Saturday, January 30, 2021

मकर संक्रांतीचे उखाणे------ डॉ.पल्लवी बारटके

 

 

मकर संक्रांतीचे उखाणे

 डॉ.पल्लवी बारटके

नवीन वर्षाची सुरुवात होताच चाहूल लागते ती येणाऱ्या पहिल्या सणाची, स्नेह, प्रेमभाव, नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणाऱ्या मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत गृहिणींची लगबग सुरू होते ती हळदीकुंकवासाठी. हळदी-कुंकू म्हंटलं की उखाणे हे आलेच. तिळगुळाचा गोडवा पती-पत्नीच्या नात्यात जपणारे असेच काही उखाणे खास माझ्या मैत्रिणींसाठी.👇

1)       मकर संक्रांत म्हणताच आठवते

तीळ अन गुळाची जोडी निश्चित

तसाच __राव व __ जोडा आहे पूर्वजन्माचे संचित.

 

2)       तिळाची उब लाभू दे तुम्हाला

 गुळाचा गोडवा येऊ दे जीवनाला

 यशाचा पतंग उंच गगना वरती

____ रावांची अशीच अखंड राहो प्रीती माझ्यावरती

 

3)       सोनेरी किरणे घेऊन आली मकर संक्रांतीची उषा

____रावांचे नाव घेते मी _____ यांची स्नूषा

 

4)       गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्यात आला स्नेहाचा गंध

____रावांशी जुळले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध

5)       हळदी-कुंकवाचा सण खुलवी नाते पती-पत्नींचे

प्रेमाचे, स्नेहाचे, आदराचे, अभिमानाचे

तेच नाते माझे नि ______रावांचे

शब्दांच्या पलीकडले,शब्दांच्या पलिकडले

रांगोळी---- स्मिता सराप




उखाणे--------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

 

१). गणपतीच्या पूजनाने सुरूवात करतात मंगल कार्याची ,
 --------
रावांचे नाव घेते मुलगी -------परिवाराची.

२). निळ्या आकाशात मन मोकळेपणे फिरतो पक्षांचा थवा,
---------------
ची जोडी शोभू दे असा तुम्हा सर्वांकडून आशिर्वाद हवा.

३). लग्नसराईत पाहूण्याच्या स्वागताला वाजवतात सनई चौघडे,
--------
रावांचे नाव घेते लक्ष द्या  इकडे.

४). पूर्वला उगवतो सुय॔, त्याच्या किरणांनी पडते ऊन्ह,
---------
रावांन मुळे झाली मी --------- घराण्याची
थोरली सुन.

५). पार्वतीने महादेवाला मिळवण्यासाठी केली पूजा हरतालिकेची ,------- रावांचं नाव घ्यावं अशी इच्छा आहे माझ्या आप्तेष्टांची.

६). तुळशीला घालते पाणी सासरच्या वृंदावनी,-------रावांन सोबत संसारात रमले बाजूला ठेवून माहेरच्या आठवणी.

७). श्रावण मासात पुजतात शंकराला
चला ग सख्यानो मंगळागौरीच्या तयारीला
दुध घालू या अभिषेकाला
टिळ्या चा मान चंदनाला
वनस्पती मध्ये महत्त्व आहे बेलाच्या पानाला
पुरणपोळी ठेवूया नैवेद्याला
पारिजातकाचे फुल सजावटीला
धुप दिप कापुर आरतीला
मी साज श्रृंगार करून बसले मंगळागौरी च्या पुजेला
---------------
राव आहेत जोडीला
मैत्रीणी आल्या जागराला
खेळ खेळुनी सोहळा संपन्न झाला
हात जोडूनी करू मागणी देवाला
असाच आशिर्वाद लाभू दे
--------
आणि -------- च्या संसाराला
हीच प्रार्थना मंगळागौरीला.

