
कायम अशीच राहील ही माया
दाटलेला कंठ भरलेले डोळे
लपवायला शिकेल गं भाउराया

प्रत्येक मुलीला दोन घरं
दोन्हीही तेवढ्याच हक्काची
एका कुटुंबातली चिऊ ताई
लक्ष्मी दुसऱ्या चौकाची

काळानुसार बदलल्या रिती
मन मारून चालणार नाही
घरची बाहुली घरच्यांसाठी
पाहुणी कधीच होणार नाही

--
रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment