खूप वेळा वाटतं
नव्याने करावी सुरुवात
पुन्हा एकदा टाकावं
पाऊल नव्या पर्वात
पुन्हा पहावी स्वप्ने
पुन्हा भरावे रंग
परत लढावी नव्याने
आयुष्याची जंग
मन मोकळं उडावं
खुल्या भव्य आकाशात
काळोख सोडून टाकावी
उडी दिव्य प्रकाशात
परत जावं शाळेत
नी खूप करावी मस्ती
हसत खेळत उड्या मारत
फिरत राहावी नुसती
पुन्हा एकदा रुसायला
शोधावे नवीन बहाणे
मिरवावं आशा तऱ्हेने
जणू मीच सगळ्यात शहाणे
का घ्यावा दोष उगाच
का कुणाचं ऐकावं?
सगळं सोडून अगदी बिनधास्त
मना सारखं जगावं
म्हणूनच...
खूप वेळा वाटतं
नव्याने करावी सुरुवात
पुन्हा एकदा टाकावं
पाऊल नव्या पर्वात
-रुपाली समीर किर्तनी
No comments:
Post a Comment