बिना पाकाचे तिळाचे लाडू--------वैशाली पाटील

 

बिना पाकाचे तिळाचे लाडू

 

 

साहित्य:

पांढरे तीळ: २ वाटी

शेंगदाणे: १/४ वाटी

गूळ: १ वाटी

वेलदोडे पूड- १ चमचा

तूप: २ छोटे चमचे

 

 

कृती:

१. प्रथम तीळ बारीक आचेवर भाजून घ्यावेत आणि थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर मिक्सर ला करून घ्यावी.

२. शेंगदाणे ही चांगले भाजून घेऊन थंड झाल्यावर त्याचे कव्हर काढून चांगली पावडर मिक्सर ला करून घ्यावी.

३. गूळ किसून घ्यावा.

४. सर्व पदार्थ एका मोठ्या भांड्यात एकजीव करून घ्यावे आणि नंतर परत मिक्सर ला थोडे फिरवून घ्यावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होते.

५. हलक्या हाताने आपल्याला पाहिजे त्या मापाचे लाडू तयार करावेत.

 

 

आरोग्य सल्ला:

तीळ हे कॅल्शियम युक्त असल्यामुळे ते हाडांच्या मजबुतीसाठी चांगले आहे.

गुळामध्ये लोह चांगले असल्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी ह्याचे सेवन चांगले उपयुक्त आहे




 

तिळ - गुळ पोळी--------- सौ.मोहिनी योगेश अमृतकर

           तिळ - गुळ पोळी


सारण                                                            

1 वाटी- किसलेला गुळ

½   वाटी-तीळ बारीक केलेली

½   वाटी- बेसन पीठ

1.      बेसन पीठ तेलात तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेणे.

2.     पीठ थंड झाल्यावर त्यात गुळ व तीळ एकत्र करून घेणे , घटृट गोळा करून घेणे. 


पोळी 

1  वाटी - मैदा 

¼  वाटी- बेसन पीठ 

1.     मैदा आणि बेसन  पिठात गरम तेल टाकून एकत्र करून घेणे नंतर पाणी टाकून         

         मऊसर गोळा करणे. 

2.     समान आकाराच्या 2 पोळ्या लाटून घेणे, एका पोळी वर सारण पसरून दुसरी पोळी     

        त्या वर ठेऊन हलक्या  हाताने लाटून घेणे. 

3.    डिम गॅस वर 5 मिनिट दोन्ही बाजूने शेकणे. 

        ( थंड होईपर्यंत एकमेकांवर ठेऊ नये.   नाहीतर एकमेकांना चिकटतात. )

संक्रांती स्पेशल तीळ-गुळ पोळी तयार...

                                                                                       

                                                                                                 सौ.मोहिनी योगेश अमृतकर 



उंधियू--------सौ. शीतल अमित झळकीकर

 

उंधियू

साहित्य

कृती

बटाटे

सगळ्या भाज्यांना अर्ध्या भागात खाचे मारावेे.

रताळे

वांगी

याम

कच्ची केळी

सूरती पापडी

पापडीचे मोठे तुकडे करावे.

तूरीचे दाणे

बेसन पीठ

बाजूला दिलेले कोरडे मसाले एकत्र करून घ्यावे.

लाल तिखट

गरम मसाला

धने जीरे पूड

लिंबाचा रस

साखर

मीठ

 

वरील मसाल्याचे मिश्रण खाच मारलेल्या भाज्यांमध्ये भरून घेणे.

काढईमध्ये तेल तापवणे. त्यात थोडा ओवा घालावा व भरलेल्या भाज्या त्यात घालाव्यात. सर्व भाज्यांना पुरेल एवढे तेल वापरावे.

जास्त न धावळता, काढईवर झाकण ठेवून भाज्यांना शिजू द्यावे.

भाज्या शिजल्या की त्यात मुठिया घालाव्यात. मेथी मुठिया खाली दिल्या प्रमाणे.

 

मेथी मुठिया साहित्य

मेथी मुठिया कृती

कोरडा मसाला वर दिल्याप्रमाणेच वापरावा.

कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.

कोथिंबीरीत कोरडा मसाला घालावा व हाताची मूठ बनवून त्याचे गोळे करून घ्यावे.

हे गोळे तळून घ्यावे.

कोथिंबीर

तळणीला तेल

शिजलेल्या भाज्यांमध्ये मुठिया घालून १०-१५ मिनिटे झाकून शिजू द्यावे.

 

गरम गरम वाढून त्याचा आस्वाद घ्यावा.

 


 

भोगीची भाजी-------मनाली सहस्रबुद्धे

 

भोगीची भाजी

साहित्य :

१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी

३ ते ४ लहान वांगी

१ कप गाजराचे मध्यम तुकडे

१/२ कप हिरवे हरभरे

१/४ कप भिजवलेले शेंगदाणे

१/४ कप घेवडा

१/४ कप वाल

२ शेवग्याच्या शेंगा

 

फोडणीसाठी - तेल,मोहोरी,हिंग,हळद,लाल तिखट,३-४ कढीपत्ता,भाजलेल्या तिळाचं कूट,गोडा मसाला,चिंचेचा दाट कोळ,गूळ,ओलं खोबरं,मीठ

 

कृती:

 

१) कढईत तेल गरम करून मोहोरी,हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.

२)प्रथम बटाटा,हरभरे, घेवडा, वाल, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.

३) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.

४) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि गोडा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.

५) भाज्या शिजल्या कि गूळ,   तिळाचं कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मीठ घालावे.

६)एक उकळी काढून तीळ आणि बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.





तिळगुळ खा, निरोगी व्हा-----नम्रता चिटणीस

 

 

वर्षात येणाऱ्या १२ संक्रांती पैकी एक....मकर संक्रात...या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन त्याचा उत्तर दिशेस प्रवास सुरु होतो. दिवस मोठे होऊ लागतात, तशी थंडी कमी होते. ऋतु बदलाचा हा सण बऱ्याच राज्यात साजरा केला जातो. लोहरी, बिहू , पोंगल, उत्तरायण, आशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

 

मकर संक्रांत आणि तिळाचे समीकरण अगदी प्राचीन कालापासून आहे. घरोघरी केले जाणारे हळदी कुंकू, लहान मुलांचे केलेलं बोर नहाणं, ते अगदी नविन लग्न झालेल्या बायकांची पहिली संक्रात... सर्वात महत्त्वाचे स्थान तिळाचे! तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, असे वेगवेगळे पदार्थ करतात.

 

थंडीच्या महिन्यात आपल्या आहारात, सणा सुदीला सर्वत्रच तिळाचा वापर करतो! एवढयाश्या तिळाचे केवढे ते कौतुक?? तिळाच्या अनन्यसाधारण महत्वाचे कारण अर्थात वैज्ञानिक, त्याच बरोबर पौराणिक दृष्ट्या मिळते!

 

आरोग्यासाठी तिळ बहुमुल्य आहे. थंडीच्या दिवसात याचे रोज सेवन करावे असा आरोग्य तज्ञ सल्ला देतात. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, मँगनीज, जस्त, फोलेट, व्हिटॅमिन बी ६ हे सर्व घटक असतात. शिवाय उच्च प्रतिचे प्रथिन सुद्धा तिळा मध्ये आढळते. आयुर्वेदानुसार तिळाचे सेवन गूळा बरोबर केल्यास शरीराला आवश्यक उष्णता आणि ऊर्जा प्राप्त होऊन, मनुष्याच्या शरीराचे थंडी पासून रक्षण होते.

 

आयुर्वेदानुसार तिळाचे तेल वात आणि कफ दोष कमी करून, त्यांना नियंत्रीत ठेवते. स्वयंपाकासाठी तिळाचे तेल उत्तम तेल आहे. थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलानी त्वचेची मालिश केली असता, त्वचा मृदु, मुलायम राहण्यास मदत होते. केसांसाच्या वाढीसाठी, अवेळी पांढऱ्या होणाऱ्या केसां करिता अत्यंत लाभदायक असे तिळाचे  आहे. त्या शिवाय बऱ्याच आयुर्वेदिक औषधां मध्ये पण तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.

 

आता पुराणानुसार पाहता,  भगवान श्री विष्णुंचा घाम जेव्हा जमिनीवर पडला, तेव्हा तिळाचा उगम झाला. एका पौराणिक कथे प्रमाणे तिळाला साक्षात यमाचा आशिर्वाद लाभला आहे. म्हणूनच तिळ हे उत्तम, सुदृढ़ आयुष्याचे प्रतिक मानले जाते. मकर संक्रातिला केल्या जाणाऱ्या काळ्या तिळाच्या दानाला महादान असे म्हणतात.

 

बघा ना, आपल्या पुर्वापार चालत आलेल्या परंपरा विज्ञांनाशी किती निगडीत आहेत! आरोग्यासाठी उपयुक्त आशा तिळाचे सेवन करावे, आप्तेष्टांना वाटावे, गोर गरिबांना दान करावे, म्हणजे सर्वांनाच याचा लाभ मिळेल.

म्हणून तिळगुळ खा, निरोगी व्हा!

घरचे-बाहेरचे---------मंजुषा जोशी

 

          घरचे-बाहेरचे.

                                       -मंजुषा जोशी

हा लेख काही खास पदार्थांबद्दल आहे. समस्त वाचक वर्ग जर काही हटके पाककृती वाचायला मिळतील म्हणून सरसावून बसला असेल तर कृपया रिलॅक्स. मस्त गरम चहा / कॉफी चा कप हातात घ्याजोडीला चिप्स, चिवडा, चणे-दाणे ही असू द्यात. इथे पाककृती नसल्या तरी आपण कध्धीच न केलेल्या किंवा रोजच करत असलेल्या पदार्थांच्या गप्पा आहेत. त्या हमखास रंगतील.

काही पदार्थ इतके खास असतात की ते आज पर्यंत कोणत्याही नात्यातल्या, ओळखीतल्या कुठल्याही सुगरण-सुगरणींन केलेले मी कधीही बघितले नाहीत. उदाहरणादाखल आपल्या संक्रांतीचा हलवा. तो घरात दुकानातूनच येतो. कोणे एके काळी, जेव्हा नेहमीचे, सणावाराचे, साठवणीचे, सगळेच पदार्थ घरीच केले जात असत, (थोडक्यात माझ्या लहानपणी) तेव्हाही हलवा वाण्याकडूनच यायचा. त्याच्या बरणीतही तो असाच कुठल्यातरी मोठ्या वाण्याकडून येत असावा. अनेक दिवस संक्रांतीचा हलवा वेदांप्रमाणेच अपौरुषेय (की अ-स्त्रैय?) आहे असाच माझा समज होता. नंतर कधीतरी त्याच्या पाककृतीची रसभरीत वर्णने ऐकली, यूट्यूबवर बघितली देखील. तो किती निगुतीने करावा लागतोकडक थंडीतच चांगला होतो,  जातीच्या सुगरणींना जमतो, एक ना दोनपण माझ्या तरी पाहण्यात संक्रांतीचा हलवा घरी करणारे सुगरण आलेले नाहीत.

शेवया, जिलेबी, बुंदीचे लाडूमांडे हेही पदार्थ असेचबॅंबीनो किंवा तत्सम शेवयाच माहित असलेल्या बऱ्याच जणांना शेवया हातांनी करता येतात हेच माहित नसेल. अर्थात मलाही फक्त माहितीच आहे, पण याची देही याची डोळा शेवयांचा सोहळा काही मी पाहिलेला नाही. खानदेशातून माझ्या आत्या, मावश्या स्वतः केलेल्या शेवया दरवर्षी आणायच्या. शेवयांचं पीठ दळायचं, भिजवायचं, हातांनी शेवया वळून अलगद खाटेवर टाकायच्या, अशी त्यांची वर्णन ऐकली आहेत. त्यांनी निगुतीने, प्रेमाने केलेल्या शेवयांची सर कुठल्याही वर्मेसिली ला नाही हे अनुभवलंही आहे. पण आसपास कोणाला शेवया करताना बघितलं मात्र नाही.  मांडे तर फक्त ज्ञानेश्वरांच्या गोष्टीतच ऐकले होतेपुण्याच्या चितळें कडे ते मिळतात हे ऐकूनच थक्क झाले होते. मुंबईत मांडे-बिंडे कुणाला माहीतही नसतातकॉलेजमध्ये माझ्या सिंधी मैत्रिणीला पुरणपोळी समजावता समजावताच पुरेवाट झाली होती. अगदी अलीकडे पुण्यात भीमथडीच्या प्रदर्शनात मांडे करण्याचं थेट प्रात्यक्षिक बघितलं. तरीही आजूबाजूला, नात्यात कुणी सणावाराला घरी मांडे केल्याचं ऐकिवात नाही. जिलेबी, बुंदीचे लाडू हेही साधारण याच पंक्तीतले. म्हणजे लग्न-मुंजीत लावलेले आचारी हे पदार्थ करतातहीपण जेवायला बोलावून गरम गरम भजी वाढतात तशी कुणी स्वतः करून गरम गरम जिलबी किंवा बुंदी वाढली आहे असं झालं नाही.

ह्या गोड पदार्थांच्या यादीत वर्षानुवर्ष अग्रस्थानी बसलेला एक खमंग पदार्थ म्हणजे बाकरवडी. चितळे, काका हलवाई या विशिष्ट पुणेकरांना काही विशेष सिद्धी प्राप्त झाल्याने फक्त त्यांनाच बाकरवडी करता येते असं मला वाटतं – मुंबईकर असूनहीत्यांच्यासारखी जाऊ द्या, घरगुती का होईना पण दिवाळीला आम्ही बाकरवडी केली असं कुणी म्हणत नाही.

मला वाटतं या अशा पदार्थांचा दराराच असा आहे की भले भले ही ते करायच्या वाटेला सहसा जात नसावेतआचाऱ्यांची, दुकानदारांची मक्तेदारी राखून ठेवणारे हे असे पदार्थ एकीकडे आणि दुसरीकडे, जवळपास प्रत्येक गृहिणीचा परिसस्पर्श लाभलेले अस्सल घरगुती पदार्थ हे दोन्हीही आपलं खाद्यजीवन स्वादिष्ट करतातआपल्या घरातलं गरम गरम साधं वरण भात तूप संध्याकाळी घरी जेवताना जेवढा छान लागतं तेवढा इतर कुठेही लागत नाही. पोह्यांचा चिवडा, प्रसादाचा शीरा, अगदी साधं लिंबाचं सरबत ह्यांचंही असेच आहे.

एखाद्या चवीची सवय, एखाद्या हाताचा स्पर्श, घरांचं घरपण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम साध्या साध्या पदार्थांना खास करून टाकतो. म्हणून तर आईच्या हातच्या आमटीची चव बायकोच्या आमटीला नसते. बायकोच्या/ नवऱ्याच्या हातचा फक्कड चहा कुठल्याही टपरीला किंवा टी जॉईंटला मागे टाकतो. चौपाटीवरची भेळ आणि थिएटर्स मधले पॉपकॉन यांची मजा वेगळीच असते.

घरच्या- बाहेरच्या मनपसंत पदार्थांमध्ये त्यांच्या परमाणांची गणितं आणि कृतीची शास्त्रं या व्यतिरिक्तही खूप काही असतं. सांगता आलं नाही तरी करणाऱ्याला ते जमलेलं असतं आणि खवय्यांना ते कळलेलं असतं.